।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

भावी प्रकल्प

कार्यालया समोरील मंडप

श्री दत्त मंदिरचे समोर संस्थानचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर सद्य परिस्थितीत मंडप नाही. श्री दत्त मंदिरात जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने पावसाळी तसेच कडक उन्हाळी दिवसात दर्शनासाठी रांगेत उभे राहणा-या भक्तमंडळींना रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. त्यामुळे कार्यालयासमोर कायमस्वरुपी पत्र्याचा मंडप करणेचा विश्वस्त मंडळाचा विचार आहे.

या प्रकल्पासाठी अंदाजे रु. तीन लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.

 

जन्मस्थान समोरील मंडप

श्रीं चे जन्मस्थान समोर सध्या पत्र्याचा तात्पुरता छोटासा मंडप आहे. गर्दीच्या वेळी भक्तमंडळींना ही जागा अपुरी पडते. श्रीं ची जयंती तसेच पुण्यतिथी इ. उत्सव हे साधारणत: पावसाळ्यात येत असल्याने भक्तमंडळींची बरीच गैरसोय होते.त्यामुळे जन्मस्थान समोर कायमस्वरुपी  सिमेंट पत्र्याचा लोखंडी मंडप उभारणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भक्तांना यज्ञयाग करणेसाठी, जपजाप्य करणेसाठी, दर्शनासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल.

या कार्यासाठी अंदाजे रु. तीन लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

 

श्री दत्त मंदिर प्रदक्षिणा मंडप

श्री दत्त मंदिरच्या सभोवताली सध्या पत्र्याचा मंडप आहे. त्याला आता बरीच वर्षे झालेली असून तो जीर्ण झालेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पत्र्यांमधून पाणी झिरपते. सगळीकडे पावसाचे पाणी पसरते. जपजाप्य करणा-या तसेच प्रदक्षिणा घालणा-या भक्तमंडळींची गैरसोय होते. ग्रहशांती, यज्ञयाग मंदिर सानिध्यातच करणेची भक्तांची ईच्छा असल्याने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी लागते. मोठ्या उत्सवाना गर्दी नियंत्रणातच खूप वेळ जातो. भक्तांना दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी खूप वेळ भांबावे लागते.

या सर्व गोष्टींचा विचार करता परिसरातील विस्तृत जागेत चारही बाजूने मूळ मंदिरला हात न लावता कायमस्वरुपी आर. सी. सी. स्लॅब टाकून दत्तमंदिर ते नांदोडकर स्मृतीमंदिरापर्यंत कायमस्वरुपी सभामंडप तयार करणेचा विश्वस्त मंडळाचा मानस आहे.

यासाठी अंदाजे ७५ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.

 

ध्यानगुहेकडे जाणारा रस्ता

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज या गुहेत बसून ध्यानधारणा करीत असत. याच गुहेत श्री दत्तमहाराजांनी त्यांना दर्शन दिलेले होते. ही गुहा दत्तमंदिरच्या नैऋत्य दिशेस डोंगरात असून तेथे जाण्यासाठी पायी जावे लागते. जाण्या येण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. वयस्कर व्यक्तींना जास्त वेळ गागतो. जाताना पूर्ण चढण लागते. येताना पूर्ण उतरता रस्ता आहे. डोंगराळ भागात असल्याने सावधगिरी बाळगावी लागते. सध्या रेलींगची व्यवस्था केलेली आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी, मनशांतीसाठी हे ठिकाण उपयुक्त आहे.

डोंगराळ भागात असल्याने येथे जाण्यासाठी फक्त पायवाटच आहे. त्यामुळे कायमस्वरुपी रस्ता वा पाय-या बांधल्यास भक्तांची सोय होऊ शकेल. हा संपल्प विश्वस्त मंडळाचे विचाराधीन आहे.  

 

गोशाळा

श्री दत्तमंदिरच्या परिसरात मंदिरच्या जागेत गोशाळा बांधण्याचा मंदिराचा मानस आहे. श्री दत्तमंदिरसाठी लागणारे दूध त्यामुळे उपलब्ध होऊ शकेल. नित्यपूजेसाठी दूध, दही व तूप उपलब्ध होऊ शकेल. गायींची नैमित्तिक देखभाल करणा-या व्यक्तिंना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

 

 

श्री निर्मला मातेचे मंदिर

निर्मला नदी माणगांव मध्ये आहे. महाराज माणगांवी असताना याच नदीत आंघोळ करत असत. एकदा महाराज आंघोळीला गेले असता देवी प्रकट झाली आणि म्हणाली, मी ही नदी असून मला तुम्ही नाव द्या. त्यावेळी महाराजानी तिला निर्मला हे नाव देऊन नामकरण केले. त्यानंतर ती गुप्त झाली.

श्री दत्त मंदिर पासून ही नदी तीन कि. मी. दूर आहे. या निर्मला मातेचे मंदिर महाराजांच्या परिसरात असावे अशी ब-याच भक्तमंडळींची ईच्छा आहे. त्यामुळे निर्मला मातेचे छोटेसे स्मारक परिसरात व्हावे असा विश्वस्त मंडळाचा संकल्प आहे.

 

विनम्र  आवाहन

                        श्री दत्त मंदिरच्या सर्वांगीण विकासात आपल्या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यांनेच आजवर अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक कार्ये पूर्णत्वास आलेली आहेत. यापुढेही आपले सहकार्य अपेक्षित आहे. आपण आपली मदत  रोख रकमेने किंवा श्रीदत्त मंदिर माणगांव या नांवे डी-डी किंवा चेकने पाठवावी, असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।