।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

पालखी सोहळा

पालखी

“श्रीं” चा पालखी सोहळा श्री दत्तमंदिरच्या स्थापनेपासून सुरु आहे. स्वामींच्या वेळी दर गुरुवारी व शनिवारी पालखी निघत असे.
संकेतस्थळावरील स्वगृह पृष्ठावरील श्री दत्तमंदिरमधील छायाचित्रात श्री दत्तमूर्ती व आद्यशंकराचार्यांची मूर्तीमधील जी मूर्ती आहे तीच एकमुखी श्री दत्तांची  उत्सवमूर्ती आहे. सदरची उत्सवमूर्ती श्री. प. प. स्वामी महाराज यांच्या वेळेपासून आहे. श्री गुरुप्रतिपदा ते वैशाख पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा असतो. पालखी दर पौर्णिमेला व अन्य उत्सवांना काढली जाते. तसेच भक्तांच्या आग्रहाखातर योग्य धार्मिक शुल्क कार्यालयात भरुन शुभदिनी देखील पालखी सोहळा साजरा केला जातो.  
ब्रह्मवृंदामार्फतच सोवळ्यात फुलांनी सजविलेली पालखी आणली जाते. आरतीनंतर दत्तमंदिरासमोरच पालखी खाली ठेवली जाते. पुजारी आरती नंतर उत्सवमूर्ती आणून पालखीत ठेवतात. त्यानंतर जयघोषात पालखी उचलून ब्रह्मवृंदामार्फत पुढे नेली जाते. एकूण तीन प्रदक्षिणा दत्तमंदिरात होतात. प्रत्येक प्रदक्षिणेत पाच ठिकाणी पालखी थांबते. प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी पदे म्हटली जातात. तसेच एका थांब्यावरुन दुस-या थांब्यापर्यंत चालतांना अष्टके व जयघोष म्हटला जातो.
पहिली प्रदक्षिणा व  पहिला थांबा  ही १/१ अशा रितीने दाखविलेली आहे. तिथे कर्सर नेल्यावर त्या ठिकाणी म्हटले जाणारे पद दिसेल. तर दोन थांब्यामध्ये < अशा खुणेने पुढे जाण्याची दिशा दाखविली आहे. त्याठिकाणी कर्सर नेल्यावर कोणते अष्टक म्हटले जाते ते तेथे दिसेल.
सर्वात शेवटी पालखी ३/५ (तिसरी प्रदक्षिणा / पाचवा थांबा ) थांब्यानंतर औदुंबरापाशी येते. त्यावेळी अष्टके पूर्ण केली जातात. औदुंबराची आरती म्हणून नंतर उत्सवमूर्ती तेथूनच गर्भगृहात नेली जाते. पालखीमात्र तशीच पुढे नेऊन उत्तर दिशेला ठेवली जाते.   
असा पालखी सोहळा आरतीनंतर रात्री ७.१५ ते ९.१५ पर्यंत अत्यंत उत्साहात शांत व धीरगंभीरपणे साजरा केला जातो. आरतीनंतर मंत्रपुष्प म्हटला जातो. त्यानंतर तीर्थप्रसाद होऊन पालखी सोहळा संपन्न होतो.

।। अवधुत चिंतनः श्रीगुरुदेव दत्त ।।