।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

पूर्ण प्रकल्प

श्रीं चे जन्मस्थान

                    श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती व त्यांचे बंधू प. पू. सीताराम महाराज टेंब्ये यांचा ज्या घरात जन्म झाला, त्या घराचा जीर्णोध्दार कै. इंदिराबाई होळकर यांनी सन १९४०मध्ये केला. ही इमारत बरीच वर्षे झाल्याने जीर्ण झालेली होती. त्यामुळे तत्कालीन विश्वस्त मंडळाने जन्मस्थानचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन अध्यक्ष वि. य. तथा आबाजी बांदेकर यांच्या पुढाकाराने सन २००० सालामध्ये सुरुवात करण्यात आली व डिसेंबर २००२ मध्ये काम पूर्ण होऊन ता. २७ डिसेंबर २००२ रोजीच्या शुभ मुहुर्तावर जन्मस्थानी पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचवेळी श्री. प. प. कालिकानंद तीर्थ, कोल्हापूर व श्री. प. प. दामोदरानंद सरस्वती, उगारखुर्द यांचे हस्ते कलशारोहण करण्यात आले होते. श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या परिवारातील श्री दत्त संस्था गरुडेश्र्वर, श्री रंगावधूत महाराज संस्थान नारेश्र्वर, श्री. नाना महाराज तराणेकर संस्थान इंदौर, श्री नृसिह सरस्वती संस्थान कारंजा, श्री प. पू. सीताराम टेंब्ये स्वामी महाराज संस्थान बडनेरा-झिरी वगैरे सर्व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. हा सोहळा फार धुमधडाक्यात पार पडला.

                    सर्वांच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले असून या कार्यासाठी रु. ३५ लाख खर्च आला.

 

भक्तनिवास

                    महाराजांच्या येणा-या प्रचितीमुळे श्री दत्तमंदिर मध्ये दर्शनासाठी येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. तसेच श्री दत्तमंदिर मध्ये विविध उत्सव साजरे होत होते. या उत्सवाना येणा-या भक्तांची संख्या देखील पुष्कळ होती. महाराजांच्या ग्रंथाचे पारायण तसेच दर्शनासाठी येणा-या भक्तांना तत्कालिन ५ खोल्यांची इमारत खूपच अपुरी पडत होती. परिणामी भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने इमारत बांधणे आवश्यक होते.

त्यामुळे मदतीचे आवाहन करुन भक्तनिवास बांधण्यास प्रारंभ करण्यात आला. दोन वर्षात ही इमारत पूर्ण करण्यात आली. या इमारतीसाठी रु. ३० लाख खर्च झाला. या इमारतीमध्ये २१ खोल्या असून प्रत्येक खोलीत ५ ते ६ जण राहू शकतात. स्वच्छतागृहे व स्नानगृहे विपुल प्रमाणात आहेत. प्रत्येक खोलीत पलंग असून अंथरुण पांघरुण उपलब्ध आहे.खोलीचे भाडे रु. ५० एका दिवसासाठी आकारले जाते. जपजाप्य, पारायण,धार्मिक कार्यक्रमासांठी व

 

अन्नपूर्णा भवन

                    महाराजांच्या प्रचितीमुळे श्री दत्त मंदिर मध्ये दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी येणा-या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वार्षिक कार्यक्रमांसाठी येणा-या भक्तांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तत्कालिन जेवायचा हॉल अपुरा पडत असल्याने नवीन हॉल बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात सन २००४ रोजी करण्यात आली. पाच वर्षे पूर्ण व्हायला लागली.  खालच्या हॉलमध्ये पाचशे माणसे जेवायला बसू शकतील. वरच्या हॉलमध्ये  माणसे एक हजार जेवायला बसू शकतील. याच इमारतीत तळमजल्यावर सुसज्ज कार्यालय, अन्नदान हॉल आहे. वरच्या मजल्यावर विश्वस्त कार्यालय, मौजीबंधन शांतीसाठी हॉल आहे. स्नानगृहे, स्वच्छतागृहे, राहण्यासाठी खोल्या आहेत.

                      महाराजांच्या सौभाग्यवतींचे नाव अन्नपूर्णा असल्याने या इमारतीला अन्नपूर्णा भवन असे नाव देण्यात आले.

 

वेदपाठशाळा भवन

                    संस्थेला वेदपाठशाळा सुरु करायची होती. वेदपाठशाळा विद्यार्थी, गुरुजी, देवस्थान मध्ये कार्यरत असणारे पुजारी, आचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी तसेच भक्तांच्या निवासासाठी इमारत बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. सन २०११ मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. या इमारतीत १५ खोल्या असून प्रत्येक खोलीत आणखी एक खोली आहे. प्रत्येक खोलीत स्नानगृह व स्वच्छतागृह आहे.  मुलांना शिकण्यासाठी सुसज्ज हॉल बांधलेला आहे. या इमारतीसाठी ५० लाख रुपये खर्च आलेला आहे.

 

यतिकुटी

                    यतिमहाराज/संन्यासी आल्यानंतर संस्थानकडे त्यांच्या आचरणाच्या दृष्टीने अशी व्यवस्था संस्थेकडे उपलब्ध नव्हती. त्यांचे आचरण/नियमानुसार अशी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे वेदपाठशाळेच्या बाजूलाच यतिकुटी बांधण्याचे निश्चित करण्यात आले. या कुटीत एक हॉल, दोन खोल्या असून स्नानगृह व स्वच्छतागृह आतमध्येच आहे.या इमारतीसाठी रु. १० लाख एकढा खर्च आलेला आहे.

 

श्री. प. पू. नांदोडकर समाधिस्थान

                    श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज हे टेंब्ये स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते. महाराजांच्या भक्तीपायी किंबहुना त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्यांनी माणगांवात वास्तव्य केले. त्यांनी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. श्री दत्त मंदिरवर  सोन्याचा कळस बसविला.  महाराजांच्या आज्ञेने सन १९७२ पासून प्रतिवर्षी एक/तीन/सात दिवस यज्ञ ( याग ) करणे सुरु केले. त्यांच्या देहावसनानंतर संस्थेने यज्ञ करणे अजूनपर्यंत सुरु ठेवले आहे. सध्या दरवर्षी माघ महिन्यात श्री गुरुप्रतिपदा उत्सवाचे वेळी तीन दिवस यज्ञयाग केला जातो. या उत्सवाची  व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो भक्तगण या कार्यक्रमाला येत असतात. तन मन धनाने आपली सेवा अर्पण करत असतात.   श्री दत्तमंदिरच्याच बाजूला प. पू. नांदोडकर स्वामी महाराजांचे स्मृतिस्मारक बांधलेले आहे. हल्ली याच मंदिरात नांदोडकर स्वामींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.

 

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाचनालय

                    श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याशिवाय महाराजासंदर्भात ब-याच अधिकारी व्यक्तींनी माहिती पुस्तकरुपात प्रसिध्द केलेली आहे. मासिक, त्रैमासिक, वार्षिक अंकामधून महाराज व दत्तस्थानांसंबधी माहिती नेहमी प्रसिध्द होत असते. श्री दत्तमहाराजांच्या कार्याविषयी माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.

श्री दत्त मंदिरमध्ये दर्शनासाठी हजारो भक्तगण येत असतात. जपजाप्य, ग्रंथ पारायण, मनशांती साठी संस्थेच्या भक्तनिवास इमारतीमध्ये बरीच भक्तमंडळी वास्तव्यास असतात.  हा विचार करुन तत्कालीन विश्वस्त मंडळाने भक्तांना महाराजांच्या व दत्तमहाराजांच्या लिलांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

                    माहे मार्च २०११ मध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ग्रंथालय या महाराजांच्या नावे ग्रंथालय सुरु करण्यात आलेले आहे. या ग्रंथालयामध्ये महाराजांची सर्व ग्रंथसंपदा, मासिके, त्रैमासिके, इतर दत्तस्थानांसंबधी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा तिथेच बसून वाचावयासाठीच उपलब्ध आहेत.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।