।।  श्री गणेशदत्तगुरुभ्योनम:  ।।

           श्री दत्त महाराजांच्या ईच्छेनुसार श्री प. प. नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगांवी झाला. तो अवतार अर्थातच श्री गणेशभट्ट व सौ. रमाबाई यांच्या पुत्ररुपाने ! अर्थातच वासुदेवशास्त्री टेंब्ये म्हणजेच संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच आपले थोरले महाराज !
          श्री वासुदेवशास्त्रींची योग्यता एवढी होती की त्यांचे बरोबर  साक्षात श्री दत्त महाराज हे माणगांवी मंदिर स्थापनेपासून पुढे सात वर्षे त्यांच्यासोबत राहिले. आणि ..................... अशामुळे माणगांवचे श्री क्षेत्र माणगांव झाले.
          श्री  दत्त संप्रदायात अनेकांनी अवतार घेतले आहेत. परंतु वासुदेवशास्त्री टेंब्ये व संन्यासानंतरचे श्री. परमहंस परिव्राजकाचार्य ( प.प.)  वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांनी मात्र चारही आश्रमातून जाऊन अखेरीस दत्तरुप झाले. आजकालच्या संसारी युगात अशा संसारातून देखील आपणाला दत्तरुप किंवा परमेश्वराजवळ कसे जाता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साक्षात स्वामी महाराज होत.
          इंग्रजांच्या काळात भारतात त्यांनी सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला. विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. भारतातील विविध दत्तस्थानांमध्ये रोजची दिनचर्या आदि कार्यक्रमांची रुपरेषा आखून दिली. अनेक जणांना सन्मार्गाला लावले. असे महान कार्य आपल्या आयुष्यात केले.  त्यांच्या वागण्याने सर्व संन्यासी जणांचे आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
          त्यांची पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई या देखील थोर तपस्वी व योगविद्येत पारंगत होत्या. त्यांची समाधिअवस्थेपर्य़ंत योगसाधना झाली होती. त्यांचे गंगाखेड ( परभणी ) येथे महानिर्वाण झाले.
           स्वामी महाराजांचे धाकटे बंधू सीताराम उर्फ भलोबा व नंतरचे परमपूज्य ब्रह्मीभूत ( प.पू.ब्र.) सीताराम महाराज हे देखील त्यांचे शिष्य बनले होते. ते ब्रह्मचारीच राहिले होते. त्यांचे चरित्र देखील अभ्यास करण्यासारखे आहे. त्यांनी बडनेरा - झिरी ( अमरावती )  येथे समाधी घेतली.
          

 
 
श्री दत्त मंदिर   श्री देवी यक्षिणी माता
     
 
श्री. प.प. टेंब्ये स्वामी (थोरले स्वामी) महाराज   प. पू. ब्रह्मीभूत श्री. सीताराम महाराज
     
 
श्री. प. प . वासुदेवशास्त्री टेंब्ये स्वामी ( माणगांव ) यांच्या धर्मपत्नी महायोगिनी सौ. अन्नपूर्णामाता टेंब्ये समाधीस्थान   श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज प्रबोधिनी
 

                    श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज व श्री. प. पू. ब्र. सीताराम महाराज या दोघांचे जन्मस्थान माणगांवी आहे.तसेच साक्षात श्री प. प. नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणा-या योगिनींपैकी यक्षिणी देवी एक प्रमुख देवता होती. श्री. प. प. नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे पुढील अवतारापूर्वी “ तू आधी माणगांवी जाऊन तेथे गांव वसव कारण माझा पुढील अवतार माणगांवी होणार आहे ”. त्यांच्या ईच्छेने माणगांवची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी झाली. संपूर्ण भारतात श्री देवी यक्षिणी देवीचे एकमेव मंदिर देखील माणगांवीच आहे. श्री. प. प. टेंब्ये स्वामी व श्री. प. पू. ब्र. सीताराम महाराज यांचे जन्मस्थान व ग्रामदेवता श्री यक्षिणी मंदिर हे जवळच आहेत. तर प. प.टेंब्ये स्वामींच्या घरासमोरच दोनशे मीटर अंतरावर श्री. प. प. वासुदेवशास्त्री यांनी स्थापित केलेले हेच ते पूर्वाभिमुख श्री दत्त मंदिर.
                    या सर्वांची माहिती देण्यासाठी हे संकेतस्थळ निर्माण केले गेले आहे. या संकतेस्थळाचे उद् घाटन श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज यांच्या जन्मदिनी – श्रावण वद्य पंचमी शके १९३३ ( दि. १९.८.२०११ ) रोजी श्री क्षेत्र माणगांवी करण्यात आले.या संकेतस्थळाच्या निर्मितीत ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संस्थेस सहकार्य केले त्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन व आभार. अनेकांनी सहकार्य केल्याने सर्वांची नावे याठिकाणी शक्य नसल्याने कोणाचीही नावे देत नाही आहोत.
                     या संकेतस्थळावरील माहितीचा वापर व्यवसायिक दृष्टीने करु नये. भक्तांच्या माहितीसाठी व वैयक्तिक वापरासाठीच यावरील माहिती उपलब्ध आहे.

धन्यवाद !

वैद्य.रामचंद्र जनार्दन गणपत्ये
अध्यक्ष
श्री दत्त मंदिर माणगांव.


संकेतस्थळ प्रकाशन - श्रावण वद्य पंचमी शके १९३३ ( दि. १९.०८.२०११ ) ; अधिक माहिती अपडेट – ०९.०८.२०१३
संकेतस्थळ प्रकाशन (इंग्रजी) चैत्र कृष्ण नवमी शके १९३ (दिनांक १२.०.२०१२)
संकेतस्थळ प्रकाशन (हिंदी) माघ कृष्ण प्रतिपदा श्री गुरूप्रतिपदा १९३ (दिनांक २६.०२.२०१३)


।। अवधूत चिंतनः श्री गुरुदेव दत्त ।।