।। श्रीवासुदेवांगना अन्नपूर्णा प्रसन्न ।।

महायोगिनी सौ. अन्नपूर्णामाता टेंब्ये म्हणजे श्री. प. प . वासुदेवशास्त्री टेंब्ये स्वामी ( माणगांव ) यांच्या धर्मपत्नी. ‘न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते।।’ यानुसार वास्तु म्हणजे घर नव्हे तर गृहीणी म्हणजेच खरे घर होय. श्रीदत्तावतारी श्रीटेंब्येस्वामींच्या अवतार लीलेत श्रीटेंब्येशास्त्रींची धर्मपत्नी म्हणून साक्षात् श्रीदत्तांनी ज्या दिव्य पुण्यात्म्याची योजना केली, त्यांचाअधिकार केवढा असेल?

महासती सौ. अन्नपुर्णामाता तथा पू. सौ. मातोश्री यांचे माहेर रांगणागडास असून यांचे पिताजी हवालदार श्री बाबाजी गोडे होते, तसेच यांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘बयो’ तर विवाहानंतरचे नाव ‘सौ. अन्नपुर्णा’ होते.या अत्यंत समाधानीस्वभावाच्या असून पतीच्या कार्यात झोकून सहभागी होत असत.

पू. सौ. मातोश्री या मोठ्या योगिनी होत्या, शास्त्रींबुवांच्या खडतर व समर्पित जीवनास यांनी अत्यंत समर्थपणे साथ दिली, त्या स्त्रियांचे धर्म तंतोतंत पाळत असतं. बुवांनी त्यांना अध्यात्म व योगाचे शिक्षण दिले होते, शास्त्रीबुवांच्या पत्नी या ओळखीशिवाय त्यांची स्वतःची साधना अत्यंत प्रगल्भ होती. यामुळे देवालयाच्या दारासमोर दीर्घकाळ त्या समाधी अवस्थेत असल्याचे चरित्रात आढळते, ही समाधी अवस्था शास्त्रींबुवांना शास्त्रीय पद्धतीने उतरावी लागली. यावरून पू. सौ. मातोश्रींचा योगाधिकार कळतो.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, या न्यायाने बुवांच्या साधनेत त्यांची महत्वाची साथ होती, त्या सावलीसारख्या पतीच्या मागे होत्या, विवाहानंतरही नैष्टिक ब्रम्हचर्य पाळून बुवा योगाभ्यास करीत, यावेळी त्यांचा मुक्काम देवळात तर पू. सौ. मातोश्रींचा मूळ घरात असे. विवाहानंतर तब्बल ९।। ते १० वर्षानंतर बुवांचा ( श्री वासुदेवशास्त्रींचा ) संसार सुरु झाला.माणगांव सोडल्यावर उभयता वाडीला आले.थोडयाच दिवसांत सौ.अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या.पण मुलगा मृतवस्थेत जन्मला.संसाराचा पाश तोडणारी एक घटना. अधीच स्वभावाने विरक्त असलेले स्वामी अधिकच विरक्त बनले.

सर्व सामान्यपणे सौभाग्यवती स्त्रीच्या दोन प्रमुख इच्छा असतात.पहिले म्हणजे तिला मातृत्व प्राप्त व्हावे आणि दुसरे म्हणजे अहेवपणी मरण यावे.लौकिकार्थाने विचार केला असता उपेक्षित जीवन जगणा-या सौ.अन्नपूर्णामातेच्या दोन्ही इच्छा पु-या झाल्या होत्या.सौ.अन्नपूर्णाबाईंना प. श्रीगोविंदस्वामी, प. श्रीमौनीस्वामी, प.श्रीकृष्णसरस्वतीस्वामी, श्री. मारुतीबुवा आजरेकर अशा सत्पुरुषांचा यांना सत्संग लाभला होता.

“उत्तरेस जा !” या श्रीगुरुदत्ताज्ञेनुसार व प. श्रीमौनीस्वामींच्या परवानगीने बुवांनी श्रीनरसिंहवाडी सोडल्यानंतर कोल्हापूर, औदुंबर, पंढरपूर, बार्शी अशी तीर्थक्षेत्रे करीत बुवांबरोबरच त्या गंगाखेडास आल्या, येथे दृष्टांतानुसार पू. सौ. मातोश्री आजारी पडल्या, यात बुवांनी त्यांची सर्व सेवासुश्रूषा केली, यानंतर पू. सौ. मातोश्रींनी आपला मृत्यू जाणला. “ मला ब्रम्हस्वरुपाचे चिंतन करवा व आपले सत्यस्वरुप दाखवा!” अशी प्रार्थना केली, तेव्हा “तुझ्या इच्छेप्रमाणे होईल!” अशा बुवांच्या अभय वचनानंतर, परब्रम्ह श्रीदत्तात्रेयांशी अनन्यता साधून, बुवांच्या पायावरती मस्तक ठेवून, सौ. मातोश्रींनी आपल्या दत्तावतारी पतीच्या समोर महायोग्यास शोभेल असा, अहेवपणी देहत्याग केला, वरदानानुसार बुवांनी त्यांना स्वात्मदर्शन दिले.

ती वेळ वैशाख कृष्ण १४ (दि.१५/५/१८९१) शुक्रवार दुपारची होती, यानंतर गोदावरी पात्रातील नरसोबामंदिर घाटावर बुवांनी त्यांचे अंत्यसंस्कार यथाविधी केले. सौ. अन्नपूर्णामाता टेंब्ये ह्यांचे समाधीस्थान नरसिंहघाट, गोदावरीतट, श्रीबालाजी मंदिराजवळ, श्रीक्षेत्र गंगाखेड, जि. परभणी ४३१ ५१४ येथे आहे.

यानंतर ‘अनाश्रमी न तिष्ठेत क्षणमेकमपि द्विजः।’ यानुसार पत्नीच्या मृत्युपासून १४ व्या दिवशी बुवांनी गोदावरीपात्रातील, मारुती मंदिराच्या ओट्यावर संन्यास घेतला. श्री प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंब्ये) स्वामींनी येथून पुढे आसेतुहिमाचल पायी फिरुन सर्वत्र वैदिकधर्म व दत्तभक्तिचा प्रचार केला व अखेर गरुडेश्वरास त्यांनी समाधी घेतली.

श्री प. प. श्रीटेंब्येस्वामी श्रीदत्तसंप्रदाय व सनातनीपरंपरेचे महाचार्य म्हणून प्रसिद्धी पावले, त्यांची सर्वत्र किर्ती झाली, परंतू त्यांच्या सहधर्मचारिणी महायोगिनी पू. सौ. अन्नपुर्णामातेची साधना तसेच त्यागमय, कठोर व प्रासादिक जीवन याकडे स्वामीभक्तांचे व संप्रदायांचे दुर्लक्ष झाले, गंगाखेडातील ते इतिहासप्रसिद्ध विश्ववंद्य समाधीस्थान आजपर्यंत दुर्लक्षित होते. हल्लीच या स्थानाचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. अशा या महान तपस्वीनी व महायोगिनी सौ.अन्नपूर्णामाता यांच्या समाधीस्थानाचा दि. ८ जानेवारी २००९ ला गंगाखेड येथे जीर्णोध्दार कार्याचे भूमीपूजन झाले. आणि अखेरीस वैशाख कृष्ण १४,शके १९३१ म्हणजेच दिनांक २३ मे २००९ रोजी या समाधीस्थानाचे जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. आणि सुंदर अशी मेघडंबरी बांधून पूर्ण झाली.

या दिवशी जीर्णोध्दारीत समाधीस्थानाचे समंत्रक शुद्धीकरण करण्यात आले. सोबत समाधीशिलेपासून तयार केलेले व माणगावी स्थापीत होणारे मातृपद ( मातोश्रींच्या पादुका ) व प्रत्यक्ष प.प.टेंब्ये स्वामी महाराजांनी आपल्या भक्तास दिलेल्या अभय पादुका होत्या. हे सर्व समाधीस्थानावर ठेवून समाधीची षोडशोपचार पूजा करण्यात आली. यावेळी ब्रम्हवृदांनी रुद्र,पवनसुक्त तसेच भक्तांनी स्वामींची विविध स्तोत्रे,ग्रंथ आधींचे वाचन याठीकाणी केले.यावेळी समाधीस्थानाला साड्या नेसवण्यात आल्या व ओट्या भरण्यात आल्या.फुलांनी सजवलेली व साडी नेसवलेली असे हे समाधीस्थान – मेघडंबरी अत्यंत सुंदर व रम्य दिसत होती.अशा रीतीने समाधीस्थानाच्या जीर्णोध्दाराचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या समाधीस्थानातील दगडापासून तयार केलेल्या पादुका सौ. अन्नपूर्णा बाईंच्या घरी म्हणजेच माणगांवी श्री. प. प. टेंब्ये स्वामींच्या जन्मस्थानी स्थापन करण्यात आल्या आहेत.

।। महासती अन्नपूर्णामातेची आरती ।।

अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।
वासुदेव जिचा पती । देहधारी त्रयमूर्ती ।।
अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।

वासुदेवा निशिदिनी । सेवी काया वाचा मनी ।
पतिव्रता शिरोमणि । वासुदेवी नित्य मती ।।
अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।

अनुसरे जैसी छाया । पतीसवे दुजी काया ।
पुण्यपंथे राहाटाया । अवतारी जे दंपती ।।
अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।

गंगाखेडी गोदातिरी । वसे निर्गुणामाझारी ।
गुरुसुताची वैखरी । रमो नित्य तुझ्या पदी ।।
अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।

मही पाहुनि सर्वही धर्महीन । धरी माणगांवी स्वये दत्तप्राण ।।
रमापुत्र व्यापे जिच्या पंचप्राणा । नमू वासुदेवांगना अन्नपूर्णा ।।
अन्नपूर्णे महासती । ओवाळीतो पंचारती ।

।। महायोगिनी अन्नपूर्णामाता की जय ।।