अमृतोपदेश, सुगुणोपासना, भजन व भक्ती

  • सुगुण परमेश्वराची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे. सगुण उपासना केल्यावाचून ब्रह्मसाक्षात्कार होणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा आणि कायद्याचा अभिमान असतो, तसाच देवाला आपल्या सगुणरुपाचा व वेदशास्त्रांचा अभिमान आहे. शिक्कामोर्तब म्हणजे राजा नाही, हे खरे; पण शिक्कामोर्तबाशिवाय राजाचा व्यवहार होऊ शकत नाही आणि राजाशिवाय नुसत्या शिक्कामोर्तबालाही महत्त्व नाही. प्रजाजनांनी राजाचे कायदे पाळले म्हणजे राजाला जसा संतोष होतो तसाच संतोष शास्त्रनियम पाळल्याने ईश्वराला होतो. करिता शास्त्रज्ञेप्रमाणे वागून ईश्वराची सेवा करा व आपले कल्याण करुण घ्या.
  • ईश्वर व गुरु यांची पूजा यावज्जीव केलीच पाहिजे.
  • ग्रंथ वाचीत असताना तो प्राकृत आहे की संस्कृत आहे या बाह्यांगाचा विचार करु नये. त्याच्या अर्थाकडे अनुसंधान ठेवावे. कलियुगात आचारधर्म लुप्तप्राय झाल्याने नुसत्या वेदपठणाचा व्हावा तसा उपयोग होत नाही. पण साधुपुरुषांनी केलेल्या प्रासादिक प्राकृत ग्रंथांचा यावेळी फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे… श्रीज्ञानेश्वरी, श्रीनाथभागवत व श्रीदासबोध हे प्रासादिक ग्रंथ आहेत. त्यांच्या नित्यपठणाने मन शुद्ध होऊन भक्ती उपजेल व शेवटी मुक्तीही लाभेल.
  • प्रभूची सेवा अनन्यभावाने करा. एकीने राहून नित्य दिगंबराचे भजन करा

सर्व उपदेशाचे सार

  • मुक्तीचा लाभ करुन घेणे हे मनुष्यजन्माचे कर्तव्य आहे.
  • त्याकरिता प्रथम मन स्थिर व्हावे या उद्देशाने वर्णाश्रमविरहित धर्माचे यथाशास्त्र आचरण झाले पाहिजे.
  • वेदान्ताचे श्रवण, मनन, निदिध्यासन नित्य करावे.
  • मुख्यत: लक्षपूर्वक श्रवणाने मनातील आसक्ती कमी होईल.
  • सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते.
  • सात्विक प्रवृत्ती होण्याकरिता आहार हा हित, मित व मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
  • आपली प्रकृति सात्विक झाली आहे हे ओळखण्याची खूण अशी, की स्वधर्मावर दृढ श्रद्धा बसून स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ हे वेळेवर करणे, अतिथिसत्कार, गोसेवा, मातापितरांची सेवा ही हातून घडणे, कथा-किर्तन, भजन-पुराण यांचे श्रवण होणे, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्याचे नुकसान होईल असे न वागणे, स्त्रियांनी सासरी राहून सासू-सासरे व इतरही वडील माणसे यांच्या आज्ञेत पतीची दृढनिष्ठेने सेवा करणे इ. गुण आपल्यामध्ये येणे. आपली प्रकृति सात्विक बनल्याची ही चिन्हे आहेत.
  • उदरनिर्वाहाकरिता व्यापार, शेती, नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म व गुर्वाज्ञापालन कधीही सोडू नये.
  • स्वकर्म केले तरच अंत:करण शुद्ध होते.
  • अंत:करण शुद्ध झाले तर उपासना स्थिर होते.
  • उपासना स्थिर झाली तर मनाला शांति मिळते.
  • आणि मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो. याप्रमाणे जो वागेल तो शेवटी पूर्ण सुखी होईल.