सुंदरते गांव सुंदरते स्थान ।। तेथे माझे मन राहे सदा ।।१।।
पश्चिमे सागर पूर्वे सह्यगिरी ।। मध्ये सिंधुदुर्ग भूमी भाग ।।२।।
दक्षिण भागात माणगांव क्षेत्र ।। निर्मला पवित्र वाहे तेथे ।।३।।
पर्वत राजीत निर्झर वाहती ।। वृक्षांची ती दाटी काय वर्णू ।।४।।
तेथे यतिराज वासुदेव राहे ।। उभा मागे आहे दत्तात्रेय ।।५।।
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार मानले जातात. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री दत्त महाराजांचे आज्ञेशिवाय त्यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. त्यांचा जन्म या गावी झालेला असून आज हे माणगांव तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे.
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींना नरसोबावाडीहून येताना श्रीं च्या आज्ञेवरुन इच्छेवरुन कागल येथील एका ओता-याने श्री दत्तांची मूर्ती स्वामींना दिली. ती मूर्ती स्वामींनी माणगाव येथे आणली. प्रश्न होता मंदिर कोठे बांधण्याचा माणगावातील एका विधवा महिलेने आपली जमीन मंदिरासाठी देऊ केली. महाराजांनी स्वत: कष्ट करुन व गावातील अन्य लोकांच्या सहकार्याने आठ दिवसात छोटेसे मंदिर बांधून तयार केले. त्यात दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तो दिवस होता वैशाख शुध्द ५ शके १८०५. (सन मे १८८३)
अशाप्रकारे माणगावच्या मंदिरात प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू स्वामींच्या बरोबर सात वर्षे प्रत्यक्ष येथे राहिले. आणि आज देखील साक्षात स्वामी महाराज व दत्तप्रभू महाराज चैतन्यरुपाने माणगावी आहेतच. त्यामुळेच शरण आलेल्या भक्तांची कामे सहजरित्या होताना दिसतात. महाराजांच्या येत असलेल्या प्रचितीमुळे भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशा दत्तमंदिरचा नंतर अ. सौ. श्रीमंत इंदिराबाई होळकर यानी इ. स. वैशाख शुध्द त्रयोदशी शके १८६० दि. १२ मे १९३८ साली जीर्णोध्दार केला. मंदिराची रचना हेमाडपंथीय अशा स्वरुपाची आहे. अशा मंदिरच्या गर्भगृहात आपणा सर्वांना संगमरवरी श्री त्रिमुर्ती दत्तात्रेयांची मूर्ती, बसलेली श्री महाराजांची स्वामींची मूर्ती सरस्वती व आद्यशंकराचार्य रचना देखील अ. सौ. श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनीच मंदिर जीर्णोध्दारावेळी केली आहे. गर्भगृहाच्या समोर भव्य असे सभागृह आहे.
प. प. स्वामी महाराजानी बांधलेल्या दत्त मंदिराजवळ त्यावेळची विहार देखील आहे. ती देखील अ. सौ. श्रीमंत इंदिराबाई होळकरानी पुन्हा चिरेबंदी बांधली आहे. श्री दत्त मंदिरास लागून असलेला औदुंबर हा स्वामींच्या वेळेपासूनच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लाकडाचे खांब प. प. स्वामी महाराजानी उभारलेले आहेत. त्या काळात येणारे भक्तांमधील भूतपिशाच्च इ. त्रास असलेल्या भक्तांमधील भूतपिशाच्च ह्या खांबाना चिकटत व आपल्या इच्छा स्वामीना सांगत व पूर्ण केल्यानंतर त्या भक्ताला सोडून गेल्याने भक्त भूतपिशाश्र्च बाधेतून त्रासमुक्त होत असत.
स्वामीनी स्थापन केलेल्या औदुंबराखाली श्री दत्तांच्या पादुका देखील आहेत. तसेच प. प. स्वामींच्या योगचिन्हांकित पादुका देखील स्थापन केलेल्या आहेत. आज-याचे आजरेकर बुवांनी स्थापित पश्चिमाभिमुख अशी मारुतीची मूर्ती येथे आहे.
सभामंडपांत प्रवेश करताना समोरच गणपतीची मूर्ती देखील आहे. तसेच गर्भगृहात संगमरवरी त्रिमुखी दत्तांची मूर्ती, प. प. टेंब्ये स्वामी सिध्दासनातील मूर्ती,व स्वमींच्या वेळेपासुन असलेली उत्सव मुर्ती आद्य शंकराचार्य व सरस्वती देवीची सुबक अश्या मूर्ती आहेत. श्री दत्त मंदिरावर सुवर्ण कळस बसवला तसेच गुरुप्रतिपदा उत्सव ज्यांनी सुरु केला असे श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज स्मृतीस्मारक श्रीदत्त मंदिर समोरच आहे.
त्याचप्रमाणे स्वामींच्या जन्मस्थानाचा देखील जीर्णोध्दार करुन एक मजली असे छोटे असे घर बांधले. सदरचे घर जीर्ण झाले असलेने आताच्या संस्थेने स्वामींच्या जन्मस्थानचा जीर्णोध्दार केला. तत्कालीन अध्यक्ष प. पू. श्री. आबाजी बांदेकर व अन्य विश्वस्तांनी नविन जन्मस्थानी स्वामींची त्यांच्या उंचीची पंचधातुची उभी मूर्ती तयार करुन स्थापन केली. कल्पना अशी आहे की प्रत्यक्ष स्वामीजी हे आपल्या जन्मस्थानाहून समोरील दत्त मंदिरात जाण्यासाठी निघत आहेत! त्यामुळे प. प. स्वामी महाराजांची भारतातील एकमेव उभी मूर्ती येथे आपल्याला बघायला मिळते. स्वामींचे जसे जन्मस्थान आहे तसेच त्यांचे बंधू प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज यांचे देखील हेच जन्मस्थान आहे. त्यामुळे त्यांचे देखील सुंदर असे छायाचित्र येथे लावले आहे.
प. प. स्वामींच्या पत्नी अ. सौ. अन्नपूर्णाबाई यांची समाधी श्री क्षेत्र गंगाखेड जिल्हा परभणी येथे आहे. आता येथे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दगडावर अन्नपूर्णा आईंच्या पादुका स्थापन करण्यात आलेल्या असून त्या पादुका देखील त्यांच्या घरी ( अर्थातच स्वामींच्या जन्मस्थानी ) स्थापन केल्या आहेत. जन्मस्थानच्या सभागृहात प. प. स्वामींचे शिष्य परिवार यांची देखील छायाचित्रे लावण्यात आली आहेत. जन्मस्थानी प्रदक्षिणा मार्गात स्वामींचे चित्ररुपात चरित्र लावलेले आहे.
श्री दत्त मंदिर पासून अर्धा कि.मी. अंतरावर श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज ध्यानाला बसत ती गुहा असून याच जागेत महाराजानी श्री दत्तप्रभूंना प्रसन्न करुन घेतले होते. तसेच मंदिरपासून तीन कि.मी. अंतरावर निर्मला नदी असून या जलदेवतेचे नामकरण स्वतः महाराजांनी केलेले होते.
स्वामींच्या जन्मस्थान शेजारी भव्य अशी तीन मजली इमारतीचे असून त्यातील तिस-या मजल्यावर वेदपाठशाळेचे नियोजन आहे. दुस-या मजल्यावर वेदपाठशाळेचे गुरुजी, मंदिरातील पुजारी तसेच आचारी यांची राहण्याची सोय तर तळमजल्यावर भक्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे.
अशा इमारतीच्या बाजूलायेथे येणार्या प. प. यतीं महाराजांना राहण्यासाठी यतिकुटीचे बांधकाम केले आहे. दोन स्वतंत्र खोल्या संडास बाथरुमसह बांधण्यात आल्या आहेत. तसेच छोटासा हॉल भक्तांना यति महाराजांचे विचार एकण्यासाठी म्हणून बांधलेला आहे. अशा स्वरुपाच्या यतिकुटीचे बांधकाम पुर्ण झाले आहे.
सध्या श्री दत्त मंदिर प्रदक्षिणा मंडपाचे काम पूर्णत्वास आलेले असून सुमारे सोळा हजार स्के.फूट जागेत हा मंडप बांधणेत आलेला आहे. मंदिर सभोवतलाचा जवळपास सर्व भाग हा सावलीखाली आलेने पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात सुध्दा भक्तगणांची फार मोठी सोय होणार आहे. भुयारी मार्गाची रचना देखील या जागेत करणेत आलेली आहे. वयोवृध्द, अपंग, ज्येष्ठ भक्तगणांसाठी दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करणेत आलेली आहे.