शके १८१३ वैशाख शुद्ध चतुर्दशीला ‘त्या साध्वीचा‘ आत्मा अनंतात विलीन झाला. तेरा दिवसापर्यंत पत्नीचे सर्व औध्वर्दहीक विधी संपले आणि लगेचच “अनाश्रमी न तिष्ठेत” या शास्त्र वचनानुसार स्वामींनी संन्यास ग्रहण ( ज्येष्ठ शुद्ध १३ ) केला.
संन्यासधर्मानुसार तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस एकाच जागी राहू नये असा संकेत आहे. याला अपवाद आहे तो चातुर्मासाचा कालावधी. संन्यासी जणांचा चातुर्मास हा दोन मासांचाच असतो. हा चातुर्मास आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) ते भाद्रपद पौर्णिमा असा असतो.त्याच प्रमाणे अशावेळी राहण्याचे ठिकाण हे सर्वसाधारणपणे नदी काठी असावे एसा संकेत आहे. त्यामुळे याठिकाणी स्थान व प्रदेश या बरोबरच नदीचे ठिकाण देखील लिहिलेले आहे. तसेच त्यावेळची सामाजिक गोष्टींचा,परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी येथे चातुर्मासांचे शकांबरोबरच इ.सन देखील लिहीलेले आहेत. या काळात एकाच जागी राहायला मिळाल्यामुळे अधिकाधिक स्तोत्र व ग्रंथ निर्मिती महाराजांकडून झाली. एकूण पृष्ठामध्ये हे सर्व लिखाण जवळ जवळ पाच हजार पृष्ठे होईल एवढे आहे. महाराजांचा चातुर्मासांची स्थाने पाहाता संपूर्ण भारतभर प्रवास (अर्थातच पायी प्रवास – आणि टेंब्येस्वामी असल्याने अनवाणी प्रवास ) केलेला आहे.
अ.क्र. | स्थान व प्रदेश | नदी | शके | इ.सन |
१ | श्री क्षेत्र उज्जयिनी, म.प्र. | क्षिप्रा | १८१३ | १८९१ |
२ | श्री क्षेत्र ब्रम्हावर्त, उ.प्र. | गंगा | १८१४ | १८९२ |
३ | श्री क्षेत्र हरीव्दार, उ.प्र. | गंगा | १८१५ | १८९३ |
४ | हिमालय अज्ञात स्थान | गंगा | १८१६ | १८९४ |
५ | हिमालय अज्ञात स्थान | गंगा | १८१७ | १८९५ |
६ | श्री क्षेत्र हरिद्वार, उ.प्र | गंगा | १८१८ | १८९६ |
७ | पेटलाद, म.प्र. | मही | १८१९ | १८९७ |
८ | तिलकवाडा, गुजरात | नर्मदा | १८२० | १८९८ |
९ | श्री क्षेत्र व्दारका, गुजरात | पश्चिमसागर | १८२१ | १८९९ |
१० | चिखलदा, म.प्र. | नर्मदा | १८२२ | १९०० |
११ | महत्पूर, म.प्र. | क्षिप्रा | १८२३ | १९०१ |
१२ | ब्रम्हावर्त, उ.प्र | गंगा | १८२४ | १९०२ |
१३ | ब्रम्हावर्त, उ.प्र | गंगा | १८२५ | १९०३ |
१४ | ब्रम्हावर्त, उ.प्र | गंगा | १८२६ | १९०४ |
१५ | नरसि, महाराष्ट्र | कयाधू | १८२७ | १९०५ |
१६ | बडवाह, म.प्र. | नर्मदा | १८२८ | १९०६ |
१७ | तंजावर (संध्यामंडप), तामिळनाडू | कावेरी | १८२९ | १९०७ |
१८ | मुक्त्याला, आंध्र. | कृष्णा | १८३० | १९०८ |
१९ | पवनी, महाराष्ठ्र | वैनगंगा | १८३१ | १९०९ |
२० | हावनूर,कर्नाटक | तुंगभद्रा | १८३२ | १९१० |
२१ | कुरवपूर(कुरुगड्डी), कर्नाटक | कृष्णा | १८३३ | १९११ |
२२ | चिखलदा, म.प्र. | नर्मदा | १८३४ | १९१२ |
२३ | श्री क्षेत्र गरुडेश्वर, गुजरात | नर्मदा | १८३५ | १९१३ |
श्री प.प. टेंब्येस्वामी महाराजांचा मुक्काम तेविसाव्या चातुर्मासानंतर श्री क्षेत्र गरुडेश्वर येथेच होता. तब्येत देखील वरचे वर बिघडत असे. अखेरीस चोविसाव्या चातुर्मासाच्या आधिच आषाढ अमावास्या संपून प्रतिपदा सुरु होताच श्रीं ना उठून बसण्याची घाई झाली. सिद्धासन घालून देवाकडे तोंड करुन आसनस्थ होऊन, उपदेश केला. प्राणायामाने श्वास रोखून दीर्घ प्रणव उच्चार करुण श्री शांत झाले. दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार शके १८३६ आनंदनाम संवत्सर आर्द्रा नक्षत्र. उत्तरायण श्री समाधी लीन झाले…
यतीश्रेष्ठ संतशिरोमणींचा जन्म आनंदनाम संवत्सरी झाला आणि श्रींनी समाधी ही आनंदसंवत्सरी घेतली. इ.स २३ जून १९१४