चातुर्मास ४ व ५- हिमालय उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९४-९५ शके १८१६-१७

महाराज बद्रिनारायणाचे दर्शनार्थ निघाले. रस्त्यात ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, बद्रिकेदार इत्यादि स्थाने पहात पहात बद्रिनारायणाचे दर्शन केले. प्रत्येक ठिकाणी एक-दोन दिवस, कोठे अधिकही मुक्काम होत असे. बरोबर दक्षिणी ब्राह्मण यात्रेकरू असल्याने भिक्षेची अडचण पडली नाही. हिमालयात बद्रिनारायणाचे दर्शनास जात असता एका ठिकाणी मोठा कडा तुटलेला असून पुढे जाण्यास मार्ग नाही असे पाहून महाराज तेथेच थबकले. इतक्यात कड्यावरून दोघेजण खाली येऊन महाराजांना म्हणाले की, ‘पुढे जाण्यास रस्ता नाही. मागे परत जा. नाहीतर देहपात होईल.’ हे त्या दोघा पुरुषांचे बोलणे ऐकून महाराजांनी त्यांना सांगितले की, ‘देह पडला तरी हरकत नाही. नरनारायणांचे दर्शनार्थ आपण आलो आहो. ते दर्शन झाल्याशिवाय आपण परत फिरणार नाही. पुढे वाट नसेल तर आपण दोघे तिकडून कसे आला?’ हे महाराजांचे निर्धाराचे भाषण ऐकून ते दोघेही पुरुष अदृश्य होऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष नरनारायणप्रभू मुनि दिसू लागले. महाराजांनाही नरनारायणांचे दर्शन घडल्यामुळे आनंद झाला.

बद्रिनारायणाचे मूर्तीचे दर्शन दुरूनच घ्यावे लागते. कारण मूर्ति परिसाची आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे तेथे जवळ जाऊन कोणी लोखंडाचे सोने करतील या भीतीने देवळाचे गाभाऱ्यात यात्रेकरूंना जाण्यास बंदी आहे. पण महाराजांना मात्र असा काही प्रतिबंध न होता त्यांनी अगदी जवळ जाऊन दर्शन व पूजन केले.

गंगोत्रीस गेल्यावेळी तेथे स्नान करताच थंडीने महाराजांचे अंग अगदी गारठून गेले. काही हालचाल होईना. इतक्यात कोणी पेटलेली शेगडी आणून ठेवली. बराच वेळ शेकल्यावर अंगांत ऊब आली. अग्निस्पर्श न करण्याबद्दल श्रीदत्तांची आज्ञा होती. पण या ठिकाणी मात्र ती पाळता आली नाही.

श्रीक्षेत्र हिमालय : उत्तराखंडात. गंगा नदीकाठी.शके १८१६-१७ व १८१७, इस. १८९४-९५ व १८९६. ४ था व ५ वा दोन चातुर्मास झाले परंतु ते अज्ञातवासात झाल्यामुळे माहिती उपलब्ध झाली नाही.

Leave a Reply

seventeen + ten =