चातुर्मास ९ – श्रीक्षेत्र द्वारका गुजराथ, पश्चिम सागर, इ. स. १८९९, शके १८२१

द्वारकेत आल्यावर श्रीशंकराचार्यांच्या शारदा मठात महाराजांचा मुक्काम होता. यावर्षी पाऊस नसल्याने या भागात भयंकर दुष्काळ पडलेला होता. चारा नसल्याने पाच रुपयासुद्धा म्हैस घेण्यास कोणी कबूल होईना. आपापल्या बायका मुलांनासुद्धा सोडून देण्यापर्यंत पाळी आलेली होती. गायकवाड सरकारने त्यावर्षी अडीच लाख रुपये लोकांना अन्नासाठी वाटले होते. महाराजांच्या येण्याने तेथील सर्व लोकांना आनंद वाटून चार्तुमासात मुक्काम येथेच करण्याबद्दल सर्व लोकांनी महाराजांना विनंती केली. त्याप्रमाणे येथेच शके १८२१ सालचा चातुर्मास झाला.

द्वारकेत असताना द्विसाहस्त्री गुरुचरित्राची टीका दहाव्या अध्यायापासून सुरू करून ती पूर्ण केली. मूळ ग्रंथ जवळ नसतानाच ही टीका झाली. मूळ गुरुचरित्र १५ वर्षांपूर्वी माणगावी तयार झाले होते. त्या मूळ श्लोकांचे यावेळी नुसते स्मरण करूनच टीका झाली. याचे स्वत: महाराजांनाही आश्र्चर्य वाटले. त्यासंबंधी महाराजांचे एका पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘आश्विन वद्य ७ शके १८२१ द्वारका, सौराष्ट्र देश, श्रीक्षेत्र द्वारका येथे १४ अध्याय पूर्ण झाले. ही टीका होणे येवढा ह्या व्यक्तीचा अधिकार नाही. रामो हरी करणाऱ्या मुखाचे हे महात्म्य नव्हे. तर श्रीस्वामींचा अनुग्रह व स्वहृदयस्थ स्वमहिमख्यापक श्रीगुरुप्रसाद जाणावा.’ द्वारकेत असतानाच एका गुजराथी गृहस्थांच्या सांगण्यावरून गुरुचरित्रावर महाराजांनी चूर्णिकाही लिहून तयार केली.

यावर्षी या भागात सर्वत्र दुष्काळ असून शिवाय कॉलराही होता. त्यामुळे अनेक माणसे मृत्यूमुखी पडत असत. महाराजांचेबरोबर यावेळी गांडाबुवा होते. त्यांच्याकडून येणाऱ्या पुष्कळ श्रद्धाळू माणसांना महाराजांनी औषध देऊन बरे केले.

Leave a Reply

3 × four =