चातुर्मास १० – श्रीक्षेत्र चिखलंदा मध्यप्रदेश, नर्मदा इ. स. १९००, शके १८२२
वैशाख अमावस्या शके १८२२ रोजी स्वामी महाराज शिनोर वरून चिखलदा ईथे आले या ठिकाणी स्वामी महाराज या पुर्वी आले होते त्यामुळे पुर्वपरिचित मंडळी होतीच. तेथे नर्मदातीरावरील राम मंदिरात महाराजांचा मुक्काम झाला. सकाळी नेहमीप्रमाणे ब्रम्हकर्म शास्त्राभ्यास आणि सायंकाळी पुराण असा नित्य क्रम असे.
नर्मदेच्या पलिकडे बडवाणी म्हणून एक संस्थान आहे, तेथील राजे ठाकोरसाहेब महाराजांचे भक्त होते. सर्व मंडळींनी चिखलद्यास चातुर्मास व्हावा अशी आग्रहाची विनंती केल्यामुळे तेथेच शके १८२२ म्ध्ये महाराजांनी चातुर्मास केला. याचवेळी महाराजांची अनुज्ञा मिळवून, महाराजांनी केलेले गुरुचरित्र सावंतवाडीचे नारोपंत उकिडवे छापीत होते.
चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांनी माघमाहात्म हा प्राकृत भाषेतील ओवीबध्द ग्रंथ लिहला ह्यात तिनशे त्रेचाळीस ओव्या असून प्रत्येक ओवीचे आद्याक्षर हे श्रीदत्त असे आहे असा हा वैशिष्ठपुर्ण ग्रंथ चिखलदा मुक्कामी लिहला. चिखलदा ला मुक्काम नर्मदा तिरावरील राम मंदीरात होता. चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांच्या भेटीला सावंतवाडीचे विनायकराव चिटणीस ह्यांना खाल्लेले अन्न पचत नसल्याने ते स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांना नमस्कार करून सर्व वृतात कथन केला तेव्हा महाराज म्हणाले कुलदेवतेची आराधना तुमच्या कुळातील माणसांकडून योग्य प्रकारे घडत नाही त्यामुळे आपणास त्याचा त्रास होतो तरी मी आपणास दत्तमंत्र व देवी मंत्र देतो. त्याचे नित्य पठण करावे व कुलदेवतेला नित्य स्मरावे शिवाय गोरखचिंचेतून काही औषधे दिली त्यामूळे चिटणिसांची तब्बेत हळूहळू पूर्ववत झाली त्यांनतर ते स्वामी महाराजांच्या दर्शनास नित्य येऊ लागले.
चिखलदा चा चातुर्मास संपताच स्वामी महाराजांनी चिखलदा सोडायचे ठरविले त्यावेळी त्यांना तेथिल एकाने सोबत पंचाग देऊ केले कि जेणे करून एकादशी वगैरे तिथी पाहता येईल त्यावर स्वामी महाराज म्हणाले प्रवासात कशाचेच ओझे नको काडी घेऊन जमीनीवर हिशोब केला की एकादशी कळून येते. तिथून स्वामी महाराज मंडलेश्वरला आले.
