चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांनी माघमाहात्म हा प्राकृत भाषेतील ओवीबध्द ग्रंथ लिहला ह्यात तिनशे त्रेचाळीस ओव्या असून प्रत्येक ओवीचे आद्याक्षर हे श्रीदत्त असे आहे असा हा वैशिष्ठपुर्ण ग्रंथ चिखलदा मुक्कामी लिहला. चिखलदा ला मुक्काम नर्मदा तिरावरील राम मंदीरात होता. चिखलदा मुक्कामी स्वामी महाराजांच्या भेटीला सावंतवाडीचे विनायकराव चिटणीस ह्यांना खाल्लेले अन्न पचत नसल्याने ते स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांना नमस्कार करून सर्व वृतात कथन केला तेव्हा महाराज म्हणाले कुलदेवतेची आराधना तुमच्या कुळातील माणसांकडून योग्य प्रकारे घडत नाही त्यामुळे आपणास त्याचा त्रास होतो तरी मी आपणास दत्तमंत्र व देवी मंत्र देतो. त्याचे नित्य पठण करावे व कुलदेवतेला नित्य स्मरावे शिवाय गोरखचिंचेतून काही औषधे दिली त्यामूळे चिटणिसांची तब्बेत हळूहळू पूर्ववत झाली त्यांनतर ते स्वामी महाराजांच्या दर्शनास नित्य येऊ लागले.

‘गुरुस्वामी नारायणानंद सरस्वती हे आजारी आहेत, त्यांची सेवा करण्यास जावे’ असे देवांचे सांगण्यावरून महाराज मंडलेश्र्वराहून निघाले व फाल्गुन अखेर इंदूर येथे पोचले. महाराज गावाबाहेर आले हे समजताच सर्व प्रमुख ब्राह्मण मंडळी स्वागतासाठी बाहेर आली व सर्वांनी साष्टांग नमस्कार करून गावात येण्याविषयी महाराजांना आग्रहाची विनंती केली. ‘आपण शहरात राहत नाही. अडचणी असतात’ असे महाराजांनी सांगितले. तेव्हा त्या सर्व अडचणी दूर करतो. आपण यावे असा मंडळींचा आग्रह पाहून चार दिवसच मुक्काम राहील असे महाराज म्हणाले.

एका गृहस्थाने विचारले की, ‘आपण देवस्वरूप झाला. आता आपणास ही मूर्तिपूजा कशाला पाहिजे?’ हे ऐकून महाराज म्हणाले की, ‘ज्या मूर्तीच्या पूजेने ही स्थिती मिळाली त्या मूर्तिला विसरणे योग्य कसे होईल? तथापि तसा श्रद्धावान कोणी पूजा करणारा भेटला तर ही मूर्ति त्याला देता येईल.’

उज्जनीस गेल्यावर महाराजांनी गुरुस्वामींची सेवा उत्तमप्रकारे केली. त्यांना औषधोपचार करून बरे केले. तेथेही मंडळींची उपाधी मागे होतीच. तेथे श्रीमद्भागवत सांगणे सुरू झाले. पुराण श्रवणास पुष्कळ मंडळी जमू लागली. गुरुस्वामींना किंचित् याबद्दल हेवा वाटू लागलेला पाहून शेवटी त्यांना मनस्ताप देणे नको असा महाराजांनी विचार केला व आता त्यांची प्रकृतीही बरी झाली होती. त्यामुळे तेथे राहण्याचे काही कारण उरले नाही. तेव्हा महाराज उज्जनीहून गुरुस्वामींची आज्ञा घेऊन निघाले आणि वैशाख मासात महत्पूर येथे येऊन पोचले.

Leave a Reply

2 × three =