चातुर्मास ११ – श्रीक्षेत्र महत्पूर मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ. स. १९०१, शके १८२३

महत्पूर येथे मंडळींच्या आग्रहावरून महाराजांनी चातुर्मास करण्याचे ठरविले. सुमारे सहा महिने त्यांचा तेथे मुक्काम होता. तेथील मंडळींच्या सांगण्यावरून महाराजांनी दत्त पुराणांतील सर्व कथांचा संग्रह करून दत्तमहात्म्य या नावाचा एक प्राकृत ओवीबद्ध, रसाळ असा ग्रंथ केला व तेथेच त्रिशती गुरुचरित्र म्हणून तीनशे श्लोकांचे एक संस्कृत काव्यही तयार केले. या ग्रंथाबद्दल महाराजांचे पत्र असे आहे, ‘श्रा. शु. ११ – काही लोकांचा येथे आग्रह असा होता की, सविस्तर दत्तमहात्म्य असावे. त्यावरून ओवीबद्ध तृतीयाष्टकापासून सहाव्या अध्यायापर्यंत ओव्या लिहिल्या. प्राय: प्रत्यही १०८ होत गेल्यामुळे तेवढाच अध्याय ठेवला. उद्या ५०वा अध्याय पुरा होईल. सुमारे साडेपाच हजार ग्रंथ झाला. आता पुढे लिहिण्याची इच्छा होत नाही. नारायण.’

सटीक गुरुचरित्र छापून झाल्यावर सावंतवाडीहून सप्रे यांनी महाराजांचेकडे पाठविले ते अशुद्ध बरेच राहिले, काय करावे असे विचारले. त्यावर महाराजांचे पत्र असे आहे, ‘श्रा. व. ११ महत्पूर, छापलेल्या पुस्तकात अशुद्धे राहिली तरी राहोत. ‘गच्छत:स्खलनं क्वापि’ हा न्याय सर्वत्र आहेच. शुद्धिपत्र मात्र द्यावे म्हणजे झाले. नारायण.’

Leave a Reply

4 × 5 =