चातुर्मास १२ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा. इ. स. १९०३, शके १८२४
ब्रह्मावर्त क्षेत्रात चैत्र शु॥ १३ दुपारच्या वेळी महाराज येऊन पोचले. ही येथे येण्याची तिसरी खेप. यावेळी याठिकाणी अडीच वर्षे मुक्काम झाला. म्हणजे लागोपाठ तीन चातुर्मास येथे झाले. अंताजीपंत यांच्या घाटावरील राम मंदिरातच महाराज राहत होते. दोन खोल्या व मध्ये सोपा असे घरासारखेच हे राम मंदिरात आहे. महाराज आले असे समजल्याबरोबर पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास धावून आली. कुशल प्रश्न वगैरे झाल्यावर सर्वांना आजपासून अध्ययनाकरिता या असे त्यांनी सांगितले. नंतर गंगेवरून महाराज स्नान करून आले व नित्यकर्म आटोपून भिक्षेस गेले. तीन घरची भिक्षा आणून ती सेवन केली. इतक्यात अध्ययनाकरिता मंडळी आलीच. त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे उपनिषदे, भाष्य, पंचदशी, जीवन्मुक्तीविवेक, मनुस्मृति इत्यादि विविध ग्रंथांचे अध्यापन महाराज करीत असत. लहान मुलांना संध्यादि ब्रह्मकर्म व काही काव्यही सांगत असत. वैदिक मंडळीही तेथे येऊन पदे सर्वानुक्रम वगैरे शिकत.
ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला. त्यावेळी त्याच्या आईला कोणी तरी असा उपाय सांगितला की ‘तुम्ही पंचपक्वान्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खावयास घाला म्हणजे तुमचा मुलगा बरा होईल.’ हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटरावला भिक्षेला बोलावून खाऊ घातले. याने आप्पाला बरे वाटले.
महाराजांनी सांगितलेले नाममंत्र –
१ सप्ताह – शिवहरशंकर गौरीशंकर
२ सप्ताह – हरेराम हरेराम राम राम हरे हरे । हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
३. सप्ताह – श्रीपादश्रीनृसिंहस्वामी । श्रीमद्दत्तात्रेयमौनी
४ सप्ताह – गणेश गौरीहरनंदन । विघ्नविनाशन गजानन
५ सप्ताह – हरिहर गणपती भास्करशक्ति स्वरूप ईशो वरदो जयति ।
६ सप्ताह – जय पुरुषोत्तम । शरद सत्तम
७ सप्ताह – शिवहरशंकर । गौरीशंकर
याप्रमाणे सात सप्ताह झाल्यावर ‘दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ या नाममंत्राचा सप्ताह केला.
पुढे दशाहारार्थ भागीरथीप्रीत्यर्थ एक सप्ताह केला. ‘भागीरथीशी जय पावन गंगे । जान्हवि तारय पातक भंगे’ या मंत्राने तो नववा सप्ताह झाला.
