चातुर्मास १५- नरसी महाराष्ट्र, नदी- कायधू, इ. स. १९०५, शके १८२७
महाराजांची शके १८२७ चा चातुर्मास आषाढ पौर्णिमेपासून नरसी येथें सुरू झाला. त्यादिवशीं व्यासपूजा झाली. एक महिनाभर प्रथम महाराजांची योग्यता येथील मंडळींच्या लक्षात आली नाही. त्याप्रमाणे एक महिना महाराजांना विशेष उपाधी झाली नाही. पुढे मात्र मंडळी फार जमू लागली. तेथे महाराजांची बसण्याची जागा अगदी लहान असल्यामुळे मंडळींना आत प्रसादास जाता येईना. तेव्हा फार गर्दी झालेली पाहून दुसरे रूप घेऊन महाराज बाहेर येऊन अश्वत्थाच्या पारावर बसले. आतील लोक बाहेर आल्याबरोबर त्यांना महाराज दिसले व बाहेरच्या मंडळींनाही आत दिसले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नरसी हे गाव लहान असले तरी महाराजांच्या वास्तव्याने त्याला मोठ्या क्षेत्राची शोभा आली. महाराज सकाळी गंगेस जात, त्यावेळी लोक दर्शनास येत. त्यांची हकीकत तेथेच ऐकून त्यांना लगेच उपाय सांगितला जात असे. पुढे पुढे तेथील मंडळीही महाराजांच्याबरोबर कयाधू नदीवर स्नानास जाऊ लागली. दोन तीनशेपर्यंत स्नानास जाण्याच्या मंडळींची संख्या झाली. महाराजांनी वर स्नान केल्यावर खाली सर्वांनी स्नान करावे. महाराज स्नान करून परत येतानाही कित्येक मंडळी आपल्या घरासमोर दर्शन करीत.
नरसीस असताना महाराज एके दिवशी माध्यन्हसमयी नदीवर स्नानास एकटेच गेले होते. त्याचवेळी एक बाई पाणी आणण्याकरितां नदीवर गेली. तो तिला असा चमत्कार दिसला की, “तिरावर महाराज एका झाडाखाली मांडी घालून बसले आहेत. मांडीवर सुंदर सहा महिन्यांचे बाळ आपल्या डाव्या हाताचा अंगठा तोंडात धरून महाराजांकडे पहात आहे आणि महाराजही त्याच्याकडे सारखे पहात आहेत.” हा चमत्कार पाहून तिला पाणी नेण्याची शुद्ध न राहून तीही त्या दृष्याकडे एकाग्र चित्ताने पाहात राहिली. काही वेळाने महाराजांची नजर सहज त्या बाईकडे गेली त्याबरोबर ते बाळ दिसेनासे झाले व ती बाई एकदम मूर्च्छित होऊन खाली पडली. महाराजांनी त्या बाईजवळ येऊन तिच्या तोंडात पाणी घालून तिला सावध केले आणि “तू पुण्यवान आहेस. ही हकीगत कोणाला सांगू नकोस, जा.” असे सांगितल्यावर ती बाई पाणी घेऊन घरी गेली. पुढे तिच्या तोंडून सर्व लोकांना ही हकीगत कळल्यामुळे फार विस्मय वाटला.
पुढे महाराजांचा मुक्काम नरसीला असल्याचे समजल्यावरून नृसिंहवाडीची पुजारी मंडळी नरसी मुक्कामी येऊन त्यांनी वाडीत घडलेली हकीकत महाराजांचे कानावर घातली. तेव्हा पालखीतून खाली येण्याचे कारण महाराजांनी देवांना विचारले असता देवांनी क्रोधयुक्त मुद्रा करून सांगितले की, पुजारी लोक तू घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागत नसून उलट तुझी निंदा करतात. माझ्या पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात. तरी पंच नेमून परभारे व्यवस्था ठेवली पाहिजे. तेव्हापासून करूणात्रिपदी वाडीस रोज पालखीपुढे म्हणतात. महाराजांचे आज्ञेप्रमाणे इष्ट ते वर्तन न सुधारल्यामुळे वारंवार संकटाचे प्रसंग येतात.
प्रयागहून निघून महाराज वैशाखारंभी ब्रह्मावर्तास येऊन पोचले. तेथे यावेळी महाराजांचा मुक्काम १० दिवस झाला. रात्री रोज भजन होत असे. ओंकारेश्वराहून निघून महाराज बढवाईस आले. गावात फक्त तीनच मुक्काम केले. तेथून नर्मदा तटाकी, खेडेघाटी धर्मशाळेत येऊन राहिले व त्या वर्षीचा चातुर्मास महाराजांनी तेथेच केला.
