चातुर्मास १६- बढवाई मध्यप्रदेश, नदी- नर्मदा, इ. स. १९०६, शके १८२८

बढवाई हे गाव इंदूर संस्थानात नर्मदातीरावर आहे. तेथे खेडेघाटी धर्मशाळेनजीक एका झोपडीत राहण्याचे महाराजांचे ठरले. ती झोपडी दुरूस्त केली. गावापासून दोन मैल अंतरावर हे स्थान नर्मदातटाकी एकांतात आहे. लोकांची उपाधी नको म्हणून महाराज तेथे येऊन राहिले, पण तेथेही गर्दी झालीच. एकदा महाराज गर्दीस कंटाळून अरण्यांत जाऊन बसले. तेथेही लोक आलेले पाहून महाराज म्हणाले, “जंगलात गेलो तरी हे लोक सोडीत नाहीत तरी आता जावे तरी कोठे?” तेव्हा देव म्हणाले की, “तू कुठेही गेलास तरी लोक असेच मागे लागणार; तरी जंगलात न जाता गावाजवळच राहा.” महाराजांचा चातुर्मास यंदा बढवाईस आहे हे समजताच ठिकठिकाणची मंडळी दर्शनास येऊ लागली.

धर्मशाळेत नेहमी दोनशेपर्यंत मंडळी असत. सर्वांची जेवणाची व्यवस्था तेथेच केली जात असे. भिक्षेपूर्वी थोडा वेळ असल्यास महाराज ध्यानस्थ बसत. कोणाला औषधे, कोणाला बाधानिवारणार्थ उपाय, संतती, संपत्ती वगैरेवर उपाय, मंत्र, यंत्र, व्रते, प्रदक्षिणा इत्यादी उपाय सांगण्यातच संध्याकाळ होऊन जाई. नंतर सायंसंध्या वगैरे झाल्यावर भगवद्भभजन मध्यरात्रीपर्यंत चालत असे. विष्णुबुवा, गोपाळबुवा, रामभाऊ व इतरही हरिदास वगैरे मंडळी भजनात इतकी रंगून जात असत की, त्यावेळी ती प्रेमाने नाचत असत. महाराजांनाही ते प्रेमळ भजन ऐकून आनंद वाटत असे.

Leave a Reply

eighteen + sixteen =