शके १८२८ आश्विन व॥ ६ दिवशी दुपारी ११-१२ वाजता महाराज नरसोबाचे वाडीस येऊन पोचले. मंडळी सारखी महाराजांची वाटच पहात होती. महाराज गावाबाहेर आल्याबरोबर त्यांना गावच्या सीमेवरून मोठ्या समारंभाने वाजत गाजत आणावे असा वाडीच्या मंडळींचा विचार होता. पण महाराज एकदम श्रीदत्तपादुकांसमोर येऊन राहिल्यावर मग सर्व गावात महाराज आल्याची वर्दी गेली. तशा दुपारच्या जेवणाच्या वेळी देखील ही बातमी समजताच गावातील लहान थोर सर्व मंडळी घाटावर महाराजांच्या दर्शनार्थ जमा झाली. महाराज खाली श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेऊन वर येताच सर्व मंडळींनी साष्टांग वंदन करून डोळे भरून ती दिव्य मूर्ति पाहून घेतली व नंतर सर्व आपापल्या घरी परतले. महाराज ब्रह्मानंदस्वामींच्या मठात येऊन उतरले. नंतर आलेल्या मंडळींबरोबर थोडे बोलणे झाल्यावर माध्यान्हिक आटोपून भिक्षा झाली.

यावेळी महाराजांचा मुक्काम वाडीत सुमारे दोन महिनेपर्यंत होता. तोपर्यंत हजारो रूपये मिळाले. हे सर्व द्रव्य तेथील पुजारी मंडळीच घेत असत. समोर नारळ, केळी वगैरे कोणी ठेवल्यास महाराज त्यांना स्वत: प्रसाद देत. पण त्यात काही पैसे कोणी ठेवले असल्यास तो प्रसाद दुस-याकडून देववीत. वरती द्रव्य ठेवलेले पाहून “हा केर तुम्ही केव्हा काढणार” असे पुजा-यांना महाराज विचारीत असत. बारा वाजल्यावर महाराज भिक्षा घेण्याकरिता निघत. पाच घरी भिक्षा घेतली जाई. लोक आपल्या दारापुढे सडा घालून रांगोळ्या काढून महाराजांची वाट पहात असत. बरोबर श्रीनृसिंहसरस्वतीही असत. भिक्षा घेऊन ती श्रीनारायणस्वामींचे मठात किंवा ब्रह्मानंदांचे मठात संपवीत असत. ‘अष्टौ ग्रासा मुनेर्भक्ष्या:’ या वचनास साजेल असाच महाराजांचा नित्य आहार असे. तिखट, गोड वगैरे तर वर्ज्यच. भिक्षा झाल्यावर ती पत्रावळ काढून जागा सारविण्याकरितां नित्य अनेक स्त्रियांची अहमहमिका सुरू होत असे.

महाराज सायंकाळपर्यंत समाधीतच होते. पण असा एक चमत्कार झाला की, बेळगावचे बालकुंद्रीकर वाडीस आले होते. त्यांच्या पत्नींनी त्यादिवशी सकाळी येऊन महाराजांना भिक्षेचे निमंत्रण दिले होते व त्या दुपारी स्वयंपाक तयार करून महाराजांची वाट पहात बसल्या. त्याचवेळी महाराज दुसरे रूप धारण करून भिक्षेस निघाले. काही मंडळीही त्यांच्या पाठीमागून निघाली. पण रामचंद्रयोगींच्या मंदिरासानिध्य येण्याबरोबर ते रूप अदृश्य झालें. त्याचवेळी गावाबाहेर वेशीतून येणा-या मंडळींना महाराजांचे दर्शन झाले व महाराजांनी प्रसादही दिला.

एकदा सातवळेकरांनी महाराजांना विचारले की, ‘आपणास पुनर्जन्म आहे काय?’ तेव्हा महाराज म्हणाले की,‘होय, हा तर अरूणोदय आहे.’

वाडीहून दोन मैलावर मोठा म्हणून अरण्य कृष्णातीरावर आहे. त्याठिकाणी एका साधू पुरुषाच्या सांगण्यावरून वाडींतील मंडळी कार्तिक पौर्णिमेनंतर वनभोजनास जात असत. यावर्षी सर्वांच्या आग्रहावरून महाराजही तेथे गेले होते. बरोबर नृसिंहसरस्वती वगैरे शिष्यमंडळी होती. वाडींतील प्रसिद्ध प्रासादिक पुराणिक वक्रतुंडबुवा कवीश्वर हेही बरोबर होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ हे भजन महाराज बाहेर निघाले म्हणजे होत असे. त्याप्रमाणे भजन करीत मंडळी महाराजांचेसह मळ्यात पोचली. नंतर महाराजांची भिक्षा व सर्वांची भोजने झाल्यावर वक्रतुंडबुवा कवीश्वर यांनी पुराणसेवा केली. महाराजांचा अधिकार पूर्णपणे जाणणारे ते होते. त्यांनी त्यादिवशी भविष्यपुराण व इतरही पुराणांतील वचनांवरून श्री दत्तात्रयांचे कलियुगांत श्रीपादश्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती व योगिराज असे जे तीन अवतार होणार त्यापैकी पहिले दोन अवतार होऊन गेले, तिसरा योगिराज म्हणजेच महाराज आहेत असे अत्यंत श्रद्धापूर्वक प्रतिपादन केले. पण महाराज ते कशाला अंगाशी लावून घेतील? त्यांनी त्यावेळी सांगितले की, ‘योगिराज अवतार अद्यापि व्हावयाचा आहे. आपल्यावर उगीच हा आरोप नको’ हे महाराजांचे वाक्य ऐकूनही भाविक मंडळींची श्रद्धा तशीच कायम राहिली.

नंतर रामेश्वराहून आषाढ शुद्ध द्वितीयेस निघाले ते दोन अडीचशे मैलांचा प्रवास १०-१२ दिवसात करून आषाढ शुद्ध चतुर्दशीचे दिवशी तंजावरास येऊन पोचले. तंजावरास विमलांबा देवीचे रम्य स्थान पाहून महाराजांचे मन रमले. तेथे कावेरी नदी असून जवळच संध्या मठ आहे. तेथे महाराज राहिले. कावेरी नदीचे नाव येथे वेणू नदी असे आहे.

Leave a Reply

5 + 19 =