चातुर्मास १८- मुक्त्याला आंध्रप्रदेश, नदी- कृष्णा, इ. स. १९०८, शके १८३०

मुक्त्याला येथील ब्राह्मण सदाचारसंपन्न, विद्वान आहेत हे पाहून महाराजांना हे स्थान पसंत पडले. तेथे सर्व तेलंगी ब्राह्मण राहात असून त्यांच्या स्त्रियासुद्धा उत्तम संस्कृत ज्ञानी आहेत. तेथील लोकांची भाषा जरी तेलगु व द्रविडी होती तरी संस्कृत भाषा पुष्कळ लोकांना येत असल्यामुळे महाराजांना काही अडचण भासली नाही. महाराजांचे अगाध ज्ञान पाहून तेथील सर्व मंडळींच्या मनात त्यांच्याविषयी आदर उत्पन्न झाला. तेथेच शके १८३० आषाढ पौर्णिमेस महाराजांनी व्यासपूजा करून चातुर्मास केला, तेथे विशेष कोणी मंडळींचे फारसे येणे नसल्याने महाराजांना विश्रांतीही चांगली मिळाली. तेथील मुक्कामातच युवशिक्षा, वृद्धशिक्षा व स्त्रीशिक्षा हे ग्रंथ महाराजांनी केले.

शृंगेरी मठाचे शंकराचार्य महाराजांचा मोठा आदर ठेवत असत. त्यांनी महाराजांची भेट झाल्यावेळी महाराजांनी केलेले ग्रंथ काही बरोबर असल्यास मागितले. तेव्हा बरोबर काहीच ग्रंथ नव्हते म्हणून महाराजांनी एक ‘मंत्रगर्भ स्तोत्र’ तेवढे आचार्यांना लिहून दिले. ते पाहून अत्यंत संतोष होऊन मागाहून पुस्तके पाठविण्यास आचार्यांनी महाराजांस सांगितले. पुढे दत्तमाहात्म्य, गुरुचरित्र वगैरे ग्रंथ शृंगेरीस पाठविले गेले. तसेच एक स्तोत्र करून ते आचार्यांजवळ राहणारे ब्रह्मानंदसरस्वती यांचेजवळ दिले व ते आचार्यांना वाचून दाखविण्यास सांगितले. ब्रह्मानंदसरस्वतींच्या विनंतीवरून पूर्वी कबूल केल्याप्रमाणे महाराज राजमहेंद्रीस आले. तेथे आचार्यांच्या मठात मुक्काम झाला. ब्रह्मानंदसरस्वतींनी त्या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्रिमुखी दत्तमूर्तीची व दत्तपादुकांची स्थापना महाराजांच्या हाताने करविली.

ज्येष्ठ मासाच्या अखेरीस, वेनगंगेच्या तिरावर असणा-या पवनी या गावात येऊन दाखल झाले. प्रथम तेथील लोक महाराजांना गावात राहूसुद्धा देईनात. तेव्हा महाराज तेथील विठ्ठल मंदिरात राहिले व गांडाबुवा मुरलीधरांचे मंदिरात राहिले.

Leave a Reply

2 × three =