चातुर्मास १९- पवनी महाराष्ट्र, नदी- वैनगंगा, इ. स. १९०९, शके १८३१

या वर्षीचा चातुर्मास पवनीसच करण्याचे महाराजांनी ठरवून त्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा झाली. प्रथम महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे तेथील मंडळींकडून महाराजांस फार त्रास झाला उन्मत्तपणे वाटेल तसे महाराजांना बोलणे, भिक्षेचीसुद्धा व्यवस्था न करणे असे प्रकार तेथील मंडळींनी आरंभी केले. पण ते सर्व महाराजांनी शांतपणे सहन केले. पवनीस पद्यावरी पुरी असे पुराणांतरी नाव आहे. तेथे वेनगंगा नावाची नदी आहे. महाराजांनी वेनगंगेच स्तोत्र केले आहे.

याप्रमाणे ठिकठिकाणची मंडळी महाराजांचे दर्शनास येऊ लागलेली पाहून मग मात्र पवनीच्या मंडळींचे डोळे उघडले. नंतर त्यांनी महाराजांची क्षमा मागितली व ते सर्व महाराजांचे पूर्ण भक्त बनले. बाहेरून हजारो लोक पवनीस येऊ लागले. त्यावेळी पवनीच्या आसपासच्या गावातून प्लेग जोरात होता. दूषित हवेतून मंडळी येतात त्यामुळे आपल्याही गावात हवा बिघडण्याची भीति आहे असे सर्वांना वाटू लागले. इतक्यात गांडाबुवा रहात होते त्या मुरलीधराच्या देवळात उंदीर पडल्याची वार्ता महाराजांचे कानावर गेली. महाराजांनी लगेच श्रीदत्तमहाराजांची प्रार्थना केली की,‘ प्रभो ! आपल्या आज्ञेप्रमाणे येथे चातुर्मासास आरंभ झाला असून सर्व बालगोपाळ मंडळी येथे दर्शनाकरिता जमली आहेत. यापैकी कोणी मेला तर आपणास न्यूनता येईल. म्हणून आपणास चातुर्मास संपण्यापूर्वीच निघून जाणे भाग आहे’ हे ऐकून देवांनी सांगितले की,‘चातुर्मास संपेपर्यंत येथे कोणालाच त्रास होणार नाही तरी चातुर्मास सोडून जाऊ नये.’

महाराज पवनीस आले. त्यावेळी प्रथम वैजनाथाच्या देवळात तीन दिवस राहिले. नंतर दशपुत्रे यांच्या विठ्ठल मंदिरात राहाण्यास गेले. पहिल्या दिवशी नाईकांच्या घरी भिक्षेस गेले, पण ते गुजराथी असल्याचे समजल्यामुळे भिक्षा तशीच ठेवली. दुसरें दिवशीही काही कारणाने उपवास घडला. तिसरे दिवशी भटांचे घरी भिक्षेस गेले असता त्यांनी महाराजांची फारच चौकशी चालविली, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले ‘आलेल्या अतिथीस भिक्षा घालणे एवढे गृहस्थाचे काम आहे. जास्ती विचारपूस करू नये’ असे महाराज बोलत असता इतक्यात भटांची उमरेड येथे दिलेली मुलगी उमाबाई बाहेर आली. तिने महाराजांना ओळखून सर्व लोकांना त्यांनी माहिती करून दिली. तिला ब्रह्मावर्त मुक्कामी महाराजांचे दर्शन झाले होते. नंतर ती स्वत: महाराज रहात होते त्या देवळात जाऊन रोज झाडलोट करू लागली.

रोज लोक महाराजांनी गंधाची उटी वगैरे लावून महाराजांची महापूजा करीत असत व भोजनाचा भंडाराही बराच मोठा होत असे. सर्व जातींच्या लोकांना भरपूर अन्न मिळत असे.

पवनी येथील एका बाईचा नवरा रागाने घरातून निघून गेला होता. बारा वर्षे झाली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. ती बाई अत्यंत दु:खात दिवस कंठित होती. तिने एकदा महाराजांचे दर्शनास येऊन आपले दु:ख सांगितले. तिच्याकडे फक्त एकदा महाराजांनी पाहिले आणि तिला सांगितले की,‘ बाई! लवकरच तुमचा नवरा घरी परत येईल’ असे तिला सांगून एक मंत्र लिहून दिला व त्याचा रोज मानसिक जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने श्रध्देने जप सुरू करताच एक महिन्यातच ‘आपण लवकर’ येतो असे तिच्या नव-याचे पत्र आले व त्याप्रमाणे पुढे तो घरी येऊन राहिला.

नरसोबाचे वाडीतील पुजारी संकटाने त्रासून महाराजांचे दर्शनास पवनीस आले होते. एकदा पंगत जेवणास बसली असता त्यांनी सत्याग्रह केला. ते म्हणाले, ‘आमचे संकट दूर करण्याकरितां आपण जर वाडीस येण्याचे वचन दिले तरच आम्ही भोजन करू. आम्ही भोजन न करता व वाडीलाही न जाता वाट फुटेल तिकडे जाऊ.’ हे ऐकून महाराजांनी देवांजवळ प्रार्थना केली. देवांनी सांगितले, ‘आता चातुर्मास संपताच उत्तरेकडे न जाता वाडीकडे जावे.’ ही देवांची आज्ञा महाराजांनी पुजा-यांना कळविताच त्यांचे समाधान झाले व नंतर सर्वांनी आनंदाने भोजन केले.

महाराजांना भेटण्यासाठी येतो असा उमरावतीच्या गुलाबराव महाराजांनी एकदा निरोप पाठवला होता. तेव्हा महाराजांनी त्यांना परत कळविले की, ‘तुमचे आमचे अंतरंगात प्रेम आहेच. करिता प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही.’ गुलाबराव हे सखीसंप्रदायातील असून स्त्रीवेष घेत होते. तरी असे नटदर्शन महाराजांना नको होते.

कोल्हापूर प्रांतातील वडार गावातील नरहरी दिवाण हे वाडीस महाराजांचे जवळ येऊन राहिले होते. त्यांच्या मातेकडून एकनाथ महाराज आठवे पुरूष होते. त्यांना महाराजांचे सहवासाने वैराग्य उत्पन्न होऊन ते परमार्थाकडे वळले. पंधरा वर्षांचे त्यांचे वय होते. महाराज वाडीहून गेल्यावर ते गाणगापुरास गेले. तेथे स्वप्नात त्यांना श्रीदत्तदर्शन झाले. नंतर पंढरपुरी येऊन त्यांनी हरिहर महाराजांचा अनुग्रह घेतला. हरिहर महाराजांनी संन्यास घेतला. त्यांचे नांवही त्यांचे गुरुंनी ‘वासुदेवानंदसरस्वती’ असे ठेवले होते.

यांनी पायानेच तीर्थयात्रा केल्या. महाराजांचे दत्तपुराण व दत्तमाहात्म्य यावर हे पुराण सांगत असत. हेच पुढे अष्ट्याचे दत्तमहाराज म्हणून प्रसिद्धीस आले. यांची समाधी सांगलीपासून जवळच अष्टे मुक्कामी आहे.

महाराज एकदा सकाळी संगमावर स्नानास गेले. पाण्यात बुडी मारली. ब-याच वेळाने वर आल्यावर सर्वांना हातातून आणलेला कोरडा अंगारा दिला आणि ‘काशीरामेश्वराच्या यात्रेला जाऊन येण्यास इतका वेळ लागला. हा अंगारा तेथलाच आहे’ असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

eight − 6 =