चातुर्मास २२- चिखलंदा मध्यप्रदेश, नदी- नर्मदा, इ. स. १९१२, शके १८३४
चिखलदा हे गाव इंदूर संस्थानामध्ये आहे. नर्मदेच्या अलिकडे बढवाणी संस्थान आहे. तेथील राजे ठाकोरसाहेब महाराजांचे भक्त होते. पूर्वी शके १८२२ चा चातुर्मास महाराजांचा चिखलदा येथे झाला होता. तेथे महाराज येण्याबरोबर सर्व भक्तमंडळी जमली. पौर्णिमेस व्यासपूजा होऊन चातुर्मास सुरू झाला. तेथे नित्यक्रमाप्रमाणे रोज भाष्यपाठदि चालू होते.
चिखलद्यास ६-७ महिने महाराजांचे राहणे झाले. तेथून निघाल्यावर नर्मदा किनारी कारतखेडा या गावी महाराज जात असता जिंतूरची अग्निहोत्रबुवा वगैरे मंडळी रस्त्यात भेटली, त्यांना पहाताच महाराज म्हणाले की, ‘अग्निहोत्रबुवा ! तुमची इच्छा गायत्रीपुरश्चरण करण्याची असेल तर ती लवकर पूर्ण करा, पण अन्नसंतर्पणात तुपाची कसर बिलकुल करू नका.’ हे ऐकून अग्निहोत्रबुवा म्हणाले, ‘आपणाजवळ पैसा नाही तर हे कसे घडावे?’ महाराज म्हणाले, ‘पैशाची काळजी नको. ते आपोआप त्यावेळी मिळतील आणि देवाच्या कार्यासाठी ऋण काढले तरी हरकत नाही. त्याची जबाबदारी देवावर राहील.’ हे ऐकून अग्निहोत्रबुवा म्हणाले की, ‘आपल्या कृपेने अग्निनारायणाची सेवा निर्विघ्न चालू आहे. तसे हेही कार्य पार पडेल, पण महाराजांनी या कार्याचे वेळी आले पाहिजे.’
महाराज चिखलद-याहून निघाले ते कातरखेडा येथील शूलपाणीश्वरास वंदन करून गरुडेश्वराकडे निघाले. शूलपाणीश्वराचे जंगलात अश्वत्थामा वास करतो. ते फारच घोर अरण्य असून धड पाऊलवाट सुद्धा नाही. तेथून जात असता एकदा एका भिल्लाने येऊन महाराजांना विचारले की, ‘आपणास कोठे जाणेचे आहे ? तेव्हा महाराज म्हणाले की, ‘गरूडेश्वरास.’ तो म्हणाला, ‘तर मग माझ्या पाठीमागून या.’ असे सांगून तो चालू लागला व महाराज त्याचे पाठीमागून निघाले. गरुडेश्वर आल्यावर त्याने सांगितले की,‘ते समोर मंदिर आहे तेथे चला,’ असे सांगून तो निघाला. इतक्यात महाराजांना काही संशय येऊन त्यांनी त्या भिल्लास विचारले की, ‘तू कोण आहेस ते खरे सांग.’ तेव्हा तो म्हणाआ, ‘मी अश्वत्थामा असून या जंगलात रहातो.’ असे सांगून तो दिसेनासा झाला. नंतर महाराज गरूडेश्वराच्या देवळाच्या ओट्यावर येऊन उतरले. तो दिवस चैत्र वद्य षष्ठी शनिवार होता.
