हिंदू धर्मात देवाला झोपाविण्याच्या कल्पनेने केलेली आरती म्हणजे जशी शेजारती आहे, तशी देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. सगुण ऊपासनेत देवाला
मनुष्यासारखेच सोपस्कार केले जातात झोपेतून ऊठवण्यासाठी देवाला ह्या भुप रागात आळवत प्रेमाने ऊठवतात त्याच सोबत स्वताच्या अंतःकरणात असलेल्या देवत्वालाही जाग्रूत करण्याचा ह्या भुपाळी मागे हेतू असतो ह्या सगुण ऊपासनेने आपल्यात सात्विक भावाचा प्रत्यय दिवसभर अनुभवयास येतो.
उठी उठी बा मुनिनंदना ही भुपाळी माणगांव येथिल दत्त मंदीरात प्रातःस्मरणी केली जाते.
उठी उठी बा मुनिनंदना
उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।
त्यांची पुरवी तू कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु.॥
उघडुनिया करुणादृष्टी । दासा धरी आपुले पोटी ।
नको येऊ देऊ हिंपुटी । घाली कंठी मिठी हर्षें ॥१॥
हर्षे तुझे पदी रंगले । दारागारा विसरले ।
निजदेहा न भुलले । विनटले निजभावे ॥२॥
निजभावे येता शरण । लपविसी का बा चरण ?
जेणे तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचे ? ॥३॥
नको करु निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।
तू अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥
उठी उठी बा सद्गुरुराया । उठी उठी करुणालया ।
उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरी ॥५॥
