युगे अठ्ठावीस विटेवरी उभा| वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलीकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ||१||
जय देव जय देव जय पांडुरंगा | रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||धृ||

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे रहाती |
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||२||

धन्य वेणुनांद अनुक्षेत्रपाळा| सुवर्णाची कमळे वनमाळा गळां |
राई रखुमाबाई राणीया सकळा| ओवाळीती राजा विठोबा सांवळा |
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||३||

ओवाळु आरत्या कुर्वंड्या येती। चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||४||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती| चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती |
दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती| केशवासी नामदेव भावे ओवाळीती |
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||५||

Leave a Reply

18 − twelve =