श्रीगणेशायनम ।श्रीसरस्वत्यैनम । श्रीगुरूभ्योन्नम ।

श्रीगणेश लंबोदरा सकल विद्यांच्या सागरा । कृपा निधि पार्वती कुमरा । तुझे चरणी नमन माझें ।।१।।
कार्यरंभी तुझे स्मरण । करितां होईल संकट निवारण । म्हणूनि धरिले तुझे चरण कार्य सिद्धि करि आतां ।।२।।

हे सरस्वती वागेश्वरी ।नादब्रम्हा ब्रम्हकुमारी । वीणावाद्य मंजुळ करी तुझे चरणी नमस्कार।।३।।
मुके होती वाचस्पती ।पंगू उल्लंघिती । ऐसी आहे तुझी किर्ती। म्हणूनि धरीले तुझे चरण ।।४।।

ब्रम्हा विष्णू उमाकांत । ज्याचे स्वाधीन आहेत। त्या गुरूसि माझा दंडवत ।साह्य होवो मज ।।५।।
पुण्य खाणी माझी माता । गंगा नामे पतिव्रता । वेदमूर्ती श्रीपाद ताता। यांचे चरणी नमन माझे ।।६।।
मी आहे अल्पमती ।नेणे काव्य व्यत्पुत्ती । यावें तुम्ही साह्यार्थी वदवावे माहात्म्य माझे वाचे ।।७।।

हे देवी माते यक्षिणी ।मागणे मागोते तुझे चरणी । तुझे माहात्म्य रसाळवाणी ।माझे वदवावे ।।८।।
श्रोती असावे सावधान । श्रीदेवी यक्षिणीचे महिमान । पूर्वकथा करितो कथन ।एकचित्ते ऐकवावी ।।९।।

अमरेश्वर संनिधानी । वसताती चौसष्ट योगिनी । त्यातील मुख्य यक्षिणी । देवता तुम्ही जाणा ।।१०।।
दक्षिण काशी करवीर । कृष्णा पंचगंगा संगम थोर। नरसिंह सरस्वती गुरूवर ।राहिले तेथे गुप्तरूपे ।।११।।

कृष्णातीरी अमरेश्वर । तया सन्निध औंदुंबर । वृक्षच्छाये मनोहर ।बैसले होते अनुष्ठानी ।।१२।।
माध्यान्ह काळी योगिनी ।न्यावया येती सदनी । तया सवे श्रीगुरूमूर्ती । जाती त्यांचे नित्य मंदिरी।।१४।।

भिक्षा घेवोनी माघारी ।परतोनि येती औंदुंबरी । आत्मानंदी निरंतरी । रत असती सर्वकाळ ।।१५।।
ऐसे कितिएक दिवस होती । ग्राम लोक आश्चर्य करिती । पाहू म्हणती कैंचा यती ।काय खातो कळेना ।।१६।।

म्हणूनि राहती ग्राम लोक । पहावया यतींचे कौतुक । टेहळे ठविले आणिक ।पाहती अंत यतिचा ।।१७।।
तो माध्यान्हकाळ होता । जनांचे ह्दयी अस्वस्था । भय पावले चित्ता । पळुनि गेले सर्वत्र ।।१८।।

पाहवेना यतिश्वर । भय चकित झाले नर । देव कन्या आल्या सत्वर । सेवेची भिक्षा घेऊनि ।।१९।।
गंगानुज होता तेथ । आपुली वृत्ती राखित । त्याने देखिला दृष्टांत । म्हणे अभिनव कौतुक देखिले ।।२०।।

दुसरे दिवशी त्याच परी । व्दिभाग झाले वारी। गंगेतुनी आल्या नारी । श्रीगुरूसी नेती स्वस्थाना।।२१।।
तया सवे शुद्र गेला आपण ।रत्नखचित शोभाय मान । नगर पाहूनि विस्मित मन ।भयभयीत झाला मानसी ।।२२।।

पाहूनि श्रीगुरू शुद्रासी । म्हणती तू का आलीस । शुद्र म्हणे दर्शनासी । स्वमीचे नी सहज आलो ।।२३।।
श्रीगुरू बोलती शुद्रासी । तू हे न सांगावे कवणासी । जरी तू प्रकट करिसी ।मृत्यू पावसी तात्काळ ।।२४।।

ऐसे किती एक दिवसांवरी । श्रीगुरू होते कृष्णातीरी । पुढे प्रकट व्हावे गाणगापुरी । म्हणूनि निघाले तेथूनि ।।२५।।
श्रीगुरू निघता देखोनि । भेटीस आल्या योगिनी । सद्गुरूसी प्रार्थिती नमूनी । आम्हा आता काय गती ।।२६।।

हास्य वदनी बोलती गुरू । तेथे आहे औंदुबरू । तोचि जाणा कल्पतरू । वास आहे तेथे माझा ।।२७।।
पुढे सांगतो ते ऐका । वृक्षातळी ठेवितो पादुका । तेथे अनुष्ठान करितो जे लोका । त्याना तुम्ही साह्य व्हावे ।।२८।।

ऐसे सांगूनि आपण । श्रीगुरू गेले तेथोन । तेथ पासूनि देवता जाण । अमरेश्वरी राहिल्या ।।२९।।
कर्नाटक देशी शैल्य पर्वती । अवतार करावया समाप्ती । गुरूंचा काल होता निश्चिती । भेटूं आले भक्त गण ।।३०।।

तधी यक्षिणी देवता । भेटीस गेली श्रीगुरूनाथा । स्वामीसि म्हणे हो ताता । आम्हा आता काय मार्ग ।।३१।।
बोलताती नृसिंह मुनि । ऐके देवी यक्षिणी । तू याच देशी वास करूनि । किंचित्काळ असावे ।।३२।।

पुढे योगिराज अवतार । प्रसिद्धि होईल भूमिवर । सांगतो तुजला सविस्तर । स्वस्थ चित्ते ऐकिजे ।।३३।।
पूर्व भागी सह्याद्रि थोर पश्चिमेसि सिंधु सागर । मध्ये देश मनोहर । परशुराम भूमी बोलती ।।३४।।

नाम आहे कोकण ।सुंगर वाटीका जाण । त्यात आहे माणग्राम । वास तेथे करावा।।३५।।
तये ग्रामी टेंब्य़े वंश । माझा भक्त गणेश । त्याचे पोटी ईश्वरी अंश । तोचि योगिराज जाणवावा ।।३६।।

ग्राम आहे ओस । तेथे करावा तू वास । साह्य व्हावे भक्तांस । तपस्वी असती जे कोणी ।।३७।।
ब्रम्हराक्षस वेताळ । पिशाच्च गणांचा मेळ । राहे तेथे सर्वकाळ । मनुष्य मात्रा हिंसती ।।३८।।

म्हणून आहे ओस ग्राम । जधी होईल तुझे नमन । पळतील पिशाच्च राक्षस गण । वास तुझा होताचि ।।३९।।
येथिल एक वैश्य भक्त । जाईल व्यापारार्थ । तयासवे तू जावे तेथ । व्यवस्था होईल तये हाती ।।४०।।

वसवावी गांव रहाटी । भक्त येतील तुझे भेटी । साह्य व्हावे त्यासि संकटी । पुढे तुज सर्व सांगेन ।।४१।।
ऐसे सांगूनि श्रीगुरूमुनि । आपण गेले मल्लकार्जुनी । ऐक्य व्हावया कारणी । गुप्त रूपे राहिले ।।४२।।

ऐसी ऐकुनिया मात । यक्षिणी राहिली कर्नाटकात । तेथील एक धनिक भक्त ।उदिमा करणे निघाला ।।४३।।
तयासवे निघाली । हळूहळू चालत देवबाळी । सवे घेतले गणसकळी । सह्याद्री पातली ।।४४।।

पर्वतशिखरी अत्रिकुमार । राजधिराज योगेश्वर । जो आत्मानंदी निरंतर । निमग्न असे सर्वदा ।।४५।।
ऐशा दत्तात्रेया पाहून । केले साष्टांग नमन । बोले दत्तात्रेय आशीर्वचन । हस्त मस्तकी ठेविला ।।४६।।

देवीसी कल्याण चिंतुनि । म्हणे ऐके देवी यक्षिणी । मी येईन माणग्रामी । भक्तासाठी रहावया ।।४७।।
माणगांवी तुझा वास । जन होतील तुझे दास । त्यासी न करी तूं उदास । कामना पुरवी तयांच्या ।।४८।।

जे तुझे सन्निध तप करिती । त्यांसी होईल फलप्राप्ती । अन्ती मिळेल सद् गती । माझे चरणी लीन होती ।।४९।।
माणगांवीचा विप्रमेळ । विव्दान होईल सकळ । तुझे भक्त होतील सार्वकाळ । दास होऊनि राहत।।५०।।

टेंब्ये कुळी विप्र एक । माझा भक्त गणेश नामक । होईल तुझा उपासक । तुझे सन्निध वास त्यांचा ।।५१।।
त्याची भर्या रमा । पतिव्रता उत्तमा । करिल तुझी उपासना । तुझे चरणा सन्निध ।।५२।।

तिचें उदरी भक्त थोर । होईल प्रसिद्ध योगीवर । करावया जगदोध्दार । येईल ये भूमंडळी ।।५३।।
ऐसी यक्षिणीसी सांगून । दत्तात्रेय बोले आशीर्वचन । गुप्त झाले तेथून । निमिषमात्रे तेधवा ।।५४।।

सवे होता वैश्यनाथ । देवी निघाली मार्गक्रमित । सृष्टिशोभा देखोनि अद् भुत । आश्चर्य पावली मानसी ।।५५।।
अवर्णनीय शोभायमान । देखिले सह्याद्रीचे कानन । मन पावले समाधान । सह्याद्रीतळी पातली ।।५६।।

व्यवस्था सांगून तेथ । पुढे पाठविला वैश्यनाथ । तो हळूहळू मार्गक्रमित । माणगांवी पातला ।।५७।।
ग्राम देखिला वोस । नाही मनुष्यांचा वास । तो देखिला एक दृष्टीस कुंभार आश्रम ते ठायी ।।५८।।

तो कुळाल मृत्तिका भांडी करी । विकावया नेई ग्रामान्तरी । ऐशा रीती उदरी भरी । राहिला एकला ग्रामात ।।५९।।
आश्रम देखोनि नयनी । राहिला तयाचे सदनी । ग्रामपरिस्थिती देखोनि । बोलिला वाणी कुंभारासी ।।६०।।

का रे ग्राम झाला ओस । येथे का नसे मनुष्याचा वास । हा तू सर्व इतिहास । सांग सत्वर मजलागी ।।६१।।
येरू बोले वैश्या कारण । येथे मानव न टिके कोण । दैवे राहिलो मी एकला जाण । ते सर्व कथितो तुजलागी ।।६२।।

भूतवेताळवादि अनेक । ब्रम्हराक्षस भायनाक । ते होत मनुष्य मात्रांचे भक्षक । त्यांचा धाक सर्व जीवा ।।६३।।
मी आहे एकला जाण । माझा पाठिराखा नारायण । सद् भावे त्याचे चरण । आठवूनिया असतो निरंतर ।।६४।।

गावांमध्ये मीच एक । मजवाचुनि नसे आणिक । तू का आलिसि कारणिक । ते सत्वर मज सांगावे ।।६५।।
जरी तू राहशील येथ । रात्री होईल तुझा अंत । मनी आणूनि आपुले हित । जाय सत्वर येथोनि ।।६६।।

ऐकुनि कुंभारवासि वाणी । बोले कुलालासि वाणी । मी राहीन य़े ठिकाणी । गांव तुझा वसविन ।।६७।।
मनी धरू नको चिंता । माझे वाक्य प्रमाणता ही घे भाक माझी आता । साह्य करी मजलागी ।।६८।।

माझे सवे चाले सत्वरी । ग्राम पहू ये अवसरी । जरी होईल रातरी ।तरी कार्य नसेल ।।६९।।
ऐसे सांगूनी कुलालसि । सवे घेतला त्यासी । पाहील्या सर्व ग्राम सेवी । ग्राममध्य योजिला ।।७०।।

मध्यभागी वैश्यनाथ । आपुले नामे लिंग स्थापित । म्हणे कार्य झाले आता येथ । जाऊ सत्वर गृहासि ।।७१।।
कुंभारसवे वाणी । आले दोघेही सदनी । कुंभार गेला स्वयंपाक पाणी । करण्यालागी सत्वर ।।७२।।

पाक तयार झाला म्हणून । अतिथीसि पाचारी तेथून । नये उत्तर परतून । म्हणून आला बहेरी ।।७३।।
तो न दिसे तेथे कोणी ।आश्चर्य वाटेल मनी । भूतापिशच्चे नेला उचलोनी । काय झाले कळेना ।।७४।।

सवे घेवोनि भूत मेळ । चालला ग्राम फिरवया सकळ । तो अकास्मात शिवदूत भेटले ।।७५।।
शिवदूते कथिला वृत्तांत । तुमच्या गावी आले उमाकांत । चला भेटण्यालागी तेथ ।आम्हासवे सत्वर ।।७६।।

ऐकुनि शिवदूतांची वाणी । वेताळ भ्याल मनी । म्हणे का आले येथे शूलपाणी । न कळे याचा भावार्थ ।।७७।।
लोटांगणे निघाला भूतनाथ । स्थापिले होते लिंग येथ । तेथे प्रत्यक्ष गिरीजानाथ ।देखोनी नमस्कार केला ।।७८।।

दंडवत होवोनी प्रार्थना करी ।म्हणजे देवा त्रिपुरारी । का म्हणे झाले येथवरी । न कळे याचा अभिप्राय़ ।।७९।।
जयाजया उमाकांत । पार्वतीशा नीळकंठा । भक्तरक्षका अनाथनाथा । शरण आलो तुझे चरणी ।।८०।।

ऐकुनि भूतेशाची स्तुती । प्रसन्न झाला पशुपती । म्हणे सांगतो आता माझी मती । लक्ष देऊनि ऐकिजे ।।८१।।
तू अद्यापि येथवरी । ये ग्रामी होतासि अधिकारी । आता येथूनि पुढारी ।मानव राहतील ये ठायी ।।८२।।

ये ग्रामीची मुख्य देवता । येत आहे सत्वर आता । आज्ञा आहे श्रीगुरूनाथा । म्हणूनि वास ये ठायी ।।८३।।
तिची मानवी तुम्ही आज्ञा । कधी न करावी अवज्ञा । करूनि ऐशी प्रतिज्ञा । वास करावा ये ठायी ।।८४।।

इतुके सांगुनि गिरीजनाथ । लिंगालयिंय झाले गुप्त । भूतनाथ नत मस्तक । करूनि निघाला तेथोनि ।।८५।।
इकडे जो निघाला वाणी । अवचित कुंभार सदनांतुनि । लागला येऊनि देविची चरणी ।सर्व वृत्तांत निवेदिला ।।८६।।

अंबेसी म्हणे वैश्यनाथ । आम्हा निरोप द्यावाजि येथ । मी जाईन आपुले देशात । कृपादृष्टी असो द्यावी ।।८७।।
बोळवूनि वैश्यनाथ । निरोप दिधला तेथ । देवी हळूहळू मार्ग क्रमित ।यावया निघाली माणगांवी ।।८८।।

गणमेळ होता सांगाती । आनंदे नाचू लागला प्रती । किती एक गायने डोलती । वाद्यगजर करिती एक ।।८९।।
मृदुंग टाळ भेरी । मंजुळ वाद्यांचे गजरी । देवी आली ग्राम सीमेवरी । दूत पाठविले ग्रामता ।।९०।।

निरोप सांगती दूत । ग्रामधिकारीया प्रत । महादेवी आली सीमेत । चला स्वागतार्थ सत्वरी ।।९१।।
ऐसे ऐकुनि ग्रामाधिकारी । स्वागतार्थ केली तयारी । सर्व गणासि बोले सीमेवरी । चला लौकरी स्वगतासी ।।९४।।

पिशाच्चांच अधिपती । करूनिया सर्व आयती । सामोरे चालिला सत्वर गती । अंबेजळी पातला ।।९३।।
देविसी नमस्कारून । उभा ठाकला का जोडून । म्हणे दास मी तुझा आज पासून । होऊन राहीन तुझे आज्ञे ।।९४।।

निशाचरचा धनी । लागला देवीचे चरणी । तेणे अंबा हास्यवदनी ।बोलली तेव्हा निशाचरा ।।९५।।
म्हण रे तू निशाचरचा नायक । तुज दुष्टबुद्धी म्हणती लोक । माझे भक्तासि नसो तुझा धाक । अभक्ता ते शिभाकरी ।।९६।।

जे जपतपादि सादन । करूनि राहती अनुष्ठान । तयासि तू साह्य होऊन । निरंतर असावे ।।९७।।
इतुके बोलोनि माहेश्वरी । वरद हस्त करी ते अवसरी । आनंदी आनंद सर्व भरी । नाचू लागले गण समस्त ।।९८।।

दोन्ही कडील गणमेळ । नाचू लागले सकळ । मृदुंग टाळ आणि ढोल । वाजविती प्रेमानंदे ।।९९।।
यक्षिणीचे गण समस्त । भूत गम मिळाले त्यात । निघाली अंबा गावात । समारंभे करूनिया ।।१००।।

जेथे झाली लिंग प्रतिष्ठा । तया सन्मुख यक्षिणी माता । वाढवावया भक्तांची प्रतिष्ठा । उभी ठाकूनि राहिली ।।१०१।।
चारशत वर्षापूर्वी । आदिमाया यक्षिणी देवी । आलीया माणगावी । भक्तांसाठी केवळ ।।१०२।।

पुढे टेंब्ये वंशीचा एक ब्राम्हण । आला माणगांवी किंकारण । करूनि राहिला उदर पोषण । अंबे सन्निधवास करूनि ।।१०३।।
त्याचे वंशी भक्त श्रेष्ट । गणेशनामा झाला भक्त । करूनि होता एकनिष्ठ । सेवा श्रीजगदंबेची ।।१०४।।

त्याची भार्या रमा सोज्वळ । जाहली प्रतिव्रता केवळ । सेवाकरी मन निर्मळ ।श्री जगदंबा मातेची ।।१०५।।
भक्तीयुक्त अंत: करण । ज्यांचे झाले एकाग्र मन । देवी चरणी अर्पुनी तन । प्रार्थना करिती जगदंबेची ।।१०६।।

आई देवी अंबीके । जगद्धात्री विश्व पालके । भक्तद्धारक असुरांतके । तुझे चरणी नमन माझे ।।१०७।।
तू आदिमाया विश्वजननी । उत्पत्तिस्थितिलय कारिणी । जगदंबे भवानी । तुझे चरणी नमस्कार ।।१०८।।

हे महामाये यक्षिणी ।तू तीन गुणांची स्वामिनी । सर्व जगाची तू आधारिणी । तुझे चरणी नमन माझे ।।१०९।।
स्थावर जंगम विश्व सकळ । तुझ्या इच्छे चाले केवळ । पंचमहा भूते सर्व काळ । तुझे इच्छे वागती ।।११०।।

तूचि देवी गौरी पार्वती । लक्ष्मी सावित्री सरस्वती । तू सर्व देवदानवांची माता निश्चिती । आदी माये जगदंबे ।।१११।।
साधूंचे रक्षण दुष्टांचे संहार । हा चाले तुझा खेळ निरंतर । तुझाच गे हा माया बाजार । परी याहूनि निराळी ।।११२।।

चार वेदांची उत्पत्ती ।सहा शास्त्रांची प्रगती । अष्टदशा पुराणांची ख्याती । तुझे पासूनि जाहली ।।११३।।
चौदा विद्या चौसष्ट कला । तुझे हाती आहेत केवळा । विश्वकर्मा तुझा बाळ ।तुझे इच्छे राहतेसे ।।११४।।

खांब सूत्रीची बाहूली । कळ दाबिता नाचू लागली । तुझे हाती विश्व सकली । इच्छा मात्रे चालतसे ।।११५।।
तुझी करावया स्तुति । नाही माझे पाशी मती । नेणे मी काव्य व्यपुत्ति । अज्ञ मी तुझा बालक ।।११६।।

ऐशापरी केले स्तवन ।चरणी मस्तक ठेवून । पुन :दंडवत प्रणाम करून । सिथर चित्ती बैसला ।।११७।।
तो निद्रा आली त्या क्षणी । स्वप्नी पातला देवी यक्षिणी । भक्तासी म्हणे येईल अवतरोनी । तुझे उदरी योगिराज ।।११८।।

इतुके देखोनि स्वप्नांत । भक्त गणेश झाला जागृत । स्वप्न देखिले अवचित । आनंद झाला मानसी ।।११९।।
सद् गतीत कंठ झाला । अंगी रोमांचा उठला । अंबे चरणी अभिषेक झाला । आनंदाश्रू वाहूनि ।।१२०।।

अंबेचे प्रसादे करून । गणेशासि झाली पुत्र संताने । त्यात वासुदेवा मुख्य जाण । भक्तराज शिरोमणी ।।१२१।।
अनासक्तिने वासुदेव ।अंबे चरणी अर्पुनी भाव । तिचे प्रसादे श्रीगुरूदेव । झाले भक्ता आधिन ।।१२२।।

वसुदेवासि अकचि आस । सद् गुरूचा लागला ध्यास । होतेस तळमळ जीवास । दत्तात्रेया कारणे ।।१२३।।
यक्षिणीचे नित्य पूजन । करूनि प्रार्थी एकाग्र मन । कधी करशील इच्छा पूर्ण । सांग अंबे मजलागी ।।१२४।।

वासुदेव एके दिवशी । निर्धार करूनि मानसि । धरणे धरूनि देवी पाशी । निर्वाण मने बैसला ।।१२५।।
भक्तांचा निर्धार पाहून । जगदंबा झाली प्रसन्न । मस्तकी हस्त ठेऊन । वर दिधला ते समयी ।।१२६।।

अंधार लोपला । स्वयंप्रकाश दिसू लागला । मी तू पणाचा भाव सरला । पावला आत्मानंदी ।।१२७।।
अनुग्रह होताचि जाण । देहावरी आला तत्क्षण । वेदशास्त्रीदिकी संपूर्ण । प्रविण झाला ते समयी ।।१२८।।

ऐसी ही देवी यक्षिणी । वाट पाहे भक्तांकारणी । जे भाविक भजतील ये ठिकाणी । ते सत्वर कार्य सिद्धी पावती ।।१२९।।
ऐसे हे यक्षिणी महीमान । कोण जाणेल संपूर्ण । किंचित वदलो भक्तांकारण । माझे अल्पबुद्धी जे आठविले ।।१३०।।

जे कोण करिती श्रवण पठण । त्यांची पापे जाती जळोन । मनकामना होतील संपूर्ण । ते ,सद् गुरूचरणी लीन होती ।।१३१।।
ज्यांसि पुत्रपौत्रांची आवड । त्यांना कथा लागेल ही गोड । किंवा धनाची आहे चाड । त्यांना वदावी आपुले वाचे ।।१३२।।
ये क्षेत्री जे भक्तागण । जपतापादि करिती अनुष्ठान । तयासि जगदंबा साह्य होऊन । सर्व सिद्धि पावती ।।१३३।।
पुढे नमावा शूलपाणी । मग वंदन दत्तात्रय चरणी । वासुदेव आठवावा ।।१३४।।
संन्निग्ध आहे औदुंबर । तोचि जाणा कल्पतरू । तेथे राहीला दत्तगुरू । भक्तांसाठी वास करूनि ।।१३५।।
तेथे जे अनुष्ठान करिती । तयांसि विघ्ने न बाधती । भूतग्रहादि बाधा निरसती । पूर्ण होती मनकामना ।।१३६।।
हे देवीचे महिमान । नित्य वाचिती जे कोण । आई जगदंबा करील संपूर्ण । तयांच्या इच्छा सत्वरी ।।१३७।।
गणपत्ये कुळीचा ब्राम्हण । नामे ज्याचे जनार्दन । त्याचे मुखी हे महीमान । दत्तात्रेय वदविले ।।१३८।।
जैसे पेरले तैसे उगवले । तुम्ही मात्र पाहीजे सिंचले । माझी बुद्धी तेथे न चाले । सद् गुरू समर्थ एकचि ।।१३९।।

इतश्री यक्षिणी महात्म्यम् संपूर्णम् । श्रीजगदंबार्पणमस्तु ।।

Leave a Reply

three × four =