नित्य वाचनासाठी, कै.श्री. जनार्दन श्रीपाद गणपत्ये कृत
श्री.परमहंस परीव्राजकाचार्य वासुदेवावनंद सरस्वती स्वामी टेंब्ये महाराज यांचे लघु चरीत्र..

श्री गणेशायनम :। हे गणपती ,सरस्वती । माझी लेखणी तुमची स्फुर्ती मात कर धरी बालकाचा हाती । तैसे मज तुम्ही शिकवावे ।।१।।
तू माता तू पिता । तू सखा तू भ्राता । बुद्धि दे मज गुरूनाथा । तुझे चरीत्र वर्णावया ।।२।।
ह्दयी आनंद झाला । तुझे चरीत्र वर्णावयाला । बुद्धि दे तव भक्ताला । माझे ह्दयी वास करूनी ।।३।।
मी तरि बाळ अल्पमती । काय वर्णू तयाची ख्याती । बुद्धी देणार वासुदेवानंदसरस्वती । तयाचे बुद्धि बोलतो ।।४।।
श्रोती असावे सावधचित । वासुदेव परमभक्त । जयाने आराधिला श्रीदत्त । तयाचे अल्पचरीत्र सांगतो ।।५।।

कोकण देश मनोहर । निसर्ग सुंदर । आहे रत्नांचे आगर । जिल्हा रत्नागिरी ।।६।।
तया दक्षिण दिसे । सावंतवाडी असे । मध्ये क्षेत्र सुंदर वसे । माणगांव ।।७।।
तया ग्रामी व्दिज एक । प्रसिद्ध धार्मिक । गणेश नामक । टेंब्येकुळी ।।८।।
तयाची भर्या रमा । प्रतिव्रता परमा । श्रीदत्तासि आराधि नेमा । प्रसन्न झाले श्रीदत्त ।।९।।
म्हणे दत्त तया अवसरी । माझा अंश तुमचे उदरी । होईल प्रसिद्ध महिवरी । धर्मप्रसारकाने ।।१०।।

दत्तप्रसादे सत्वर । झाली रमा गरोदर । गणेश करी संस्कार ।नवमास पर्यंत ।।११।।
शुभदिनी झाली प्रसूत । आनंद नाम संवत्वर विख्यात । श्रावणमास असित । रवि पंचमी सौवीस घटी ।।१२।।
बाळ झाला कुलदिप । व्दिजे केले जातक । ज्योतिश म्हणतो होईल कारूणिक । प्रसिद्धि भूमंडळी ।।१३।।
व्दादशदिनी बारसे केले । बाळ पाळण्यामाजी घातले । नाम वासुदेव ठेविले । हर्ष झाला मातापिता ।।१४।।
वाढे बाळ सुलक्षण । पांच वर्षे होता जाण । करिता झाला स्तोत्र पठण । पितामह संनिध ।।१५।।

आठवे वर्षी उपयन । वासुदेव करी संध्यावंदन । करिता झाला वेद्याध्यन । गुरू जवळी ।।१६।।
वासुदेव कुशग्र बुद्धी । अभ्यासो करी शुद्धी । मंत्रसामर्थ्ये सर्व सिद्धि । प्रप्त झाल्या तयासि ।।१७।।
तो मार्ग सोडून दिधला । आपण अनुष्ठानी रमला । भिक्षा मागुनि निर्वाह केला ।शास्त्रज्ञा पाळूनी।।१८।।
एकविस वरूषे होता । विवाह करिती माता पिता । आश्रम घेतला गृहस्था । स्मार्ताग्नि कुंड स्थापिले ।।१९।।
परी विषयी अनासक्त ।संसारी विरक्त । आत्मचिंतनी अनुरक्त । सदा असे ।।२०।।

मनी विचार येती बहूत । परी साध्य न हो त्वरीत । तया म्हणती श्रीगुरूदत्त । स्थिरचित्ती असावे ।।२१।।
अणावकर नाम विख्यात । तया वंशीत होता भूत । शांतीरूप होवोनि वर्तत । ब्रम्हज्ञान बोलतसे ।।२२।।
व्दिजश्रेष्ट विष्णूदत्त । तयाव्दरी असे भूत । त्याने दाखविला श्रीदत्त । विष्णूदत्ता कारणे ।।२३।।
तैसा हा भूतराजा । बोले वासुदेवा व्दिजा । त्वा आराधावे दत्तराजा । होईल तव कामना पूर्ण ।।२४।।
वासुदेव मनी विचार करी । जावे नृसिंह क्षेत्रावरी । कृष्णा पंचगंगा संगम थोरी । दक्षिण काशी प्रसिद्ध ।।२५।।

मनी ठेवोनि भाव । निघाले श्रीवासुदेव । जेथे होता नृसिंह देव । तया संनिध पातले ।।२६।।
प्रार्थना करी वासुदेव । दत्तात्रेय चरणी अर्पुनि भाव । म्हणे सेवा घ्यवी श्रीगुरूराव । तव चरणा सन्निध ।।२७।।
श्री दत्त नरसिंहसरस्वती । वासुदेवा प्रसन्ना होती । म्हणती येऊ तव सांगती । माणगांवी ।।२८।।
भक्ताचा प्रेमळ भाव । पाहूनि येती श्रीगुरूदेव । मनी आनंदला प्रेमळ भावे । पाहूनि येती श्रीगुरूदेव । मनी आनंदला वासुदेव । म्हणे देवा रहावे आम्हागृही ।।२९।।
देव बोले आम्हासाठी । तुम्ही स्वतंत्र बांधावी मठी । तेणे होईल आमुची भेटी । तुम्हासी निरंतर ।।३०।।

वासुदेव करी विचार । स्वकरे बांधी मंदिर । तेथे स्थापिला अत्रि कुमर । आपण संगे राहतसे।।३१।।
दत्त करितो भिक्षाटण । तैसा होई आपण । तेचि करी अन्नग्रहण । ब्रम्हकर्मी रत सदा ।।३२।।
ज्याच्या व्दारी अष्टसिद्धी । ज्याच्या व्दारी नवनिधी । तया भिक्षेची का उपाधी । की आवडी ।।३३।।
जे जे ठावे आपणासी । ते ते शिकवावे दुस-यासी । सन्मार्गी लावावे लोकासी । संत लक्षण ।।३४।।
लोक नाना यती याती । इच्छा धरूनि येती । तयाची इच्छापूर्ति । करी वासुदेव ।।३५।।

भिक्षेसि निघता व्दिजवर ।मार्गी करी चमत्कार । देखिला एक फणिवर । मंत्रासामर्थे बांधिला ।।३६।।
तो भिक्षाटण करूनि करूनि येता । झाली आठवणी अवचिता । म्हणे नको हे प्रयोग आता । सोडोनि दिधला ते समयी ।।३७।।
उन्मत्त वृषभ थोर । धावोनि आला विप्रावर । मंत्रासामर्थे केला प्रतिकार । उन्मत्तबैल शांत झाला ।।३८।।
माणग्राम वैकुंठपूर । करी व्दिजवर । संगे घेवोनि अत्रिकुमर ।जनोद्धाकारणे ।।३९।।
विचार करी देव । ज्ञानी झाला वासुदेव । तयाचा आपपर भाव । निघोनि गेला ।।४०।।

ऐसी वर्षे क्रमिता सात । वासुदेव बोले दत्त । जावे आता जनहितार्थ । तीर्थाटण करावया ।।४१।।
आज्ञा होता व्दिजवरा । संगे घेऊनिया दारा । पातला अमरेश्वरा । चौसष्ट योगिनी येथे वसती।।४२।।
स्थान नरसिंह सरस्वती विख्यात । येथे कृष्णा पंचगंगा संगम होत । वाढविला महिमा अद्भूत । करवीरक्षेत्री पातला ।।४३।।
दर्शन घेऊनि महालक्ष्मी ।सत्पुरूष प्रसिद्ध कुंभारस्वामी । अन्नपूर्णा हातीचे पात्र घेवोनि । जलपान करी गंगेचे ।।४४ ।।
श्रीदत्त स्थान पाहून । चंद्रभागा करूनि स्नान । पांडूरंगाचे करी दर्शन । गंगातिरी पातला ।।४५।।

तो मरी आई प्रसन्न झाली । पत्नी दत्त स्वरूपी लीन झाली । मागील एक उपाधि सुटली । गृहस्था श्रम संपला ।।४६।।
चवदावे दिवशी संन्यास । दत्तात्रेय देती त्यास । घेऊन आले यतिवेष । अकस्मात तेघवा ।।४७।।
प्रसिद्ध नगरी उज्जैनी । तेथे नारायण सरस्वती स्वामी । तयापासी दंड घेवोनि । वासुदेवानंद सरस्वती जाहले ।।४८।।
यतीश्वर म्हणती हो दत्ता ।तुमची उपाधि नको आता । पुजेसी न मिळती गंधपुष्पक्षता । आम्हा सोडोनी त्वा रहावे ।।४९।।
तव बोले अत्रिनंदन । मज पूजावे भस्मे करून । तुझा भोळा भाव पाहूनी । प्रमे राहिन तुजपाशी ।।५०।।

सर्वस्वरूपी नारायण । करू लागले तीर्थाटण । भक्तजनाव्दारा कारण ।मुखी नारायण बोलती ।।५१।।
सारंगपुरी नास्तिक ब्राम्हण ।त्याच्या मातेचा भाव पाहोन । शिकविले तया ब्रम्हकर्म । घेतली भिक्षा तयाघरी ।।५२।।
पोटार्थी अग्निहोत्र । त्याचा झाला भूमिष्टपुत्र । बापा उपदेशी मात्र । सुत सावध तेघवा ।।५३।।
काशीविश्वेश्वर दर्शन । मार्गी निघता कानन । भिल्लरूपी अत्रिनंदन ।मार्ग दावी सत्वर ।।५४।।
ब्रह्मावर्ती गीता श्लोक । प्रवचने होती विस्मित लोक । दत्तपुराण संस्कृत ग्रंथ एक । रचिला ऋक्संहिते परी ।।५५।।

गोकुळ वृंदावन मथुरा ।करूनि निघती हरीव्दार । दर्शन घे नारायण नरा ।स्नान करावे गंगोत्री ।।५६।।
मार्गी भेटले नर नारायण । म्हणती पुढे मार्ग कठिण । यतीश्वर बोले आपण । कठोण आला ते सांगा ।।५७।। .
हिमालयी उपवास । नित्य घडती सायास । परि चित्ती उल्लास । कर्ममार्ग न सोडी ।।५८।।
स्फोटके व्यापला एक ब्राम्हण । स्वामीस न पुसे आपण । तया चरण तीर्थ पिऊन । आपण मुक्त जाहला ।।५९।।
तयाचे स्फोटक अंगावरी । ते स्वामींच्या आले अवसरी । पापक्षालनार्थ नर्मदा तीरी । स्तोत्र करूनि घालविले ।।६०।।

तो आली दिपवाळी । दत्त बोलती आम्हा अभ्यंग आंघोळी । न मिळे म्हणूनि नर्मदा जळी । रूसुनी बसले तेघवा ।।६१।।
यतीश्वर बोले भगवंता । आम्हा आता का छळता । भस्मपूजा संपुष्टात ।कोठे गेली ये समयी ।।६२।।
लोक झाले विस्मित । आणती सुगंधी तेले पंचमृत । घालती अभ्यंगस्नान त्वरीत ।शोडोषोपचार पूजा केली ।।६३।।
महाराजांचे भक्त थोर । दर्शन जाती करूनि निर्धार । मार्ग चुकला झाला अंधार । दत्तघोषे पंथ दाखविला ।।६४।।
तीर्थांटन धर्म जागृती । जन लाविले सत्संगती । जो भला मार्ग श्रुतीस्मृती । निज पंथे दाविला ।।६५।।

किती एकांचे समंध दडविले । किती एकांसी रोगमुक्त केले । ऐसा मार्ग क्रमिता पातले ।नृसिंहवाडी क्षेत्रासी ।।६६।।
महाराजांचा शिष्य थोर । दिक्षित नामे व्दिजवर । तयाने केला निर्धार । दंडग्रहणा करणे ।।६७।।
तयाचा हट्ट पाहून । यतिश्वरा बोले अत्रिनंदन । शिष्यासी करावे दंडासन । नाम ठेवा नृसिंहसरस्वती ।।६८।।
दंड देवोनि झडकरी । श्रीगुरू निघाले गाणगापुरी । मार्गी अक्कलकोट नगरी । दर्शन घेती स्वामींचे ।।६९।।
माणग्रामी भक्त थोर । तुकाराम नामे व्दिजवर । करूनि राहिला फलाहार । तया दर्शन दिधले ।।७०।।

तीर कयाधू नाम सरिता । नरसीग्राम विख्यात । अश्वत्थ औंदुंबरा खालता । कुटी बैसुनि प्रसाद वाटी ।।७१।।
अपार जनसागर पाहून । व्दौरूपी झाला आपण । लोक दर्शना कारणा । बैसलासे उच्चस्थानी ।।७२।।
नापिते इच्छा केली । सेवा घ्यावी गुरूमाऊली ।। तया बोलती प्राप्त: काली । स्मश्रु करूनि त्वा जावे ।।७३।।
भक्त बोलती रे नापिता ।गुरूंच्या पायी असे काटा । तो त्वा काढा म्हणता । बत्तीस काटे काढीले ।।७४।।
धन्य यतीश्वर राणा । देह झिजविला लोक कल्याणा । म्हणे देह हा नाशिवंत जाणा । काय लोभ या देहाचा ।।७५।।

माध्यान्ह काली नदी तीरा । वृक्षाछाये मनोहरा । खेळविती तान्हुल्या कुमरा । आपुले मांडी घेवोनि ।।७६।।
एके स्त्रीये देखिले नयनी । बाळ गुप्त झाले तेथूनी । ती मूर्छा येवोनि पडे धरणी । सावध करिती महाराज ।।७७।।
धन्य ती भामिनी । बालदत्त देखिला नयनी । तेथूनि निघाले यतीश्वर मुनी । ब्रम्हावर्ती पातले ।।७८।।
परमहंसा घेवोनि भेटी । काशीस जाती तारक मठी । समस्त यती आले भेटी । नमन करीती यतीश्वरा ।।७९।।
वारणशी गुप्त होती । अवचित प्रयोगी प्रकटती । दक्षिण पंथ चालती ।भक्तोध्दार करावया ।।८०।।

अक्षिहीना अक्षि येती । पादहीना चरण प्राप्ती । मोक्षार्थी मोक्षगती । विचार करूनि पात्रापात्र ।।८१।।
जे कुत्सित मनी विचार करिती । पाहू म्हणती कैचा यती । ते झाले यमाचे सोबती । नाना कष्ट भोगूनि ।।८२।।
दक्षिणी देशी तीर्थे थोर । ऋष्यमूक पंपासरोवर । धनष्कोष्टी रामेश्वरा । करूनि आले तंजावरी ।।८३।।
मुक्या कुमरा श्लोक म्हणवीती । कर्नाटकी झाली ख्याती । पिशाच्चा दिली सद् गती । शेषागिरी भगिनीचे ।।८४।।
सप्तरूप्यके समाराधन । वैजनाथ घाली गुरूकृपे करून । अपार झाले ब्रम्हाण भोजन । आणिक नाना याती जेविल्या ।।८५।।

मृतबालके वस्त्रे करून । ठेवीले सभेबाजी बांधून । गुरूनाथा कानी वर्तमान । सांगू गेले लोक सकळ ।।८६।।
श्रीगुरू देती विभूती । तया अंगी फासा म्हणती । बाळ सजीव हो निगुती । माता स्तनपान करवी आनंदे ।।८७।।
प्रसिद्ध कुरवपुर स्थान । तेथे करिती अनुष्ठान । शूद्ररूपे कृष्णामाई येऊन । स्वप्नी मागे डाळ खावया ।।८८।।
तियेची इच्छा पूर्ण केली । शूद्र स्त्रीयां डाळ वाटिली । फणी पाठविला अश्वस्थ मूळी । आपण राहतो गुहेमाजी ।।८९।।
तेथूनि निघतो यतिश्वर । परळी वैजनाथ करूनि क्षेत्र । आवंढ्या नागनाथ क्षेत्र थोर । रेणूका माता गोंड ग्रामी ।।९०।।

तये ग्रामी श्याम चौधरी । तयाची मृत झाली कुमरी । कमंडलुतिल प्रोक्षिले वारी । सजीव केली तियेलागी ।।९१।।
गांडाबुवा शिष्य थोर । तयाचे चित्त केले स्थिर । एकनाथ भगवद् भक्त थोर । तया पैठण पुरी पातले ।।९२।।
दत्तभक्त शिरोमणी । घेतले दर्शन जनार्दनी । घृष्णेश्वरा पूजुनी । नर्मदातिरी पातले ।।९३।।
सर्व तीर्थे आचरोनी ।गरूडे आराधिले शूलपाणी । जाऊनि रहाती तये स्थानी । गरूडेश्वर प्रसिद्ध ।।९४।।
गुरूमाऊलीचे दर्शन । घ्यावे ही इच्छा धरून । नावे बैसले भक्तजन । पैलतीरा जावया ।।९५।।

तो अवचित प्रवाही नाव चालली । वळसा घेवोनी बुडू लागली । धाव धाव गुरूमाऊली । म्हणता संकट निवारले ।।९६।।
पर्जन्य पडे मुसळधार । नर्मदा कोपली आला पूर । प्रार्थना करिती श्रीगुरूवर । दंडस्पर्शे पूरे ओसरे ।।९७।।
एके स्त्रिये नासिका भूषण ।लुप्त झाले नाकातुन । श्रीगुरूसि सांगे वर्तमान । श्रीफल दिधले तिये लागी ।।९८।।
तो प्रसाद घेऊन । गृही आली आपण । फोडीला नारळ तत्क्षण । नासिकाभूषण आत दिसे ।।९९।।
ऐसे कितीएक चमत्कार । लोका दाविले वारंवार । साक्षात् योगिराज अवतार । आला अवतरोनी भूमंडळी ।।१००।।

इंदीरा कुमरी । होती रामकृष्ण तालचेरकरांची भाची । श्रीगुरूप्रसादे झाली राजनारी । होळकर नामे प्रसिद्ध ।।१०१।।
किती एक यवन रोगार्त । येवू लागले दर्शनार्थ । तया सांगती मंत्र कुराण ग्रंथ । औषध देती कितीएका ।।१०२।।
श्रीगुरू मनी विचार करिती । आता न रहावे या क्षिती । शिष्या सर्व व्यवस्था सांगती ।म्हणती सोडू आम्ही हे कलेवर।।१०३।।
वार्ता फाकली देशोदेशी । भक्त भेटी आले श्रीगुरूसी ।म्हणती का जाता सोडोनि आम्हासी । गुरूमाऊली दास आम्ही तुमचे ।।१०४।।
मातेविणे बाळ । देवाविण देऊळ । तैसे तुझेविण आम्ही सकळ । कैसे राहू गुरूनाथ ।।१०५।।

श्रीगुरू बोलती भक्तजना । तुमच्या पूर्ण होती मनकामना । करा श्रीदत्तात्रेया आराधना । अंती पावला मोक्ष सुख ।।१०६।।
श्रीगुरू मनी आनंगले । आनंदमान संवत्वर भले । आषाढ शुक्ल प्रतिपदीं झाले । निजानंदे निमग्न ।।१०७।।
ऐसे अपार श्रीगुरू महिमान । काय वर्णू मी तयाचे आख्यान । माझे अल्पबुद्धी ही सुमन । तयाचे चरणी अर्पितो ।।१०८।।
श्रीपादसुत जनार्दन । गणपत्ये इत्युपाव्हा नाम । पूर्वजे आराधिला अत्रिनंदन । तया प्रसादे रचिला सुमनहार ।।१०९।।
सूत्रामाजी ओविला । वासुदेवकंठी वाहिला । आनंद मनी बहू झाला । चित्ती स्थिरावला वासुदेवा ।।११०।।

।। श्रीदत्तात्रेय चरणारविंद्यो: निरूपितास्तु ।।

श्रीसद्गुरूंचे प्रेरणेने शुचिर्भूतपणा पाळून हे १०८ ओव्यांचे चरीत्र लिहिले आहे. हे शुभचिर्भूतपणाने नित्य वाचावे ग्रहपीडा, पिशाच्चपीडा व इतर आधिव्याधि दूर होऊन त्यांच्या मनकामना पूर्ण होतील.

This Post Has One Comment

  1. Anonymous

    अवर्णनीय, अनेक धन्यवाद..

Leave a Reply

1 + 4 =