वयाच्या पंधराव्या वर्षापासून लोक टेंब्यांच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले होते. शास्त्रीबुवा उज्जैनीला येऊन पोचले. तिथल्या दत्त मंदिरात जाऊन शास्त्रीबुवांनी नारायणस्वामींची भेट घेतली व त्यांना नमस्कार करून मंडलेश्वर गावी, कैवल्याश्रमस्वामींकडे घडलेली हकिकत निवेदन केली. त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले, अनिरुद्धस्वामी हे माझे सद्गुरूमहाराज आहेत. त्यांनी जर जर का आज्ञा केली तर मला तुम्हाला दंड देता येईल. एरवी दंड देता येणार नाही. शास्त्रीबुवा अनिरुद्धास्वमींकडे गेले व त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून आपली सारी हकिकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा ते म्हणाले, फार उत्तम. नंतर स्वामींनी नारायणस्वामींना बोलावून घेतले आणि शास्त्रीबुवाना दंड देण्या विषयी आज्ञा केली.

जेष्ठ वद्य द्वितीयेच्या दिवशी शास्त्रीबुवाना दंड देण्याचा विधी झाला, आणि त्यांचे नाव वासुदेवानंदसरस्वती असे ठेवण्यात आले. त्या दिवसापासून सारे लोक शास्त्रीबुवांना, वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज म्हणू लागले. त्या दिवशी वासुदेवानंदानी नारायणस्वामींबरोबर भिक्षा केली.श्री दत्तमहाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही. वासुदेवानंदांना ओकाऱ्या सुरु झाल्या. कितीही उपाय केले तरी त्या थांबत नव्हत्या. नारायणस्वामी घाबरून गेले. श्री दत्तमहाराजांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे हा सारा प्रकार झाला असे कळताच नारायणस्वामींनी. श्री दत्तमहाराजांना वंदन करून त्यांची प्रार्थना केली – “दत्तमहाराज! हा आपला शिष्य आहे. व मीही आपलाच शिष्य आहे. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. आणि ह्या आपल्या शिष्याला आपण बरं करा. ह्या पुढे आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही कार्य यांना कधी सांगणार नाही”, त्या नंतर वासुदेवानंदांच्या ओकाऱ्या थांबल्या.

Leave a Reply

5 × 3 =