ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की, एका ब्राम्हणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता. त्याला कोणीतरी सांगीतले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल. तो ब्राम्हण संधीची वाट पाहूं लागला.
एके दिवशीं महाराज लिहिण्यास मांडी उपडी करून बसले होते. त्या वेळी त्यांचे पाय मागें होते. ब्राम्हणानें ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातलें व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून पिऊन टाकले व अंगाला लावले. महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राम्हणाला विचारले, तेव्हा त्याने व्याधींच्या परिहार्थ एकाच्या सांगण्यावरून आपण असे केले आहे, असे सांगून अपराधाची क्षमा मागितली.
महाराज लगेच उठून गंगेवर जाऊन स्नान करून आले पण त्यांच्या चित्तास समाधान वाटेना. रात्री स्वप्नांत एक चांडाळीण महाराजांना शिवली. त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले. सकाळी उठून पहातात तों सर्व अंगभर फोड उठले आहेत. त्या रात्री द्रृष्टांत झाला कीं ‘अनअधिकारी माणसाला पायाचें तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेलें नाहीं. करितां तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत् चांगले होईल”
त्याप्रमाणे गंगेची अनुज्ञा घेऊन महाराज किनारी येण्याकरितां ब्रम्हावर्ताहून निघाले. महाराज नर्मदातीरीं नेमावर येथें येऊन पोंचले व नर्मदामातेची नमस्कारपूर्वक प्रार्थना केली कीं “माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवढी ही कडक शिक्षा केली? माझ्याशिवाय तुझें महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय?” अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला. तीन दिवसांत नर्मदामातेच्या स्नानानें तो विस्फोटक रोग बरा झाला. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली. नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभिस्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे.
