उज्जयिनीहून फिरता फिरता श्रीस्वामीमहाराज पुन्हा नर्मदातटाकी आले. श्रीनर्मदेशी आणि श्रीकृष्णानदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते. त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तिरावरून संचार करीत असत. ओंकारेश्वर हे भगवान श्रीशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रीनर्मदाकाठच्या या लिंगाला अमलेश्वराचे ज्योतिर्लिंग असे म्हणतात. येथे धावरी कुंड आहे. धावरी कुंडाला श्रीनर्मदेचे योनिस्थान मानतात. येथील सृष्टीशोभा अपूर्व आहे. श्रीस्वामीमहाराज येथील सौंदर्याने प्रसन्न झाले. या धावरी कुंडात बाणलिंगे सापडतात. एखादे बाणलिंग आपणास मिळावे म्हणून येथे येणारा प्रत्येक यात्रेकरू धावरी कुंडात वारंवार उड्या मारीत असतो. काही यात्रेकरू धावरी कुंडात बुड्या मारणाऱ्या लोकांना पैसे देऊन कुंडातून बाणलिंग काढावयाला सांगतात. येथे मिळालेले बाणलिंग आपल्या घरी पूजेमध्ये असावे असे लोकांना वाटते. फार थोड्या भाग्यवंतांना या लिंगाची येथे प्राप्ती होते.

एके दिवशी श्रीस्वामीमहाराजांनी स्नान करण्यासाठी धावरी कुंडात बुडी मारली.पाण्यातून वर येताना त्यांनी इतरांना अलभ्य असे ओंजळभर बाण वर आणले.त्या बाणांच्या विविध रंगछटा पाहून श्रीस्वामीमहाराजांना आनंद झाला. त्या बाणांकडे श्रीस्वामीमहाराज कौतुकाने पहात असताना भिल्ल वेषाने शंकर तेथे आले व ते श्रीस्वामीमहाराजांना असे म्हणाले की,” संन्यासी महाराज! आपण भाग्यवान दिसता. इतरांना क्वचितच सापडणारे बाण तर आपण ओंजळ भरून आणले आहेत. या सर्व बाणांची आपणच पूजा करणार आहात ना?” हा प्रश्न ऐकताच श्रीस्वामीमहाराज त्यांना असे म्हणाले की,” नाही. संन्याशाला बेल, तुळशी, फुले तोडता येत नाहीत. मग या बाणांची कोणत्या साहित्याने पूजा करणार? हे बाण चांगले आहेत असे पाहून सहज कुतूहल म्हणून हे वर आणले.” श्रीस्वामीमहाराजांचे हे उत्तर ऐकताच भिल्लरूपी शंकर त्यांना असे म्हणाले की,” तसे असेल तर आपण हे सर्व बाण पुन्हा कुंडात सोडून देणेच योग्य होईल.”

श्रीस्वामीमहाराजांनी त्या भिल्लाच्या सांगण्याप्रमाणे ते ओंजळभर बाण पुन्हा कुंडात सोडले. पण तेवढ्यात तो भिल्लही अदृश्य झाला. भगवान श्रीशंकरच आपणास दर्शन देऊन गेले याची श्रीस्वामीमहाराजांना खात्री पटली. श्रीस्वामीमहाराज थोर भक्त होते, वेदांती होते, शास्त्रवेत्ते होते, त्यांच्या ठिकाणी प्रगाढ विद्वत्ता होती, पण परमेश्वराच्या मायेने त्यांना याही वेळी संमोहित केले. भगवान श्रीशंकर त्यांच्या समोर उभे असताना श्रीस्वामीमहाराजांनी त्यांना ओळखले नाही. ओंकारेश्वरला श्रीस्वामीमहाराजांचा तेहतीस दिवस मुक्काम होता. येथे रोज जिज्ञासूंना वेदवेदांत सांगणे, शास्त्रे शिकविणे, अभ्यासू लोकांचे प्रापंचिक अडचणीवर उपाय सांगून त्यांना ईश्वर भजनी लावणे व संध्याकाळी पुराण सांगणे हे त्यांचे कार्यक्रम चालूच होते. येथील राजाचे कारभारी श्री बळवंतराव यांना श्रीस्वामीमहाराजांनी स्वतः ब्रम्हकर्म व पंचमहायज्ञ शिकवून त्यांनी त्यांना खऱ्या ब्राम्हण धर्माची दीक्षा दिली.

Leave a Reply

ten + 18 =