चातुर्मास २- श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९२, शके १८१४

महाराज जालवणहून निघून फिरत फिरत ब्रह्मावर्तास येऊन पोचले. येथे येण्याची ही त्यांची पहिली खेप. यावेळी येथे आठ महिने मुक्काम झाला. अंताजिपंतांचे घाटावर राम मंदिरानजिक एका झोपडीत महाराजांचे वास्तव्य होते. तेथे रोज सकाळी शौचमुखमार्जन व स्नान झाल्यावर झोपडीचे दार लावून भिक्षेची वेळ होईपर्यंत बसत असत. नंतर पुन: गंगेवर मध्यान्ह स्नान करून येऊन व आवश्यक ती कर्म करून तीन घरची भिक्षा आणावयाची व ती घ्यावयाची. हे होईपर्यंत झोपडीचे दार उघडे असे. नंतर पुन: संध्याकाळ होईपर्यंत दरवाजा बंद.

केवळ श्रीदत्तप्रभूंची आज्ञा म्हणूनच महाराजांचे हे काम चालले होते. त्यात लोकेषणेचा काही संबंध नव्हता. त्यामुळे नित्य अनेक मंडळी पुराणश्रवणास येऊ लागली. काही विद्यार्थीही अध्ययनास येऊ लागले. आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास सुरू झाला. ज्योतिष, याज्ञिक, वेदांत, योग इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासाकरिता महाराजांचेकडे अनेक लोक येऊ लागले. महाराजांचा मुक्कामही त्यावेळी ब्रह्मावर्तास चांगला दीड वर्ष झाला. बऱ्याच मंडळींना सन्मार्गाचा उपदेश होऊन त्यांचे कल्याण झाले. वर्णाश्रमाधर्माकडे लोकांची प्रवृत्ती विशेष वाढली. पुढे पुढे महाराजांची किर्ती बरीच दूरवर पसरली.

ब्रह्मावर्तास असताना महाराजांनी दत्तपुराण नावाचा एक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. एकंदर श्र्लोकसंख्या साडेतीन हजार असून टीकाही विस्तृत केलेली आहे. एकंदर अध्याय ६४ असून आठ अष्टके आहेत. ऋक्संहितेप्रमाणेच याची रचना झालेली आहे. ऋक्संहितेतील प्रत्येक अध्यायातील आरंभ व दत्त पुराणातील अध्यायाचा आरंभ एकसारखा आहे. पहिल्या अध्यायातील प्रत्येक श्लोकांत एक, दोन असे ऋक्पाद घालून स्तुति केली आहे. यालाच वेदपादस्तुति असे म्हणतात. असा हा अप्रतिम ग्रंथ ब्रह्मावर्तास गंगातीरावर निर्माण झाला.
श्री क्षेत्र ब्रह्मावर्त

कानपूर रेल्वे स्टेशनस्टेशन 20 किमी.मोटारने जाता येते.बाळासाहेब यांची विठुर कोठी. नानासाहेब पेशवे यांचा वाडा. उत्तम घाट, भरपूर मंदिरे. येथे महाराजांचे चार चातुर्मास झाले (२ रा शके १८१४ इस. १८९२, १२ वा शके १८२४ इस. १९०२, १३ वा, शके १८२५ इस. १९०३, १४ वा शके १८२६ इस. १९०४) राममंदिरासमोर पर्णकुटीत महाराज रहात होते. तेथे सध्या श्री दत्तमंदिर आहे.

Leave a Reply

two × three =