श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ज्यांनी लहानपणी अगदी जवळून व समक्ष पाहिले होते व मे १९८७ पर्यंत हयात होते असे ब्रम्हावर्त येथील वृद्ध गृहस्थ श्री. टोपे (तात्या टोपे यच्या घराण्यातील वंशज) यांची प्रत्यक्ष भेट झाली असताना ते श्रीस्वामीमहाराजांसंबंधी आठवणी सांगताना असे म्हणाले, “श्रीस्वामीमहाराज रोज दुपारी भिक्षेला येत असत. त्यावेळी ते आमच्या घरातील मंडळींना असे म्हणत असत की, ‘भिक्षान्नात तूप वाढू नका’. तीन घरची भिक्षा घेतल्यावर ते सरळ गंगेवर जात असत व तेथे आपली भिक्षान्नाची छाटीची झोळी तीन वेळा पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजीपंताच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत. तेथे ती झोळी थोडावेळ एका खुंटीला टांगून ठेवीत असत. भिक्षान्नाच्या झोळीतून सर्व पाणी गळून गेले की, मग ती खाली काढून त्यातील अन्नाचे चार सारखे भाग करीत असत. त्यातील एक भाग ते श्रीगंगेला अर्पण करीत असत. दुसरा भाग ऐखाद्या भिकार्याला देत असत. तिसरा भाग ते एखाद्या कुत्र्याला खाऊ घालत व चौथ्या भागाचे बरोबर आठ घास करून ते स्वतः भक्षण करीत असत.
श्रीस्वामीमहाराजांची ही भिक्षेची रीत पाहिली की, मला लहानपणी फार आश्चर्य वाटत असे. आजही त्या गोष्टीची आठवण झाली की, श्रीस्वामीमहाराज आपली भिक्षान्नाची झोळी गंगेत बुडवीत असल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर साक्षात् उभे राहते व जिव्हालौल्य जिंकल्याची त्यांची ती अद्भुत व अलौकिक साक्षच आहे, असा विचार मनात येउन माझे मन अगदी भारावून जाते. मला तर ही वैराग्याची पराकाष्ठा आहे असे वाटते. या ब्रम्हावर्त क्षेत्रात माझे उभे आयुष्य गेले. मी अनेक साधुसंताचे दर्शन घेतले; परंतु आजतागायत असा जिव्हा जिंकणारा, आपल्या रसनेवर ताबा मिळवणारा व अखंड वैराग्यसंपन्न असणारा साधू माझ्या पहाण्यात आला नाही. खरे सांगावयाचे म्हणजे श्रीस्वामीमहाराज हे नुसते साधू नव्हते; तर ते महासाधू होते! या महासाधूंचे मला दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. या भूतलावर पुन्हा असा लोकोत्तर महासाधू होणे नाही हेच खरे आहे!”
