चातुर्मास ६- श्रीक्षेत्र हरिद्वार उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९६, शके १८१८

हिमालयातील यात्रा आटोपून महाराज शके १८१८ वैशाख पौर्णिमेचे सुमारास हरिद्वार येथे परत आले. या वर्षीचा चातुर्मास तेथेच झाला. तेथे या खेपेस सहा महिने मुक्काम होता. नंतर तेथून ब्रह्मावर्तास येण्याकरिता महाराज निघाले. बरोबरचे ब्राह्मण यात्रेकरू पूर्वीच पुढे निघून गेले होते. त्यामुळे व रस्त्यांत दक्षिणी ब्राह्मणांची सोय न झाल्यामुळे महाराजांना १८ दिवस उपवास घडला. काही ठिकाणी गुजराथी ब्राह्मणांकडून फळे मिळाली, तेवढी खाऊनच राहावे लागले. रस्त्यात एका गुजराथी ब्राह्मणाच्या बाईने शेंगाचे दाणे, चणे, व गहू भाजून त्याचे पीठ करून महाराजांचे बरोबर दिले होते. ते रोज पाण्यात कालवून खावयाचे आणि २०-२५ कोस चालावयाचे असा महाराजांचा त्यावेळी क्रम असे. असा प्रवास करीत महाराज ब्रह्मावर्तास येऊन पोचले.

ब्रह्मवर्तास एका ब्राह्मणाने काही पुस्तके घेण्याकरिता काही पैसे ठेवले होते. तेथे कुलूप किल्ली काही नसल्यामुळे पैसे बाहेरच पडले होते. ते एका चांगल्या घराण्यातील मुलाने चोरले. पुष्कळ शोध केला तरी पत्ता लागेना. शेवटी महाराजांनी चोरीचा तपास करण्याविषयी दत्तमहाराजांच्या गणास आज्ञा केली. लगेच एका गणाने त्या मुलाच्या शरीरात प्रवेश करून मी चोरी केली असे महाराजांचे समक्ष त्याचेच तोंडाने कबूल करण्यास लावले. नंतर त्या मुलाने पैसे परत आणून दिले.

तेथून निघून ब्रह्माणी घाटावर महाराज आले. घाटावरून चालण्याचे वेळी पाय घसरून महाराजांचे कमरेत लचक भरली. त्यामुळे हालचाल अगदी बंद झाली व महाराज निजून राहिले. भिक्षेची वेळ झाली तरीसुद्धा उठता न आल्यामुळे तसेच पडून राहिले. हे पाहून नर्मदामाता कुमारिकेच्या रूपाने येऊन महाराजांना म्हणाली की, ‘महाराज! भिक्षेची वेळ झाली, उठा, मी तुमची लचक बरी करते.’ इतके बोलून त्या मुलीने थोडेसे भस्म घेऊन व मंत्र म्हणून ते महाराजांच्या कमरेस चोळले व उभे राहून पाय खाली बडवा असे महाराजांना सांगितले. त्याप्रमाणे महाराजांनी करताच खरोखरीच त्यांना उत्तम चालता येऊ लागले. महाराजांनी नर्मदामातेला ओळखून तिची स्तुती केली. नंतर नर्मदामाता गुप्त झाली.

Leave a Reply

nineteen + 13 =