चातुर्मास ७ – श्रीक्षेत्र पेटलाद मध्यप्रदेश, नदी- मही, इ. स. १८९७, शके १८१९

इंदूर संस्थानांतील एक मोठे गाव पेटलाद हे महीनदीचे तीरावर आहे. येथे ब्राह्मणवस्ती चांगली आहे. या गावी महाराजांनी शके १८१९ साली चातुर्मास केला. तेथेच आषाढ शुद्ध पक्षात दत्तलीला-मृतसिंधु हा प्राकृत एक सहस्त्र ओव्यांचा ग्रंथ महाराजांनी रचला. चातुर्मास संपल्यावर पेटलाहून निघून महाराज चिखलदा या गावी आले. येथे व्यंकटराव नावाचा गृहस्थ पत्नी मृत झाल्यावर नोकरी सोडून देऊन नदीतीरावरील एका मंदिरात राहात असे. महाराज चिखलद्यास आल्यानंतर आपणास योग्याभ्यास सांगण्याविषयी त्याने महाराजांना विनंती केली. त्याप्रमाणे त्याला षट्क्रिया व प्राणायाम याचे शिक्षण महाराजांचेपासून मिळाले.

‘सगुण परमेश्र्वराची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे. सगुण उपासना केल्यावाचून ब्रह्मसाक्षात्कार होणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा आणि कायद्याचा अभिमान असतो, तसाच देवाला आपल्या सगुणरूपाचा व वेदशास्त्राचा अभिमान आहे. शिक्कामोर्तब म्हणजे राजा नाही हे खरे; पण शिक्कामोर्तबाशिवाय राजाचा व्यवहार होऊ शकत नाही. आणि राजाशिवाय नुसत्या शिक्कामोर्तबालाही महत्त्व नाही. प्रजाजनांनी राजाचे कायदे पाळले म्हणजे राजाला जसा संतोष होतो, तसाच संतोष शास्त्रनियम पाळल्याने ईश्र्वराला होतो. करिता शास्त्रज्ञेप्रमाणे वागून ईश्र्वराची सेवा करा व आपले कल्याण करून घ्या.’ याप्रमाणे सर्वांना उपदेश करून महाराज चिखलदा सोडून निघाले. ते शके १८२०मध्ये वैशाख शु. ॥१० या दिवशी नर्मदातीरावरील तिलकवाडा या गावी येऊन पोचले.

Leave a Reply

5 − three =