प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दुसरा चातुर्मास ब्रह्मावर्त ह्या ठिकाणी (शके १८१४- इ. स. १८९२) संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. आपटेबुवा ब्रह्मावर्तच्या श्रीराममंदिरामध्ये चातुर्मासात सतत अकरा रात्री कीर्तन करीत असत. बुवा विद्वान होते. वेदान्त त्यांच्या जिव्हाग्री बसलेला होता. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी खच्चून गर्दी होत असे. ह्या वर्षी समोर खांबाला टेकून एक कृश शरीराचे संन्यासी बसलेले होते. त्यांची मुद्रा निर्विकार व शांत होती. जणू आजूबाजूच्या जनसागराची त्यंना जाणीवही नव्हती.

आपटेबुवानी हाती टाळ घेऊन ठेका धरला. हळूहळू कीर्तनांत रंग चढू लागला. बुवानी आपली सर्व विद्वत्ता आपल्या रसाळ वाणीमध्ये ओतली होती. लोकांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होते. ‘हेची दान देगा देवा’ म्हणता म्हणता त्यांनी कीर्तन संपवले व ते म्हणाले “उद्या येथे दुसऱ्या कोणीतरी कीर्तन करावे असे मला वाटते. बोला कोण कीर्तन करणार?”

श्रोत्यांमधून कोणीच उत्तर दिले नाही. बुवानी परत विचारल्यावर कुठून तरी शब्द आले “उद्या मी कीर्तन करणार”

सर्व लोक अवाक् झाले. जो तो मान उंचावून पाहू लागला. एक आठ दहा वर्षांचा मुलगा उभा राहून दिमाखाने सांगत होता की,”उद्या मी कीर्तन करणार”. त्याची आई त्याला मागे खेचीत होती.

सर्वांना गंमत वाटत होती. बुवांनाही असेच वाटले. हसत हसत त्यांनी विचारले,”काय? तुम्ही उद्या कीर्तन करणार? शाबास ” मुलानेही निर्भयपणे “हो” म्हणून सांगितले. मुलाची आई त्याचा हात धरून घरी निघाली.

क्षणभर तिची नजर खांबाला टेकून बसलेल्या संन्याशाकडे गेली. त्यांनी हातानी खूण करून मायलेकरांना आपल्याकडे बोलाविले व मुलाला विचारले, “मुला, उद्या तू खरेच कीर्तन करणार? तुला काय काय पाठ येते?”

मला “मना सज्जना भक्तिपंथेची जावे — हा श्लोक पाठ येतो”

ते संन्यासी म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते. त्यांनी मुलाच्या आईला असे सांगितले की ,”मुलगा हुशार आहे. उद्या सकाळी ह्याला गंगेवर नेऊन स्नान घाला आणि संध्याकाळी कीर्तनकाराच्या वेषात मंदिरात घेउन या”.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंदिरात भाविक लोक जमू लागले. आज जरा गर्दी जास्तच होती. स्वामी महाराज नेहेमीच्या खांबाला टेकून बसले. आपटे बुवा नेहेमीच्या वेळी आले व त्याच वेळी बाल हरदासाची स्वारीही आली. त्याच्या आईने त्याला कीर्तनकारासारखे सजविले होते. त्याला धोतर नेसविले होते व त्याच्या अंगावर उपरणे पांघरले होते. त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा आणि मुखावर निरागस भाव होता. आईचा हात धरूना तो सभामंडपामध्ये आला. सर्व जनसमुदायाचे डोळे जसे आपटे बुवांवर खिळले होते ते आता या बाल कीर्तनकारावर खिळले. मुलगा आला तो थेट श्री स्वामी महाराज जेथे बसले होते तेथे गेला. श्री स्वामी महाराज कोणाचा स्पर्श करून घेत नसत; पण हा बालब्रह्मचारी थेट त्यांच्या मांडीवर जाउन बसला. महाराजांना मोठे कौतुक वाटले. त्यानी आपल्या डाव्या हातानी त्याला आपल्याकडे ओढले व कौतुकाने विचारले, “आज खरोखरच तुम्ही कीर्तन करणार काय?”

“होय मी आज खरेच कीर्तन करणार”

“कोणता श्लोक कीर्तनासाठी घेणार?”

“मना सज्जना भक्ती पंथेची जावे ह्या श्लोकावर कीर्तन करण्याची माझी इच्छा आहे”

“पुन्हा म्हणा” बालकानी तोंड उघडताच महाराजानी हळूच एक चिमूटभर भस्म उजव्या हाताने त्याच्या जिभेवर टाकले. ही गोष्ट एवढ्या झटकन् घडली की अगदी जवळ बसलेल्या श्रोत्यांच्या नजरेला आली, पण ही कुजबुज पसरत पसरत सर्व लोकांपर्यन्त गेली.

“आज कोण कीर्तन करणार?” आपटे बुवानी पृच्छा केली. सर्वांच्या नजरा त्या बालकीर्तनकारावर खिळून राहिल्या होत्या. तो एका तंद्रीमध्ये चालत तो पुढे आला आणि त्याने सुरुवात केली.”मना सज्जना भक्तिपंथेची जावे……..” तबलजीने आणि टाळकऱ्यानी ठेका धरला आणि साडेतीन तास त्याने न अडखळता कीर्तन केले.

तो सांगत होता “माणसाने आपल्या अंगी असलेल्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा गर्व करु नये. कर्ता करवीता एक परमेश्वरच आहे. गवताचे पानही त्याच्याच इच्छेने डोलते. सर्वांचा बोलविता धनी तोच आहे.” कीर्तन ऐकता ऐकता आपटे बुवांच्या नेत्रातून अश्रु धारा वाहु लागल्या. ते जातीवंत विद्वान होते.ते काय समजावयाचे ते समजले. कीर्तन आटोपताच त्यानी धावत जाऊन महाराजांचे पाय धरले आणी म्हणाले,” आपण मला सावरले, आपणच माझा उद्धार करा”. स्वामी महाराजांनी त्यांना कृतार्थ केले.

Leave a Reply

four + three =