चातुर्मास १३ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ.स. १९०३, शके १८२५

ब्रह्मावर्तास येऊन महाराजांना एक वर्ष होऊन गेले होते. ‘नित्य श्रीर्नित्यमंगलम्’ सर्व काळ आनंदाचा सर्व मंडळींना जात होता. शके १८२४ प्रमाणे १८२५चा चातुर्मासही येथेच झाला.

दूरदूरचे विद्यार्थी अध्ययनाकरिता महाराजांचेजवळ येऊन राहिले होते. तेथे कार्तिक महिन्यात महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र या नावाचा सातशे ओव्यांचा प्राकृत ग्रंथ तयार केला. गुरुचरित्रातील कथा यात साररूपाने दिलेल्या आहेत. प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर असे वाचले असता भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो.

त्यावेळेचा नाममंत्र ‘अंजनिसुता रुद्रावतारा । जय रामदूता भवभयवारा’ असा होता. याप्रमाणे तेथे नित्य उत्सवाचा आनंद सर्व लोकांना मिळू लागला. पण महाराजांना फारच उपाधी होऊ लागल्यामुळे तिसऱ्या चातुर्मासात मौन धरण्याचे महाराजांनी ठरविले.

आपल्या जवळच्या दत्तमूर्तीची काही तरी व्यवस्था करावी असा विचार महाराजांनी केला. त्यामुळे ती मूर्ति रुसून गंगेत जाऊन बसली. मूर्ती दिसेनाशी झाल्यावर महाराजांना बरे वाटले, बरे झाले, आपली उपाधि कमी झाली. पण इतक्यात गंगेकडून रडण्याचा आवाज कानी आला. त्या अनुरोधाने गंगातीरावर महाराज आले. तेथे शोध करताच ती मूर्ती सापडली. हे चरित्र पाहून महाराजांनी मूर्तिची व्यवस्था करण्याचा विचार सोडून दिला. पण उपाधीचा त्रास पाहून महाराज म्हणाले की, ‘ही मूर्ति कोणी चोरून का नेत नाही?’ हे बोलणे वेंकट्याने ऐकून त्याने ती मूर्ति नेली. ते महाराजांना समजल्यावर महाराज त्याला म्हणाले की ‘नुसती मूर्ति मिळाली म्हणजे काम झाले नाही. ती नीट जपली पाहिजे. फुकटचा हत्ती मिळाला तरी तो पोसण्याची शक्ति नसेल तर काय उपयोग?’ हे महाराजांचे बोलणे लक्षात ठेवून वेंकटय्या त्या मूर्तिची पूजा करीत मंडलेश्र्वरी राहिला होता. पुढे तो मेल्यावर त्या मूर्तिचे काय झाले ते कळत नाही. मूर्ति नेली त्या वेळीच महाराज म्हणाले, ‘ही मूर्ति जेथे जाईल त्याच्या सर्वस्वाचा नाश होईल. कारण आपणाइतकी पाळणूक कोणाकडूनही होणार नाही.’

Leave a Reply

fifteen − 12 =