चातुर्मास १७- तंजावर सभामंडप तामिळनाडू, नदी- कावेरी, इ. स. १९०७, शके १८२९

शके १८२९ आषाढ पौर्णिमेपासून तंजावर येथे महाराजांचा चातुर्मास सुरू झाला. महाराजांचे यथाशास्त्र आचरण व पूर्ण ज्ञान पाहून तेथील लोक त्यांना देवाप्रमाणे मानू लागले. ब्रह्मावर्तास श्रीगुरुसंहिता म्हणजेच संस्कृत समश्लोकी गुरुचरित्र महाराजांनी केले होते. त्या ग्रंथावर या ठिकाणी चूर्णिका म्हणजे मूळ ग्रंथाचा गद्यात्मक गोषवारा लिहिण्याविषयी देवांची आज्ञा झाल्यावरून ती चूर्णिका येथे लिहिली. एकदा एक दिगंबर असे तेजस्वी साधुपुरुष महाराजांकडे आले. रात्रभर त्यांचे व महाराजांचे बोलणे झाले. पहाट झाल्याबरोबर ते कोठे निघून गेले ते काही समजले नाही.

तंजावरालाच महाराजांनी कृष्णालहरीवर संस्कृत टीका लिहिली. भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर अवधूतरावांचे विनंतीवरून त्यांचे घरी दुसरे दिवशी भिक्षा करून महाराजांनी तंजावर सोडले. जाता जाता एका ब्राह्मणाला महामारीचा उपद्रव सुरू झालेला महाराजांनी पाहिला. लगेच त्याला औषधाने बरा करून घरी पाठविले. नंतर सत्यमंगल, जंबुकेश्वर, कोटिलिंग इत्यादि क्षेत्रे पहात पहात कावेरीतीरावर श्रीरंग मुक्कामी शृंगेरी मठाचे शंकराचार्य आहेत असे समजल्यावरून त्यांचे दर्शनार्थ महाराज श्रीरंगमुक्कामी आले. तेथे गेल्यावर श्रीशंकराचार्यांच्या सन्निध जाऊन महाराजांनी त्यांना वंदन केले. महाराजांना पाहिल्याबरोबर आचार्य म्हणाले की,‘आपल्या दर्शनाची पुष्कळ दिवसांची असलेली इच्छा ईश्वराने आज पूर्ण केली. नंतर महाराजांनी आचार्यांची व शारदाम्बेची स्तुती केली.

भिक्षा वगैरे आटोपल्यावर आचार्यांनी सर्व लोकांना उद्देशून महाराजांचेबद्द्ल चार शब्द सांगितले ते असे, ‘शिष्यमंडळींनो ! तुम्ही आज येथे आलेल्या या महान संन्याशांना ओळखले नाही. करिता दोन शब्द त्यांचेबद्द्ल आम्ही सांगतो. ते प्रत्यक्ष दत्तप्रभूच मातापित्यांच्या अत्यंत पुण्याईने त्यांच्या पोटी आले. आद्य शंकराचार्यांच्याप्रमाणेच हे धर्मसंस्थापनेचे कार्य करीत आहेत. वर्णाश्रमधर्माचे परिपालन कडकडीतपणाने हे करीत असून लोकांचा उद्धार यांचेकडून झालेला आहे. आसेतुहिमाचल पायानेच सर्व यात्रा करून त्यांनी कर्म, उपासना व ज्ञान यांचा अधिकारी जीवांना उपदेश करून त्यांना कृतार्थ केले आहे. करितां यांना पूर्ण आयुष्य लाभून यांचे हातून धर्मसंस्थापनेचे कार्य नित्य घडो, एवढीच परमेश्वराजवळ आमची प्रार्थना आहे.

Leave a Reply

1 × one =