चातुर्मास २०- हावनूर कर्नाटक, नदी- तुंगभद्रा, इ. स. १९१०, शके १८३२
महाराज हावनूर येथे त्रिपुरान्तकेश्वराच्या देवळात राहिले होते. तेथे गेल्यावर त्रिपुरान्तकेश्वर व तुंगभद्रा यांची स्तुती केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी यथाशास्त्र व्यासपूजा केलेली पाहून तेथील सर्व मंडळींचे मनात महाराजांचेविषयी पूर्ण आदर उत्पन्न झाला. सर्व मंडळी आपापल्या घरी महाराजांना भिक्षेस बोलावू लागली. वैष्णवांच्या घरी मात्र महाराज भिक्षेस जात नसत. येथे आषाढ व॥ १३ स वामनरावजी गुळवणी महाराजांचा शोध करीत आले. ते येण्याबरोबर ‘येथे चातुर्मास असल्याबद्दल कोणालाही पत्र पाठवायचे नाही’ असे महाराजांनी त्यांना सांगितले.
हावेरी स्टेशनमास्तर दक्षिणी ब्राह्मण असून ते महाराजांचेकडे येणा-या यात्रेकरूंची व्यवस्था चांगली ठेवीत असत. त्यांनी महाराजांचे दर्शनास येणेकरिता रजेचे दोन अर्ज केले पण रजा मिळाली नाही. शेवटी चातुर्मास समाप्तीचे आदले दिवशी त्यांना रजा मिळून ते महाराजांचे दर्शनास आले. त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले की, ‘तुम्ही अर्ज केला तेव्हाच रजा मिळाली असती तर येणा-या यात्रेकरूंची व्यवस्था कशी झाली असती ?
तुंगभद्रा तिरावर गळगनाथ देवस्थानांत चिक्काप्पाशास्त्री म्हणून एक विद्वान प्रेमण ब्राह्मण रहात होते. त्यांचे घरी भिक्षा करून महाराज परत हावनूरला आले. त्याच साली तूळ राशीस गुरु आल्यामुळे तुंगभद्रेला गंगा येऊन मिळते त्या पर्वकाळांत महाराजांनी तेथे स्नान केले व सुवासिनी स्त्रियांना हळदीकुंकू देऊन खण दिले. शास्त्रीमंडळींना उपरणी व लहान मुलांना खाऊ दिला. हावनूरहून निघून महाराज तुंगभद्रा – वर्धासंगमावरून आगठीस आले.
नंतर पुढे प्रवास करीत महाराज श्रीपादश्रीवल्लभांचे स्थानी कुरुगडी येथे वैशाख वैद्य ६ रोजी येऊन पोचले. याच्या सर्व बाजूंनी कृष्णेचा प्रवाह असून तेथे जंगलच आहे. त्यामुळे या बेटात पूर्ण एकांत आहे. सेंट्रल रेल्वेच्या रायचूर व कृष्णा स्टेशनहून हे स्थान १८-२० मैल आहे. तेथे तपश्चर्येला उपयुक्त अशी एक सुंदर गुहा आहे. तेथे नदीत खडक असल्यामुळे नाव चालत नाही. भोपळ्याच्या सांगडीवरून जावे लागते. ‘या स्थानी चातुर्मास करावा म्हणजे पुष्कळ मंडळी येऊन हे स्थान प्रसिद्ध होईल’ असे श्रीपादवल्लभांनी महाराजांना सांगितल्यामुळे महाराज येथे आले.
