चातुर्मास २१- कुरवपूर (कुरगड्डी) कर्नाटक, नदी- कृष्णा, इ. स. १९११, शके १८३३

कुरूगड्डी गांव म्हणजे कृष्णाप्रवाहातील एक बेट आहे. यालाच कुरवपूर म्हणतात. येथेच श्रीपादश्रीवल्लभांचे तप होऊन ते आश्विन वद्य द्वादशीस येथे अदृश्य झाल्याची कथा गुरुचरित्रात आलेली आहे. येथे तेलगू व कानडी भाषा आहेत. दोन मैल रूंद कृष्णेच्या प्रवाहामध्ये हे बेट एक मैल लांब, अर्धा मैल रूंद असे आहे. एका टोकास दत्तमंदिर व दुस-या टोकास गाव व मध्ये शेते आहेत. मंदिरात श्रीदत्तपादुका आहेत. बेटाच्या दुस-या बाजूस असलेल्या प्रवाहाचे तिरावर एका दगडावर श्रीपादश्रीवल्लभांच्या पावलांचे ठसे पुष्कळच उठलेले दिसतात. एका शरीरावर नमस्कार घातल्याप्रमाणे सर्व शरीराचा ठसा उठलेला आहे.

तेथील पुजा-यांचा शुद्रवत आचार पाहून महाराजांना तेथे रहावेसे वाटेना. तेव्हा श्रीपादश्रीवल्लभांनी ब्रह्मचारी वेषाने महाराजांकडे येऊन सांगिरले की, ‘ही भूमि रजकभक्ताने मला दिली आहे. नैवेद्य, नंदादीप यातून चालू आहे, तरी येथे भिक्षा घेण्यास हरकत नाही. या लोकांच्या आचारांचेकडे लक्ष देऊ नये. मुख्यत: द्रव्यशुद्धि व भावशुध्दि येथे असल्यामुळे त्यांचे आम्हाला चालते, तर तुम्हाला का चालू नये. तुम्ही यापुढे कोणालाही पायाचे तीर्थ देऊ नये व अनधिका-यास मंत्रही देऊ नये. येथे येणा-यांनी गाणगापूर व वाडीप्रामणे शुचितेने वागावे.’ असे सर्व श्रीपादवल्लभांनी महाराजांना सांगितले.

कुरुगड्डीस जाणा-या यात्रेकरुंकडून नावाडी लोक फार पैसे घेत. ही गोष्ट महाराजांना समजताच त्यांनी नावाड्यांना बोलावून आणून तसे न करण्याबद्दल ताकीद केली व एका माणसाने बाजेवरून जाणे असल्यास आठ आणे द्यावेत, स्वतंत्र भोपळ्याच्या सांगडीवरून जाण्याकरिता प्रत्येकाने एक रूपया द्यावा व ओझ्याकरिता एका ओझ्याच्या रांजणास आठ आणे अशी व्यवस्था करून दिली.

महाराजांनी कुरुगड्डीस गुरुद्वादशीपर्यंत मुक्काम केला. नंतर गुरुद्वादशी करून व तेथे सर्व लोकांना उपदेश करून महाराज तेथून निघाले.

स्वाहाकाराचे वेळी हंपी विरुपाक्ष मठाचे शंकराचार्य, टाकळीचे दाजीमहाराज, हैद्राबादचे भटजीबापू इत्यादि मोठमोठी मंडळी आली होती. परळीचे नानासाहेब देशपांडे यांनी या यज्ञात देखरेखीची मेहनत बरीच घेतली. तेथील मुसलमान तालुकादारही चार दिवस कचेरी बंद ठेवून बंदोबस्तासाठी तेथे येऊन राहिले होते. वेदपाठस्तुतीची पुस्तके महाराजांनी स्वत: आपल्या हातांनी सर्व अधिकारी विद्वानांस वाटली. आठ दिवस सोहळा अप्रतिम झाला. एक लाखावर मंडळी येऊन गेली. नित्य हजारो मंडळी भोजनाकरिता येत असत. शेवटी महाराज स्वाहाकाराच्या मंडपात एक प्रहरभरच जाऊन बसले. त्यावेळी महाराजांचे पुढे पैशाचा पाऊस पडला. १९ वेळा मोठ्या पाट्यांतून रूपये भरून गेले. एका भाट्याच दोन लाख देतो म्हणाला, पण महाराजांनी ती गोष्ट मान्य केली नाही.

Leave a Reply

two + fourteen =