श्रीस्वामीमहाराजांची भिक्षा व सर्व लोकांची जेवणे झाल्यावर जेव्हा सर्व मंडळी एकत्र जमली तेव्हा लोकांनी त्यांना असे विचारले की “आपल्या झोळीत विंचू कसा गेला? आपण तेला काहीच केले नसता तो आपलास चावलाच कसा? आपणास फार वेदना होतात का?” लोकांचे हे सर्व प्रश्र्न एकून श्रीस्वामीमहाराज सर्व लोकांना उद्देशून असे म्हणाले की, “आज भिक्षेला जाण्यापूर्वी लक्ष्मणराव नाईक उमरेडकर यांना यंत्र तयार करून देण्याच्या गडबडीत नित्य पाठाचे एक स्तोत्र म्हणावयाचे राहून गेले. त्यामुळे देवांनी मला ही शिक्षा केली.” अशा प्रकारे विंचू चावण्याचे कारण सांगून श्री स्वामी महाराज सर्व भक्तमंडळींना उद्देशून असे म्हणाले की, “आमच्याकडून नित्यक्रमातील एक स्तोत्र म्हणावयाचे राहून गेले तर देवांनी रागावून आम्हाला विंचवाकडून दंश करवून शिक्षा केली. अशी जर आमची स्थिती आहे तर मग तुम्ही रोज देवाची कितीतरी कृत्ये वीसरता. त्यासाठी देव तुम्हाला किती शिक्षा करतील यांचा तुम्हीच विचार करा. तरी तुम्ही देवांच्या सेवेत कुचराई व कसूर करू नका.”
श्रीस्वामीमहाराजांच्या स्वप्नात श्रीकृष्णामाईची मागणी
श्रीक्षेत्र कुरवपूर येथे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीस्वामीमहाराजांच्या स्वप्नात श्रीकृष्णामाई एका शूद्र स्त्रीच्या रूपाने आली व ती त्यांना असे म्हणाली की, “आपण बरेच दिवस उपोषित आहोत; तरी आपण निदान डाळ तरी आम्हाला घावी अशी माझी प्रार्थना आहे.” श्रीस्वामीमहाराज सकाळी जागे झालेल्या बरोबर श्री कृष्णामाईच शूद्र स्त्रीच्या रूपाने येऊन आपल्याकडे डाळ मागत होती हे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे श्रीकृष्णमाई आपणाकडे खावयास का मागत आहे ? या प्रश्नाचा विचार करताच श्री स्वामी महाराजांच्या असे लक्षात आले की, “या वर्षी आपण श्रीमलप्रभानदीच्या तीरावरील मुरगोड गावी दशाहार केल्यामुळे श्रीकृष्णामाईला काही नैवेद्य इत्यादि दाखवून तिला संतुष्ट करता आले नाही. तिला आपल्या कडून काहीच न मिळाल्यामुळे ती ही मागणी करीत आहे.” श्रीकृष्णामाईच्या मागणीप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी तिला संतुष्ट करण्याचा पक्का निश्चय केला.
