चातुर्मास २३- गरुडेश्वर गुजराथ, नदी- नर्मदा, इ.स. १९१३, शके १८३५
गरूडेश्वर हा गाव नर्मदा किना-यावर असून तेथे भिल्ल जातीच्या लोकांचीच थोडीशी वस्ती आहे. नदीतून वहात आलेली लाकडे धरणे, मासे पकडणे हेच त्या लोकांचे उद्योग. एक दोन दुकाने आहेत. तिलकवाडा किंवा नांदोद येथून सर्व सामान आणावे लागते. गरूडेश्वर, नारदेश्वर, करोटेश्वर अशी लहान लहान मंदिरे येथे आहेत. येथे शंकरांचा प्रसाद होण्याकरिता गरूडाने तपश्चर्या केल्यामुळे या स्थानास गरूडेश्वर असे नाव पडले. येथे विष्णुपंत सोमण यांचे एक किराणा मालाचे दुकान होते. तेथे महाराज आले त्यावेळी त्यांची रहाण्याची सोय काहीच नव्हती. एक मनुष्य आत बसेल अशा नारदेश्वराच्या मंदिरात बसून महाराज अनुष्ठान करीत असत व बाहेर एका दगडावर निजत असत. फक्त विष्णुपंत सोमण यांचेकडेच माधुकरीची सोय होती. गरूडेश्वरी महाराज आहेत ही बातमी अवकरच सर्वत्र पसरली व दर्शनाकरिता मंडळींची ये-जा सुरू झाली. तेथे फार ऊन होते म्हणून मंडळींना बसण्याकरिता एक लहानसा मंडप घातला.
धोंडोपंत कोपरकर काही दिवसांनी सहकुटुंब दर्शनास आले. त्यांनी फणसपोळी, मोहाचे नारळ, फणसाचे वाळलेले गरे असे पदार्थ आणले होते. त्यावेळी फणसपोळी तेवढी भिक्षेचे वेळी घेणेस ठेवून बाकी सर्व पदार्थ मंडळींना वाटून दिले. धोंडोपंत काही दिवस तेथेच राहिले. त्यांनी महाराजांचेकरिता एक झोपडी बांधली. त्यात अर्ध्या जागेत महाराज बसत व अर्ध्या जागेत सामान होते व स्वयंपाकही तेथे होत असे. या झोपडीस पर्णकुटी असे म्हणत. या जागेवर असलेला कडुलिंब १८३५ चैत्र प्रदिपदेस प्रसाद म्हणून त्याची पाने घेतल्यावर तो गोड झाला. नवीन बांधलेल्या पर्णकुटीची वास्तुशांति वैशाख शुद्ध एकादशीस झाली. मंडळी जास्त येऊ लागली हे पाहून परशुरामभाई कुबेर इंजिनियर यांनी स्वयंपाकाकरिता निराळी जागा बांधली.
श्रीदत्तमूर्तीवर लघुरुद्राभिषेक वगैरे यथासंभव होत असे. तेथे रहाण्याकरिता परगावच्या एक दोन बायकाही आल्यामुळे महाराजांना ती घरची भिक्षेचीही सोय झाली. महाराज फक्त व-याची भाकरी, भात, ताक, भेंड्याची किंवा सुरणाची आळणी भाजी इतकेच भिक्षेचे वेळी घेत. फळाच्या पुष्कळ करंड्या रोज येत असूनही तिकडे महाराजांनी ढुंकूनही पाहिले नाही. संध्याकाळी काही विषय समजावून सांगत. रात्री महाराजांचे समोरच भोजन होत होते. भजन झाल्यावर सर्व मंडळींना हरभ-याच्या किंवा मुगाच्या डाळीची पोटभर उसळ, सांजा फळे वगैरे मिळत असे. तेथे रात्री स्वयंपाक नसल्याने ही अशी व्यवस्था केली होती.
तेथे जमणा-या मंडळींनी एकचित्ताने मानापमान सोडून सर्व कामे करावीत. कोणी पाणी आणावे, कोणी लाकडे जमवावीत, कोणी पळसाची पाणे आणून पत्रावळी कराव्यात, कोणी स्वयंपाक करावा. श्रीदत्तप्रभूंचा नैवेद्य झाल्यावर सर्वांचे जेवण होत असे. स्वयंपाकाकरिता कढ्या असत. पुढे पुढे तर रोज ३-४ शे पान होऊ लागले. पुढे येणा-या पैशातून सर्व खर्च चालत असे. रोज पोळ्या व कधीतरी पक्क्वान्न करीत असत. ‘ आज अमुक मंडळी येणार आहेत, अशा पद्धतीचा स्वयंपाक करा’ असे महाराज सकाळीच सांगत असत.
बडोद्याहून श्रीसिद्धनाथाचे मंदिरातील महंत श्रीगणपतीबुवा मंडळींसह दर्शनार्थ आले होते. तेथे महाराजांना नमस्कार करून त्यांनी आपल्या मनात काही विचार आणले. ते जाणून महाराज लगेच म्हणाले की, ‘इकडे येताना आपणास अश्वत्थामा भेटला व त्याच्याबरोबर काही संभाषणाचाही योग आला’ हे ऐकून गणपतिबुवा म्हणाले की, ‘हीच गोष्ट मी आपणास विचारणार होतो.’ याप्रमाणे मनातले विचार महाराजांनी सांगितलेले पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले.
