इंदूरचे महाराज युरोपच्या सफरीस गेले, त्यामुळे लग्नाचे काही निश्चित झाले नव्हते. अशा स्थितीत दहा अकरा महिने गेले. त्यावेळी वरील गृहस्थाच्या सूनबाई कृष्णाबाई तालचेरकर यांनी आपली भाची कु. इंदिराबाई हिचे टिप्पण वाडीचे महाराज दत्तात्रेय पुजारी यांचेमार्फत महाराजांचेकडे पाठविले. महाराजांनी टिप्पण पाहून कळविले की, ‘यात राजयोग दिसत नाही.’ तेव्हा नारायण दत्तात्रेयांनी लिहिले की, ‘ मुलीचे टिप्पण गुरुमहाराजांचे हातात गेले म्हणजे हे लग्न होणारच अशी आमची भावना आहे. तरी कृपा व्हावी.’ तेव्हा शेवटी महाराजांनी लिहिले की, ‘मुलीकडून निष्काम शिवाराधना व्हावी व ‘देवेंद्राणि नमस्तुभ्यं’ या मंत्राचा जप करावा. मार्गशिर्ष मासात कार्य होईल.’ असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे इंदूरचे महाराज दोन तीन महिन्यातच परदेशातून येऊन मार्गशीर्ष शुद्ध दशमी सोमवार शके १८३५ या दिवशी कु. इंदिराबाईंबरोबर राजेसाहेबांनी विवाह केला. नंतर यांचे नाव सौ. महाराणी साहेब इंदिराबाई होळकर असे पडले. महाराजांचे ठिकाणी यांची निष्ठा फार मोठी आहे. गरूडेश्वर येथे त्यांनी नर्मदेस घाट बांधला आहे. माणगांव, कुरुगड्डी, कारंजा इत्यादी स्थानांतूनही अनेक देणग्या देऊन गुरुमहाराजांची शुद्ध भावाने सेवा केलेली आहे.

Leave a Reply

18 + 19 =