प.प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या काही प्रतिमा आपण पाहतो. वंदन करतो. त्यामध्ये स्वामी महाराजांची दंड, कमंडलू, कौपिन, छाटी धारण केलेली भस्म विभूषित एक उभी प्रतिमा आहे. या उभ्या प्रतिमेत महाराजांच्या गळ्यात एक श्लोकबद्ध हार आहे. इ. स. १९१३ मध्ये वैशाखात प. प. गुळवणी महाराज श्री क्षेत्र गरुडेश्वरी आले. येताना त्यानी श्री दीक्षित स्वामी यांनी रचना केलेल्या हारबद्ध व श्लोकबद्ध असलेले एक छायाचित्र आणलेले होते. व त्यांनी ते थोरले महाराजांना अर्पण केले. प. प. थोरल्या महाराजांनी ते श्लोकबद्ध हाराचे चित्र पहिले व त्याचा स्वीकार करून प. प. दीक्षित स्वामी महाराजांना परत करणेस सांगितले. तो श्लोक खालील प्रमाणे,

मेशं केशं सुशंभु, भुवनवनवहं, मारहं रत्नरत्नं ।
वंदे श्री देवदेवं सगुणगुरुगुरुं, श्रीकरं कंजकंजम् ।।
मामज्ञं मत्तभर्भ भवदव सुवहं वासनासर्वसंधे |
मातः पातः सुतस्ते वहरहसि हरे देशिके शिष्य शिष्यम् ||

१) मेशं- लक्ष्मीचा ईश, अर्थात विष्णू.
२) केशं- ब्रम्हा जो श्रीष्टीकर्ता आहे.
३) सुशंभु- मोक्षाचे सुख देणारा शंभू.
४) भुवन-वन-वहं- १४ भुवनांचा धारण करणारा, पालन करणारा विष्णू.
५) मारहं- कामदेवाला मारणारा अर्थात शिवस्वरूप.
६) रत्नरत्नं- श्रेष्ठा मध्ये श्रेष्ठ अर्थात प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
७) श्री देवदेवं- देवांचा जो देव तो महादेव, भगवान शंकर.
८) सगुणगुरुगुरुं- सगळ्या गुरूंचा गुरु म्हणजे सगुण परमेश्वर.
९) श्रीकरं- वेदवेदांतविद्या शिकवून शिष्यान। तेजस्वी बनवणारा
१०) कंजकंजम् – करकमळात कमंडलू धारण करणारा.
११) मामज्ञं- अज्ञ मा वहं म्हणजे अज्ञानी अशा मला ब्राम्हाकडे घेऊन जावे.
१२) मत्तभर्भ- मत्तम्- अर्भम् अर्थात मद मोह ग्रस्त बालकास
१३) भवदव सुवहं- संसाररुपी दावानलातून बाहेर नेणारा
१४) वासनासर्वसंधे- वासनांच्या जाळ्यात
१५) मातः पातः- तुझा पुत्र आहे, माझे पतन न होवो.
१६) शिष्य शिष्यं- शिष्यांचा शिष्य

सरळ अर्थ :  “ब्रम्हा विष्णू व शिवस्वरूप चतुर्दश म्हणजे चौदा भुवनांचा पालनकर्ता, विष्णूस्वरूप, कामदेवांचा भस्म करणारे शिवस्वरूप, परमहंस परिव्राजकामध्ये श्रेष्ठ श्री सदाशिवरूप, सगुण, गुरूंचे गुरु, कर कमळात कमंडलू धारण करणारे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती याना मी वंदन करतो. वासनांच्या जाळ्यात माझे पतन होऊ देऊ नका. मला अधःपतित करू नका. मी तुमचा पुत्र आहे. संसाररूपी दावानलातून मला बाहेर काढा. हे विष्णू स्वरूप गुरुमाते, मला एकांतात ज्ञानोपदेश देऊन शिष्यांचा शिष्य बनवा.”

अशा प्रकारे हा श्लोकबद्ध हारबंध म्हणजे एका पूर्णपात्र शिश्योत्तमाने कृपावंत सद्गुरुकडे मागितलेले हे आर्जवपूर्ण गाऱ्हाणे आहे. हे मनुष्य जीवनाचे सर सर्वस्व आहे. हि मागणी लौकिक किंवा ऐहिक नसून शाश्वत ज्ञान सत्चरित्राचे पालन करण्याची प्रार्थना आहे. शब्द विकारांवर मात करून ईश्वरचरणी मन केंद्रित करून आत्मिक विकास आणि उद्धार करून घेण्यासाठी, एकांतामध्ये गुरुमुखातील ज्ञान ग्रहण करणेसाठी गुरूंना केलेली ही आर्त प्रार्थना आहे.

Leave a Reply

8 − 4 =