थोरल्या महाराजांच्या चरित्रात त्यांना त्यांच्या आयुष्यात दोन वेळा सर्प दंश ,तीन वेळा महामारी, एक वेळ सन्निपात, दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड, इतके रोग उत्पन्न झाले, संग्रहणी अर्थात अतिसार व्याधी हि कायम मागे होती. पाणी प्याल्यावर या व्याधीचा उद्रेक जास्त होत असे. सामान्य मनुष्याला इतके रोग झाले असते तर तो तग धरू शकला नसता पण दत्त स्वरूपी अशा थोरल्या महाराजांना काय अशक्य आहे. वक्रतुंड कवीश्वर महाराजानी हे साक्षात दत्त महाराज आहेत हे सांगितलेही होते. संग्रहणी हा आजार त्यांना उत्पन्न व्हायला कारण एक मनुष्याने केलेला अभिचारक प्रयोग होय, पण हे ओळखून देखील त्यांनी त्याचा प्रतिकार केला नाही .

तिलकवाड्याला आठवा चातुर्मास झाला तेव्हा तेलुगू लिपीतील कूर्मपुराण त्यांनी देवनागरी भाषेत भाषांतरित केले, तेलगू भाषा? बढवाईच्या चातुर्मासानंतर महाराज जेव्हा नृसिंहवाडीला आले तेव्हा पंढरपूर ते वाडी अंतर केवळ एका दिवसात पार केले, नव्वद ते शंभर मैल अंतर एका दिवसात? स्वतः डॉक्टर असलेल्या ताटके यांचा हाड्या व्रण आजार त्यांनी बरा केला (हा आजार वैद्यक शास्त्रात असाध्य मानला जातो) असे असंख्य चमत्कार ते प्रत्यक्ष दत्त महाराज असल्याची साक्ष देत आहेत. दत्त साहित्य म्हणाल तर त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. केवळ आदी शंकराचार्य हे एक नाव त्यांच्या बरोबरीने येते, आणखी कोणी नाही.

फार पूर्वीची गोष्ट, मी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे तीर्थरुपांसोबत असताना वेदशास्त्रसंपन्न बापूशास्त्री कोडणीकर यांचेकडे राहण्याचा योग्य आला, थोरल्या महाराजांनी केलेल्या कृष्णा लहरीच्या अर्थावर ते स्वतः बराच वेळ बोलत होते. प्रत्येक ओवीचे चार चार अर्थ, एक विष्णु पक्षे, एक आकाश पक्षे, एक कृष्णामाईला उद्देशून, एक दत्तात्रेय पक्षे. एकेक श्लोक म्हणजे दत्त साहित्यातील एकेक रत्न आहे.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज प्रवास करीत करीत श्रीगंगोत्रीला आले (शके १८१६-१७. इ.स. १८९३-९४). श्रीगंगोत्री म्हणजे श्रीगंगामातेचे मंदीर. एका हिमनदीपासून श्रीगंगेचा उगम झाला आहे. या हिमनदीचे पाणी एका गोमुखातून पडण्याची व्यवस्था केली आहे. हा श्रीगंगेचा खरा उगम अतिशय दुर्गम अशा थंड प्रदेशात आहे. सामान्य यात्रेकरूंना तेथपर्यंत जाता येत नाही म्हणून श्रीमदाद्यशंकराचार्यांनी स्वतः जेथे प्रथम स्नान केले तेथेच त्यांनी श्रीगंगोत्रीच्या मंदिराची स्थापना केली. श्रीगंगोत्री मंदिर गोमुखापासून जवळजवळ पंचवीस मैलांच्या अंतरावर आहे. या मंदिराजवळ जे कुंड आहे त्याला भगीरथ शिळा म्हणतात. यात्रेकरू याच कुंडामध्ये स्नान करतात; पण काही यात्रेकरू पुढे जाऊन गोमुखाजवळच्या प्रवाहात स्नान करतात. येथील प्रवाह मूळ हिम नदीचाच प्रवाह असल्यामुळे त्यातील पाणी अतिशय थंड असते.

श्रीस्वामी महाराजानी गोमुखाजवळ स्नान केले. स्नान करताच त्यांचे शरीर हिमदंशाने बधिर झाले व ते पार गारठून गेले. त्यांना कसलीही हालचाल करता येईना. जणूकाही काष्ठवत् किंवा स्थानुवत् अचेतन अवस्था त्यांना प्राप्त झाली. त्यांची ही अवस्था तेथील यात्रेकरूंच्या नजरेला येताच त्यांच्यापैकी कोणीतरी श्रीस्वामीमहाराजांजवळ पेटलेली शेगडी आणून ठेवली. श्रीस्वामीमहाराजांचा देह यावेळी थंडीने येवढा गारठला होता की, त्याला चेतना आणण्यासाठी दिलेल्या आगीच्या शेकाने त्यांच्या अंगावरील शेम जळून काही ठिकाणी कातडीसुद्धा भाजली. बर्याच वेळाने ते भानावर आले. त्यावेळी त्यांच्या कानावर असे शब्द आले, “उठ अग्निजवळ बसून शेकतोस काय?” हे शब्द कानी पडताच ते उठून शेगदीपासून दूर गेले. संन्याशाश्रम स्विकारल्यानंतर संन्याशाने अग्नीला स्पर्श करावयाचा नाही असा नियम असल्यामुळे एवढाच एक नियमभंग आपल्या हातून घडला, असे श्रीस्वामीमहाराज आपल्या उत्तरायुष्यात सांगत असत.

श्रीवासुदवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या हिमालय यात्रेतील एक हकीकत श्री. गंगाधरपंत वैद्य यांनी पुढीलप्रमाणे लिहून ठेवली आहे. श्रीस्वामीमहाराज श्रीबद्रीनारायण आदी उत्तर यात्रेला गेले होते. एके दिवसी सोबतची मंडळी पुढे निघून गेली व त्यानी चट्टीवर राहाण्याची जागा वगैरेची आपआपली तजवीज लावून घेतली. मात्र श्रीस्वामीमहाराजांना संध्याकाळचे आन्हिक उरकावयाचे असल्यामुळे ते प्रथम नदीकाठी गेले, आपले सायंकाळचे आन्हिक उरकून जवळ जवळ दोन तासांनी ते चट्टीवर आले. त्यावेळी तेथील चट्टीवर राहण्यास तसूभरही जागा शिल्लक न राहिल्याने चौकीदाराने त्यांना असे सांगितले की “या ठिकाणी आता उतरण्यास एकाही माणसास जागा बाकी राहिली नाही. आपण फार रात्र करून आलात. यामुळे माझा नाईलाज आहे. आपण आपली सोय दुसरीकडे लावून घ्या.” हे ऐकताच “ठीक आहे” एवढेच श्रीस्वामीमहाराजांनी त्याला उत्तर दिले. त्यानंतर चट्टीच्या बाहेरच कोठे बसता येईल का व कशाचा तरी आसरा घेता येईल का हे पाहिले. तेव्हा त्यांना भिंतीला बाहेरून एक कोनाडा असल्याचे व त्यात एका माणसाला सहज बसता येईल एवढा तो मोठा असल्याचे लक्षात आले. श्रीस्वामीमहाराज त्या कोनाड्यात बसले व रात्रभर त्यांनी सूर्यभेदी प्राणायाम करून त्या महाभयंकर अशा कडक थंडीचे निवारण केले.

जशी रात्र होत गेली तशी थंडी वाढत गेली व बर्फही पडू लागला. धर्मशाळेच्या आतल्या लोकाना दोन दोन, तीन तीन ब्लँकेटानी सुधा थंडीचे निवारण होईना. कशीबशी रात्र काढली. पहाट झाली. बाहेर श्रीस्वामीमहाराज कुठल्या अवस्थेत दिसतील अशी सर्वांच्या मनात भीती होती. दरवाजा उघडला. सर्व भयभीत नजरेने श्रीस्वामीमहाजांकडे आले. बघतात तर काय? श्रीस्वामीमहाराज ध्यानमग्न बसलेले दिसले व त्यांच्या शरीरावर घामाचे बिंदू दिसत होते!

Leave a Reply

twenty − 5 =