श्रीशास्रीबुवांनी जेव्हा तो प्रसाद घ्यावयाचे नाकारले तेव्हा सौ. अन्नपूर्णाबाई त्यांना असे म्हणाल्या की, “हा प्रसाद आहे, पाहिजे तर आता खाऊ नका, पण तो घेऊन बांधुन ठेवा.”त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रीशास्रीबुवांनी तो प्रसाद फडक्यात बांधुन ठेऊन दिला.मात्र त्यांनी तो ग्रहण केला नाही. उभयतांनी एका धर्मशाळेत मुक्काम केला होता. रात्री स्वप्नात श्रीपांडुरंगाने येऊन त्यांना असे विचारले की, “आमचा प्रसाद तुम्ही का ग्रहण केला नाही?” हे ऐकताच बुवा असे म्हणाले की, “तो प्रसाद बाजारच्या भाजलेल्या डाळ्यांचा होता. असे बाजारातील ओले करून भाजलेले डाळे ब्राह्मणाने खाऊ नये असे शास्त्राने सांगितले असुन, हे शास्त्र आपणच निर्माण केले आहे. आम्ही ते पाळतो. शास्त्रपालनासाठी आपल्या हातच्या प्रसादाचा अवमान करावा लागत आहे या बद्दल क्षमा असावी. पण शास्त्रपालनाचे ब्रीद आम्ही सोडणार नाही.” बरे तर! नका खाऊ.” असे म्हणून श्रीदेव अदृश्य झाले. सकाळी जागे झाल्यावर बुवांनी प्रसादाची पुरचुंडी शोधली, पण ती नाहीशी झाली होती. श्रीदेवांनी आपला प्रसाद परत नेला होता.

अशा प्रकारे श्रीस्वामीमहाराजांनी उभ्या आयुष्यभर कटाक्षाने व काटेकोरपणे शास्त्रपरिपालन केले. या बाबतीत त्यांनी माणसाशी तर नाहीच नाही, परंतु श्रीदेवांशीही कधी तडजोड केली नाही आणि ते आपल्या निश्चयापासून कधी ही ढळले नाहीत. श्रीक्षेत्र पंढरपूरहुन श्रीशास्रीबुवा बार्शीला श्रीअंबरीषवरदाचे दर्शन घ्यावयाला गेले. येथे श्रीक्षेत्र माणगावचे श्री दत्तुशास्री साधले रहात होते. त्यांनी श्रीशास्रीबुवांना पाहीले. आपल्या मातृभूमीच्या सुपुत्राची भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला. श्रीवासुदेवशास्री यांनी काही दिवस आपल्या घरी रहावे असा श्री. साधल्यानी त्यांना आग्रह केला. त्याप्रमाणे ते तीन दिवस त्यांच्या घरी राहिले. त्याकाळात एके दिवशी श्री.साधले बुवांना वाटखर्चासाठी सहा रुपये देऊ लागले, पण त्यांनी ते पैसे घेण्याचे नाकारले. शेवटी बुवा बाहेर गेल्याचे पाहून श्रीदत्तुशास्त्री यांनी ते पैसे बुवांच्या नकळत त्यांच्या करंड्यात ठेवले. बुवा बाहेरून येताच ते श्री दत्तुशास्री यांना असे म्हणाले की,” आमच्या श्रीदेवांना आता द्रव्य संग्रह करावा असे वाटू लागले आहे.” हे ऐकुन आपल्या अपरोक्ष घडलेल्या गोष्टीसुद्धा जाणण्याच्या श्रीशास्रीबुवांच्या सामर्थ्य बद्दल श्रीदत्तुशास्री यांना फार आश्चर्य वाटले.

Leave a Reply

nine − 5 =