श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज हे पराकोटीचे दत्तोपासक आणि दत्तभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे दत्तमय आणि दत्त आज्ञेत होते. दत्त महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय ते कुठलेही कार्य करत नसत आणि यदा कदा दत्तात्रेयांच्या आज्ञेचं उल्लंघन झालेच तर तात्काळ त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नसे. स्वामी महाराज संपूर्ण दत्तमय होते. ही भक्तीची सगळ्यात श्रेष्ठ अवस्था आहे जिथे भक्त आणि भगवंत ह्यात काही अंतर राहत नाही आणि म्हणूनच स्वामी महाराज साक्षात दत्तस्वरूपच आहेत. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजानी आसेतु हिमाचल पायी प्रवास केला. हा संपूर्ण प्रवास दत्त महाराजांच्या आज्ञेने आणि अक्षरशः त्यांच्या सांगण्याप्रमाणे होत असे. ह्याच प्रवासात स्वामी महाराज त्यांच्या हिमालयातील वास्तव्यात असतानाचा हा एक प्रसंग आहे.
प. पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज एकदा हिमालयाच्या एका तळाच्या काठावरून जात असताना अचानक त्यांना त्या अर्ध बर्फाच्छादित हिमतळाच्या थरावर कंपने आढळली ती पाहून एका एकी स्वामी महाराज स्तब्ध झाले हळू हळू ती कंपने वाढत गेली आणि थोड्याच वेळात त्या अर्ध बर्फाच्छादित जलाशयातून एक सिद्ध योगी वर आले आणि स्वामी महाराजांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि भाष्य केले कि आम्ही अनेकानेक वर्षांपासून अगम्य अश्या ठिकाणी बसून तपस्या करीत आहोत तरी सृष्टी मध्ये होणारे बदल आणि शक्तींची उलाढाल आम्हाला ज्ञात आहे. तसेच कलियुगातील अवधूतांचे साक्षात अवतारस्वरूप आपण प. पू. वासुदेवानंदसरस्वती स्वामी ह्या नावाने आसेतु हिमाचल लोकोधारार्थ यती रुपात संचार करीत आहात हे आम्हाला अंतरज्ञानाने कळले आहे. अशा परमहंस चिन्मय मूर्तीचे दर्शन झाले हे आमच्या तपचरणाचे फळ आहे. असे म्हणून त्या सिद्ध योग्याने पुनश्च स्वामी महाराजांना वंदन केले. स्वामी महाराजांनी नारायण असा आशीर्वाद दिला आणि ते योगी आपल्या तपःस्थानी तळाच्या आत पुन्हा तपश्चर्येत विलीन झाले आणि स्वामी महाराज तिथून निघून गेले.
