खरेराहुन श्रीस्वामीमहाराज काशीच्या वाटेला लागले. येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. दोन-तीन दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती. श्वापदांची भीतीही होती. त्यामुळे सर्व मंडळींनी श्रीस्वामीमहाराजांना असा आग्रह केला की,” रेल्वे झाल्यापासून या पायवाटेने कोणीही प्रवास करीत नाही. वाटेत घनघोर जंगल असून तेथे हिंस्र पशुंचा त्रासही होतो. शिवाय प्रवासात दोन-तीन दिवस एकही गाव लागत नाही. तरी आपण पायवाटेने प्रवास न करता रेल्वेनेच प्रवास करावा.”
खरेऱ्यातील सर्व मंडळींनी असा प्रेमाने आग्रह केला असला तरी त्या सर्वांना श्रीस्वामीमहाराज असे म्हणाले की,” आतापर्यंतचा प्रवास श्रीदत्तमहाराजांच्या आज्ञेने पायीच झाला आहे. यापुढेही तो पायीच होईल. सन्याशांनी वाहनातून प्रवास करु नये अशी शास्त्राज्ञा आहे. यापुढे श्रीदत्तप्रभूंच्या इच्छेला येईल तसेच घडेल.” असे सर्व मंडळींना सांगून त्यांनी आपला पुढील प्रवास पायवाटेने सुरु केला.काशीची वाट बिकट होती, पण श्रीस्वामीमहाराजांना त्याचे काय? त्यांनी भगवान श्रीदत्तात्रेयाचे स्मरण करीत आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली होती. वाटेत घोर अरण्य लागले, पण श्रीस्वामीमहाराजांना भीती कशाची आणि कोणाची? सर्व विश्वाशी एकरुप झालेल्या, त्यांना अरण्य काय आणि वस्ती असलेले गाव काय? त्यांच्या लेखी दोन्ही परमेश्वराचीच रुपे होती.
आपल्या भक्ताची काळजी भक्तवत्सल प्रभूला होती. त्यावेळी अरण्यातून प्रवास करीत असताना एक भिल्ल श्रीस्वामीमहाराजांसमोर आला आणि नमस्कार करून कोठपर्यंत प्रवास करणार अशी त्याने चौकशी केली. आपण काशीला जावयाला निघालो आहोत, असे श्रीस्वामीमहाराजांनी त्याला सांगताच तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की,” स्वामीमहाराज! काशी येथून फार दूर आहे. कमीतकमी तीनचार दिवस तरी तुम्हाला हे अरण्य तुडवीत जावे लागेल. माझ्या मागुन या. मी तुम्हाला अगदी जवळची वाट दाखवितो. माझ्या पाठीमागून या म्हणजे झाले.” असे म्हणून तो भिल्ल पुढे चालू लागला व श्रीस्वामीमहाराज त्याच्या पाठीमागून चालू लागले. दोनतीन तास त्या भिल्लाबरोबर चालून गेल्यावर एक लहानशी टेकडी उतरून ते दोघे खाली आले. तेथून समोर दिसणाऱ्या गावाकडे बोट दाखवून तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की,” त्या समोर दिसणाऱ्या गावात गेल्यावर तेथून जो रस्ता पुढे जातो तो सरळ काशीला जातो. “असे म्हणून तो भिल्ल मागे वळलाव अरण्यात दिसेनासा झाला. श्रीस्वामीमहाराज पुढे चालू लागले व त्या गावात आले. तेथे आल्यावर त्यांना असे कळले की, तीन चार दिवसांची वाट आपण काही घटकांमध्येच चालून आलो आहोत. तेव्हा त्यांना प्रभूंची अतर्क्य लीला व त्याचे कौतुक पाहून त्याचे फार आश्चर्य वाटले. तो भिल्ल म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तमहाराजच असावेत असे त्यांना खात्रीने वाटले. प्रभूंची माया एवढी अगम्य असते की, प्रत्यक्ष आपल्या लाडक्या भक्तालाही ते आपणा स्वतःची ओळख पटू देत नाहीत.
