विदर्भातील पद्मावती/पवनी नावाचे प्राचीन नगर वैनगंगा आहे. इथ मध्यप्रदेशातील सिवनी येथे उगम पावलेली ही नदी दक्षिणवाहिनी आहे. पवनीस ती पूर्ववाहिनी होवुन वाहते म्हणुन मोठ्ठ धार्मिक महत्व आलेल हजारो वर्षापासुनच हिंदू, बोद्ध धर्मिंयासाठी. एकोणीसावे शतकातील कथा. गावात एक स्वामी आले. पूर्ववाहिनी वैनगंगा अन, गावातील तीन शतकाच्यां वर असलेली सुंदर स्थापत्याची वेगवेगळी मंदिरे. बघताच त्याना प्रसन्नसे वाटले. अन त्यांनी ठरवले “रहावे इथे”, मुक्काम पडला मग त्यांचा. वैनगंगा तीरावरील वैजेश्वराचे मंदिर. स्वयंभू अन जागृत होते. त्यासमोर घाट होता. त्या ठिकाणी एक स्थान होते. तिथे बेलपान वाहिले तर ते बरोबर बुडे तिथे. त्या स्थळी सारे तो चमत्कार स्वहस्ते प्रात्यक्षिक करुन पहात. त्या वैजेश्वराच्या मंदिरात ते उतरले.
अपरिचित होते ते इथे. कोणीही ओळखिचे नव्हते. अलिप्तपणे वागत गावकरी. निर्मोही व अलिप्त ते. त्यांना त्याचे काहीही वाटत नव्हते. रोजचे कर्म शांतचित्ताने चालु होते त्यांचे.
एके दिवशी स्वामींनी पाण्यात पाय घातले. बर वाटल त्यांना. गारेगार पाणी. अन क्षुधा तृषा शांत झाल्या सारखी वाटली. सलग उपवास घडलेला होता दोनतीन दिवस. आजचा चौथा दिवस. “ईश्वरी मर्जी” त्यांनी विचार केला. दत्तगुरो म्हणत ते बाहेर आले. अन ते भिक्षा मागावयास गेले. त्यांची महती कोणी जानत नव्हते. अन निर्मळ, निर्मोही, निर्व्याज्य, असे ते कोणासही सांगत नव्हते. निव्वळ शांत रहात, शांतमुर्ती.
आजही ते एका घरासमोर उभे राहिले. भिक्षा मागताना रोजच्या सारखच हिडीस फिडीस केल गेल त्यांना. अन आतुन एक स्त्री बाहेर आली जलपात्र घेवुन. कोण आले त्यांना द्यावयास. माहेरी आलेली मुलगी होती ती. बाहेर आली, कोण आले ते पाहवयास. अन तिने स्वामींना ओळखले. “इथे हे कसे?” आश्चर्य चकित ती ! “अरे देवा!” मनातच बोलली ती. “अय्या ब्रम्हावर्ती पाहिले कि ह्यांना आपण !” ती पुटपुटली, अन स्वामींना आत यान ! बोलली. अन वडीलांकडे पहात म्हणाली, “अण्णा, हे थोर स्वामी.” अन तिने बसण्यास पाट दिला, पाय धुतले, दुधाचा मोठा पितळी पेला समोर आणुन ठेवला. अन स्नेहादराने बोलली, “घ्या न गोरस!” तिचे अगत्यशील वागणे पाहुन ते प्रसन्न झाले. “सुखी रहा बाळ” आर्शीवाद दिधला.
अन स्वामी नजरेसमोरुन हटताच तिने वडीलांना “काय हे वागणे तुमचे? बरोबर नाही बरे ! मोठ्ठे स्वामी ते! ब्रह्मावर्ती पाहिलेन मी. त्यांचा सन्मान करणे सोडुन अपमान कसा करता बरे?” त्यांचा झालेला मान सन्मान पाहिलेले सारेकाही तिने वर्णन करुन सांगीतले..
अन अण्णा तर्फे सारृया गावास कळले. शिडशिडीत दिसणारे, रागीट वाटणारे, तरी प्रेमळ असणारे, कट्टर धर्माचरण करणारे, शुद्ध तपाचरणी, किर्तीपताका प्रसिद्ध, एकटेच वैजेश्वरास राहणारे, मोठ्ठे स्वामी चार्तुमास करण्यासाठी गावात आलेलेत. हे श्री टेंबे स्वामी महाराज मुळ कोकणातील माणगावचे. आपला तेरावा चार्तुमास करावयास पवनीस आलेले. पण आरंभी उपेक्षा अन अपमानास सामोरे जावे लागले. मग मात्र कौतुकाने डोक्यावर घेतले. संन्याशी जणांना दोन तीन दिवसांशिवाय कुठेही मुक्काम करणे मना, वर्ज्य. चालत पावसाळ्यात जाणार कसे अन कुठे? म्हणुन केलेली ही धर्मसोय. संन्याशी जणांचा चार्तुमास दोन महिन्यांचा. आषाढी ते भाद्रपद पोर्णिमा पर्यंत. अन जवळ नदी असावा हा संकेत. मुख्यसा नदी नाले ओढे वाहत असलेले, प्रचंड पाऊस म्हणुन दोन महिने मुक्काम करावयाची सोय धर्माज्ञेने झालेली. मग एखाद्या मंदिरात, धर्मशाळेत कुटीत, झोपडीत मुक्काम करावा. धर्मचर्चा धर्मगोष्टी कराव्या किर्तने प्रवचने, उपासना, आराधना करावी. लोकांस उपदेश द्यावा, धर्माचरण शिकवावे, मार्गप्रवाही करवुन द्यावे. हा असा चार्तुमास साजरा करीत असत. पुराण, प्रवचने, किर्तने, यज्ञयाग स्वामीपाद्यपुजा, सवाष्ण पुजन, चोळी बांगडी नववार देवुन ब्राह्मणपुजन, अन्नदान, हे व्यवस्थित केल्या गेले, पवनीत स्वामीच्यां देखरेखीखाली.
