तृतीयलहरी

॥श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥

उपदेश गुरु सांगे । ह्या जो शिष्य घे षड्‌लिंगें । तोच भक्त लोटी वेगें । मागें भवा ॥१॥

भवातीत निर्विकार । विभू आद्य अज पर । मायायोगें हो साकार । एक आत्मा ॥२॥

स्वयें मायाऽविद्या होतो । ईशा जीवा आभासें तो । करीं सत्य हें माने तो । होतो बद्ध ॥३॥

त्रिगुणमायायुक्तात्मा । त्यापसूनी जन्म व्योमा । वाताग्नी आप भू जन्मा । क्रमें देतो ॥४॥

शब्दस्पर्श रुपरस । गंध एकोत्तर त्यांस । गुण दिल्हे या पांचांस । घे तो बद्ध ॥५॥

पंचीकृत भूतयोगें । देह झाले हे अवघे । स्वस्वाधिक्यें देह वागे । स्वस्वाधीन ॥६॥

भूतसत्वांशे वेगळीं । ज्ञानेंद्रियें पांच झालीं । अंतःकरणाते व्याली । सत्वैकता ॥७॥

रजोंशानीं कर्मेंद्रियें । प्राणा जन्म तदैक्यें ये । यांहीं लिंगदेहाला ये । आकारता ॥८॥

दिग्वातार्क वरुणाश्वी । ज्ञानेंद्रियें राहे तेवीं । अग्नींद्राज मृत्यू कवी । कर्मेंद्रिया ॥९॥

धीचा जीव मना चंद्र । चित्ताधीश हो उपेंद्र अहंकारपती रुद्र । चालक हे ॥१०॥

व्यष्‍टीचे हे होत देव । समष्‍टीचे अवयव । यांचा चालक तो देव । स्वयंज्योती ॥११॥

पंचीकृत स्थूळमूर्ती । तेथें विश्‍व घे जागृती । लिंगीं तैजस घे भ्रांती । स्वप्‍नाची हे ॥१२॥

अविद्या कारणदेह । तेथें प्राज्ञा निद्रा मोह । याचा साक्षी तुर्य न हो संदेह ज्या ॥१३॥

स्थूळ अन्नमयकोश । त्याचा जीवा जैं अध्यास । तेणें घे षड्‌विकारांस । भास हाही ॥१४॥

कर्मेद्रियप्राणसंगें । नित्य भूक तहान घे । ज्ञानेंद्रिय मनें उगें । भ्रम करी ॥१५॥

ज्ञानेंद्रियबुद्धियोगे । कर्तृत्वाच्या लेपें फुगे । प्रिय मोद प्रमोदें घे । भोंक्‍तृत्व हा ॥१६॥

जेव्हां होयी देहातीत । पंचकोशव्यतिरिक्‍त । दशासाक्षी तेव्हां मुक्‍त । भक्‍त हो तो ॥१७॥

ऐसा होण्यासाठी योग । अभ्यासावा हा अष्टांग । निवसिन मनो भंग । चांग होई ॥१८॥

खोटें बोलों नये चोरी । हिंसा दुर्मैथुन वारी । सरळतां धैर्य धरीं । दुःख होतां ॥१९॥

सर्वांवरी कृपा करीं । मृत्तोयानें शौच करीं । अवमानी क्षमा धरीं । खांई सूक्ष्म ॥२०॥

यांचें नाम दहा यम । दाहा हे ऐक नियम । जपे देवगुरुनाम । देवां पूजीं ॥२१॥

वेदांताचा नित्याभ्यास । गुरुवाक्याचा विश्‍वास । कृछ्रें शोषीं स्वदेहास । कर्मी श्रद्धा ॥२२॥

दैवलाभें संतोषोन । पात्री देईं शक्‍त्या दान । निंद्या लाजें विष्ण्वर्पण । सर्व करीं ॥२३॥

उज्वा डावे मांडीवरी । डावा पाद उज्वेवरी । पृष्‍ठहस्तीं व्यस्त धरी । पादांगुष्‍ठा ॥२४॥

नासाग्राक्ष सिधा बैसें । बद्धपद्मासन असें । किंवा सिद्धासनीं बैसें । भ्‍रुमध्याक्ष ॥२५॥

डावी खोंट गुदावरी । तयावरी उज्वीं धरीं । नमी हनूं उरीं धरीं । हेंचि सिद्ध ॥२६॥

दर्भ-चर्मं-वस्त्रावरी । ऐसा बैसें तूं एकाग्रीं । जलाग्न्यादी भीति दूरी । करीं पूर्वीं ॥२७॥

घेयीं डावे नासापुटीं । सोळा अंकें वायू पोटीं । चतुर्गुणें धे हन्वटी । खाली धरीं ॥२८॥

दुजा नासापुटें सोडी । बत्तीसांनीं पुनः ओढी । विपरीत शुद्ध नाडी । हो अभ्यासें ॥२९॥

तीन वेळ वीस वीस । वाढवावे कुंभकास । ऐसें करीं तीन मास । खास सिद्धी ॥३०॥

कनिष्ठानें धर्म येतो । मध्यमें देह कांपतो । ब्रह्मरंध्रीं प्राण जातो । उत्तमानें ॥३१॥

दों पळें पांच विपळें । होतों प्राणायाम बळें । तो उत्तम त्याणें ढळें । कुंडलिनी ॥३२॥

पंचवीस पळें ठरें । तेव्हां प्रत्याहारें नुरे । बाह्यभान धारणारे । दोंघडींनें ॥३३॥

अहोरात्रें घडे ध्यान । करीं निद्रा निवारण । विक्षेपा दे प्रशमन । रस नेघें ॥३४॥

श्रवणाचें हें मनन । आंत युक्‍तीनें सेवन । स्वप्‍नवत् द्वैतभान । मान मिथ्या ॥३५॥

तो मी साक्षी परिपूर्ण । ऐसें नित्य करीं ध्यान । ध्येयाकार होतां मन । समाधी हो ॥३६॥

आदर्शस्थमुखें भान । मुखाचें हो तेवीं जाण । बुद्धिप्रतिबिंबें भान । हो स्वात्म्याला ॥३७॥

चित्तेंद्रियें न दाविती । स्वात्म्या तो घे स्वप्रतीती । वृत्तीज्ञानें तेंही अंतीं रुपीं मुरे ॥३८॥

कतकरजोन्यायानें । ज्ञान मुरतां तत्क्षणें । फुरे स्वात्मा एकपणें । पूर्णानंद ॥३९॥

निद्रेमाजी जरीं ऐसें । तेथे वृत्तिज्ञान नसे । सामान्याशीं वैर नसे । अज्ञानाचें ॥४०॥

सूर्यतेजें जेवीं तृणें । न जळती संयोगानें । सूर्यकांताच्या तत्क्षणें । भस्म होती ॥४१॥

तैसें वृत्तिज्ञान जाणा । जहदजहल्लक्षणा । तत्वंपदार्थैक्य खुणा । दावी खास ॥४२॥

धरीं जेव्हां योगीं चाड । तेव्हां सिद्धी येती आड । योगा घालिती बिघड । द्वाड त्या रे ॥४३॥

अणिमादी आठ सिद्धी । दाहा अन्य उपसिद्धी । येथें न धरावी बुद्धी । नश्‍वर ह्या ॥४४॥

धरिती त्या जरी कास । त्यांची न ठेवावी आस । ऐसा नर करी त्यास । खास मोक्ष ॥४५॥

योगभ्रष्‍ट झाला तरी । तो मोक्ष घे जन्मांतरीं । प्रभाव हा योगोदरीं । तारी साच ॥४६॥

क्रममुक्‍ती ब्रह्मलोकीं । ब्रम्ह्याबरोबर ये कीं । अप्रतिबद्धा या लोकीं । जीवन्मुक्‍ती ॥४७॥

ज्ञानी तदर्थ उपाय । करिती ते सर्वापाय । निवारिती तूं ही सोय । धरीं अंगें ॥४८॥

अर्थां भुलेना जो ज्ञाता । मुग्ध तो जो मार्गीं जातां । न दे दृष्‍टी इतस्तता । आंधळा तो ॥४९॥

निंदा स्तुती न घे कानीं । भेरा तो मितसद्वाणी । बोले स्वादा दे सोडूनी । अजिव्ह तो ॥५०॥

भिक्षा शौचार्थ जो जाई । पंगू तो जो कशी बाई । पाहूनी न भुली घेई । तोची षंढ ॥५१॥

ऐसा वागे त्या ये सिद्धी । तूंही ऐसा योग साधीं । गुहा ही घे येथें आधी । कधीं न हो ॥५२॥

ठेवी दत्त शिरीं हात । राजा वंदी जाई तेथ । तीन दिन हो ध्यानस्थ । प्रसादानें ॥५३॥

पुनः ही हो बारा दिन । समाधिस्थ मास तीन । पुसे त्याला उठवून । दत्तात्रेय ॥५४॥

म्हणे बोले अनुभव । बोले राजा जेथे वाव । त्रिपुटीला नसे ठाव । वृत्तिज्ञाना ॥५५॥

होतों तेथें समाहित । जाणीलें हें मीं उठतां । पूर्वाभ्यासानुवृत्तिता । तर्किजे ते ॥५६॥

तो आनंद कैसा कोण । वदे दैवें ज्या सोडोन । आलो येथें घे चरण । हे ही तैसे ॥५७॥

दत्त हसोनी जेववी । पुनः अभ्यासा पाठवी । वर्ष होतां त्या ऊठवी । स्वयें दत्त ॥५८॥

दत्त बोले तूं कृतार्थ । करीं राज्य भोगीं अर्थ । जरी नसे तुला स्वार्थ । तरी जा रे ॥५९॥

निज प्रारब्ध भोगावें । अनासक्‍तीनें वागावें । सदा स्वरुपीं जागावें । गावें देवा ॥६०॥

लोकबाधानिरासार्थ । लोकां दावीं विपरीत । भावें धरिं हृदयांत । नित्य धर्म ॥६१॥

वर्म ऐसें सांगे दत्त । राजा शिरीं धरी जात । राष्‍ट्रीं तैसें आचरत । दत्ता स्मरे ॥६२॥

करी विप्रोद्वाह बांधी । तळीं धन अश्‍वमेधीं । वेंची ज्याच्या राष्‍ट्रीं आधी । व्याधी नसे ॥६३॥

स्वयें पाळी सप्‍तद्वीपा । स्मरे जो त्या दावी रुपा । अनेकत्व ये तद्रूपा । दीपा जेवीं ॥६४॥

तेव्हा सर्व सुवासिनी । वृद्ध होती सर्व प्राणी । ईतिभीती नेणें कोणीं । आणि नैस्व्य ॥६५॥

खें खें मारीं मारी अरी । अशा जपें हो त्या परी । नामें कार्तवीर्य मारी । अरि चोरां ॥६६॥

स्वाहा शमवीं शमवी । ह्याचेपरी पराभवी । बाधा दोष रोष देवी । कार्तवीर्य ॥६७॥

पर्जन्येंद्र ऋष्यश्रृंग । मंडूक दे मंत्रें चांग । वृष्‍टी तेवीं दे अव्यंग । अर्जुंनाख्या ॥६८॥

उमा रमा-सरस्वती । ऋद्धिसिद्धी बुद्धी देती । कार्तवीर्यनामें हातीं । येती तिन्ही ॥६९॥

ऐसा राजा तो एकदा । भुजीं वळवीं नर्मदा । कांता खेळवी नर्मदा । मदांधसा ॥७०॥

कोपें सिंधू ये धावुनी । राजा लोटी त्या ताडूनी । पळे तो वेळा सोडूनी । मनीं खचे ॥७१॥

कर्कोटक नागसुत । कार्तवीर्यावरी येत । त्या जिंकोनी पद घेत । राजा त्याचें ॥७२॥

पाहोनी हें त्यांचे शौर्य । देवांलाही न हो धैर्य । त्याच्यापुढें केवीं वीर्य । मर्त्य दावीं ॥७३॥

असा राजा बळी जरी । विप्रांवरी प्रीती करी । अतिथींला तो सत्कारी । तारी दीना ॥७४॥

नित्य निजधर्में वागे । अन्या वागवितो अंगें । नित्य निजरुपीं जागे । रंगे रुपीं ॥७५॥

(८५०००) पंचाशीति सहस्त्राब्द । राज्य केलें जेवी अब्द । वर्षे दाने दे न शब्द । कठोर दे ॥७६॥

पुत्रापरी प्रजा पाळी । कधीं कोणा न दे गाळी । विप्राज्ञेतें धरी भाळीं । बळी जरी ॥७७॥

त्याचे सौभाग्य अमित । पुत्र झाले त्याला शत । ते सर्वही पितृभक्‍त । सक्‍त धर्मीं ॥७८॥

दत्तापाशीं एके दिनीं । कार्तंवीर्य तो येवुनी । मृदु बोले लीनपणीं भक्‍तीभावें ॥७९॥

प्रारब्धाचा भोग धाला । आतां मारा तुम्हीं मला । दत्त म्हणे आतां तूला कसा मारुं ॥८०॥

राजा म्हणे स्वामी ऐका । क्षत्रियांचा देह जो कां । धारातीर्थी धर्में चोखा । पडावा जी ॥८१॥

तरीं याला मारणार । समर्थ न सुरासुर । तेथें काय हे पामर । नर बोला ॥८२॥

बोले श्रीदत्त हांसूनी । तुझी निष्‍ठा ही पाहोनी । वर देतों संतोषोनी । प्रिय भक्‍ता ॥८३॥

तुला मारो ख्यात्याधिक । जातुमंतुमिषें ऐक । रणीं तो मी ऐसी चोख । भाक घें हे ॥८४॥

ऐसें ऐकोनी अर्जून । वंदोनी ये संतोषोन । करी अश्‍वमेध यज्ञ । निष्कामेशी ॥८५॥

कोंणी अश्‍वा न धरिती । अश्‍वमेध सांग होती । ते देखोनी देवां भीती । येती झाली ॥८६॥

देवी पाठविला सूर्या । सत्व त्याचें हरावया । ये अतिथी होवोनियां । विप्ररुपें ॥८७॥

राजा म्हणे माग इष्‍ट । तो बोलिला रितें पोट । स्थावरांची भिक्षा तुष्‍ट । मातें करी ॥८८॥

राजा म्हणें देतों ती मी । विप्र न व्हा कोण तुम्हीं । मग सूर्य निजधामीं । प्रगटला ॥८९॥

धन्य झालों म्हणें राजा । सप्‍तद्विपींचा उब्दीजा । घेयीं सूर्य म्हणे राजा । घे हे बाण ॥९०॥

सोडीं याहीं ते वाळती । अग्निरुपें तयांप्रती । सेवीं म्हणोनी दे हातीं । भाते सूर्य ॥९१॥

पांचशें तो चाप जोडी । राजा तेची बाण सोडी । झाले शुष्क वृक्ष तोंडीं । धरी सूर्य ॥९२॥

सर्व वृक्ष भस्म झाले । ध्यान सोडुनी देखिलें । वसिष्‍ठानें तें पूसिलें । शिष्यवर्गा ॥९३॥

सांगती ते त्या अर्जुनें । वृक्ष शोषीले ये बाणें । ते जाळीले दावाग्नीनें । भुतळींचे ॥९४॥

तेव्हां क्रोधें मुनी वदे । हा आम्हासी नेणें मदे । मरो विप्रहस्तें खांदे । तुटोनी हा ॥९५॥

ऐसा दैवें झाला शाप । तेव्हां उद्धत हो नृप । स्वर्गीं गेला देवां कोप । ये पाहुनी ॥९६॥

देवीं त्याशीं युद्ध केलें । भूपें देव पळविले । विष्णूला शरण गेले । छिन्नभिन्न ॥९७॥

कार्तवीर्या मारा आतां । ऐसें देवीं विनवितां । वरा शापा आठविता । झाला विष्णू ॥९८॥

विप्ररुपें मारुं त्यास । चला म्हणे तो देवांस । देव आले स्वस्थानास । भीत भीत ॥९९॥

विष्णू हो भार्गवराम । मंतूमिषें त्या संग्राम । करोनी दे परंधाम । भूमानंदे ॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृतांब्धौ कार्तवीर्यप्रतापाख्या तृतीयलहरी संपूर्णा ॥ओव्या॥३००॥

Leave a Reply

9 + seven =