नवमलहरी
श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
उठोनी तो आयूराजा । नारदाची करी पूजा । सेवी त्याच्या पदांबुजा । निजांगेशीं ॥१॥
म्हणे आज हो सुदिन । झालें आपुलें दर्शन । धन्य माझें हें जीवन । मुनीश्वरा ॥२॥
संत अंतरीं कोमळ । दयाघन न केवळ । ज्यांला नाहीं काळवेळ । दया वर्षूं ॥३॥
बुडतां मीं दुःखाब्धींत । मला द्याया वर हात । तुम्हां पाठवित दत्त । येथ जणूं ॥४॥
दत्तें मला पुत्र दिल्हा । अकस्मात नष्ट झाला । त्याचा झाला शोक मला । काय करुं ॥५॥
म्हणे नारद हंसुनी । ज्याला एकदां चिंतूनी । मुक्त होती त्या सेवूनी । दुःखी कां तूं ॥६॥
पुत्र गौणात्मा हा तुला । जरी असे रे कळला । अवकाश या शोकाला । झाला कसा ॥७॥
पुत्र-दारादि नश्वर । तैसें जाण हें शरीर । मुख्यात्मा अजरामर । धर त्या तूं ॥८॥
देह घटसा विकारी । त्याचा साक्षी अविकारी । प्राणेंद्रिय चित्ता दूरी । तो तूं भिन्न ॥९॥
स्वप्रीत्यर्थ देहादिक । प्रिय ज्या तो तूं अधिक । लोहचुंबकसा एक । चाळक तूं ॥१०॥
तुज्यायोगें जड हे रे । चेतनसे होती सारे । तो तूं ह्या मनाचे फेरे । ठायीं पाहे ॥११॥
जाग्रत्स्वप्ना निर्विकारें । पाहें निद्रा बुद्धीचे रे । लय उदयहि जो रे । पाहे तो तूं ॥१२॥
असावें म्यां ह्या प्रेमा घे । धन-पुत्र-स्त्री अवघे । स्वप्रीत्यर्थ घेयी न घे । तत्प्रीत्यर्थ ॥१३॥
सर्वांहुनि जो वेगळा । तो तूं आतां तें तूजला । सांगों सर्वेश्वर ज्याला । सर्वज्ञता ॥१४॥
ज्याच्या ज्ञानें सर्व कळे । जीवरुपें देहीं चळे । जीवा कर्तृत्व ज्यामुळें । फळे दे जो ॥१५॥
संसाराला जो न शिवे । स्थूल सूक्ष्म न म्हणवे । सर्वानंदाचे विसावे । जेथें होती ॥१६॥
हें तों परमात्मरुप । तेंचि तुझें निजरुप । हें लक्षीतां शोक पाप । ताप कैंचा ॥१७॥
हाची तुझा मुख्य आत्मा । देह होय मिथ्या आत्मा । पुत्र जाण गौण आत्मा । शोक दे तो ॥१८॥
पूर्वी न होतांही शोक । गर्भा येतां पातधाक । जन्मी वेदना अनेक । तोक दे तो ॥१९॥
उपजल्या बाधाव्याधी । किंवा होतील हो व्याधी । नाना आळींच्या उपाधी । बाधी बाल्यें ॥२०॥
व्यसनाची येयी खंती । किंवा मूर्खत्वाची भीती । विवाहाची चिंता मोठी । थोरपणीं ॥२१॥
संतानाचीही ये भ्रांती । दांपत्याची हो कीं प्रीति । आतां हे हो काय खाती । भीति ही हो ॥२२॥
कैसीं पोरें यांना होती । त्यांची लग्नें कीं घडती । माता पिता ऐसे अंती । होती दीन ॥२३॥
एवं न झाल्यापासोनी । पुत्रशोक मोठा वन्ही । टांकी सजीवां जाळोनी । मायबापां ॥२४॥
ऐसें जाणूनी तूं आतां । गौणात्म्याची सोडीं चिंता । मुख्यात्म्याची करी वार्ता । त्राता तोचि ॥२५॥
हुंडासुरें मारावया । तुझा पुत्र नेला तया । मुनीगृहीं रक्षोनियां । ठेवी दत्त ॥२६॥
दैत्य मारुनी उद्वाहा । करोनी येईल पहा । याच डोळां बोल न हा । माझा खोटा ॥२७॥
असें सांगोनी नारद । गेला भूपा हो आनंद । राणीचाही त्याणें खेद । दवडिला ॥२८॥
नहुष तो एके दिनीं । मृगयेसी गेला वनीं । तेथे तो आकाशध्वनी । कानीं ऐके ॥२९॥
सोमवंशी आयूराजा । नहुषा तो पिता तुझा । माता इंदुमती तूं जा । तया भेट ॥३०॥
नारी अशोकसुंदरी । तुझेसाठी तप करी । हुंडासुरा शीघ्र मारीं । वरीं तीला ॥३१॥
ऐसें ऐकोनी नहुष । मनीं मानी बहु हर्ष । भ्रांती एक हो विशेष । त्याचे चित्तीं ॥३२॥
अरुंधतीवसिष्ठांचा । हा मी पुत्र होय साचा । आज ही आकाशवाचा । कां चळवी ॥३३॥
असें चिंतूनी तो आला । सर्व सांगे वसिष्ठाला । वसिष्ठही सर्व त्याला । जाणवीत ॥३४॥
सर्व साद्यंत सांगुनीं । नहुषाला बोले मुनी । आतां सत्वर जावूनी । हाणी दैत्या ॥३५॥
दत्तात्रेय तुला तारी । सर्व संकटे निवारी । जा तूं त्याला चित्तीं धरीं । कैवारी तो ॥३६॥
ऐसी आज्ञा देयी मुनी । नहुषही स्वीकारुनी । गेला एकला निघोनी । मनीं हर्षें ॥३७॥
मला सुगम हो पंथा । मार्गीं न हो चिंता व्यथा । शीघ्र जया सह दत्ता । आतां आणीं ॥३८॥
ज्याला युद्धीं बोलाविती । निवारी जो येतां भीती । मला तोची शचीपती । साथी होवो ॥३९॥
असें प्रार्थूंनी तो चाले । मार्गीं सुशकुन झाले । कन्या गायी कुंभ आले । फलें पुढें ॥४०॥
स्वर्गीं इंद्र म्हणे सूता । शस्त्रांसह घेयीं रथा । जा तूं नहुषाला आतां । साह्य करीं ॥४१॥
ऐसें इंद्रानें सांगतां । छत्रवर्मशस्त्रयुता । घेवोनीं ये साश्वरथा । मातली तो ॥४२॥
म्हणे देवेंद्रें धाडिला । देवोनी ह्या साम्रगीला । युद्धीं साह्य करीं तूला । भला हो तूं ॥४३॥
नहुषही तें ऐकूनी । सर्व सामग्री पाहुनी । स्वीकारी तो आठवूनी । मनीं दत्ता ॥४४॥
यथाविधी रथीं चढे । किंचित् जातांची त्यापुढें । देव येवोनियां गाढें । आलिंगितीं ॥४५॥
देव म्हणती रे सुता । एकला तूं जासी आतां । हें पाहोनी सहाय्यता । करुं आम्ही ॥४६॥
बोले नहुष देवांला । दत्त राखी सदां मला । तोचि करवी तुम्हांला । मला साह्य ॥४७॥
गुरुआज्ञा मी प्रमाण । मानीं त्यांचे हें कारण । तरी कष्ट निवारण । प्राणदाता ॥४८॥
असें म्हणोनी तो चाले । देवासह हें कळलें । अशोकसुंदरीबाले । ध्यानयोगें ॥४९॥
तिची होती रंभासखी । तिला पाठवी ती दुःखी । म्हणे राजाला संमुखी । सखि होयी ॥५०॥
नहुषाच्या पुढें आली । रंभा सखीची ती बोली । भूपा जाणवी त्या वेळीं । भूप म्हणे ॥५१॥
मला सर्व ठावें झालें । रंभे तुवा मागें चालें । दैत्या मारोनी पहिलें । भेटू तुम्हां ॥५२॥
ऐकोनी हें आनंदली । रंभा त्वरें मागें आली । सखीला ती कळविली । बोली त्याची ॥५३॥
देवीं कोलाहाल केला । हूंडसुरें तो ऐकिला । म्हणे कोण मारुं आला । मला शत्रू ॥५४॥
पाहें शीघ्र जायीं दूता । कोण शत्रू येतो आतां । किती बल त्याचें वार्ता । शीघ्र आणी ॥५५॥
दूत संमूख जावूनी । प्रयत्न घे समजुनी । पुनः आला परतोनी । दैत्यापाशीं ॥५६॥
म्हणे आयुराजसुत । नहुषचि शत्रू येत । सवें देवही अमित । पातले हो ॥५७॥
तें ऐकोनी घाबरला । बोले असुर भार्येला । सत्य बोलें त्वां वधिला । त्या बाळा कीं ॥५८॥
राणी बोले दासीकरीं । त्याच क्षणीं बाळा मारीं । दासी तीही बोले अग्रीं । मारिला म्यां ॥५९॥
त्याचें मांस त्वां भक्षिलें । आतां मन कां शंकलें । तर असें कसें झालें । बोले दैत्य ॥६०॥
दैत्य मनीं धरी धीर । म्हणे या हो सर्व शूर । युद्ध करुनी दुर्धर । वीर मारुं ॥६१॥
युद्धभयें जे लपती । पूर्वी मारीं त्यां ह्या हातीं । हें ऐकोनी सर्व भीती । जाती युद्धा ॥६२॥
रथीं बैसोनी तो स्वयें । हुंडासूर युद्धाला ये । त्या पाहोनी खचे भयें । नये धीर ॥६३॥
धनुर्बाण धरी करीं । मातली सारथ्य करी । त्याला इंद्र रथावरी । दूरी देखे ॥६४॥
जैसा शोभे नभीं रवी । तैसी नहुषाची छबी । पाहोनी तो दैत्य जवीं । लोटी सैन्य ॥६५॥
चतुरंगदळभार । चाले देवसैन्यावर । युद्ध होय अति घोर । मरणांत ॥६६॥
एकाएकीं पाशशर । दैत्य सोडीती तोमर । नाना शस्त्रें अनिवार । मार देती ॥६७॥
देती जेव्हां असा मार । देव जाहले जर्जर । देती सोडूनी ते धीर । दूर जाती ॥६८॥
तें देखोनी नहुष यें । दैत्यां मारी बाण धायें । त्याच्यापुढें दैत्य भयें । न येती ते ॥६९॥
बळें समोर जावूनी । नहुष त्यां दैत्यां हाणी । जाती धाकानें मरोनी । कोणी दैत्य ॥७०॥
कित्येकांचे रथ मोडी । गजगंडस्थळें फोडी । बाणें घोडयांचीही हाडी । पाडी खालीं ॥७१॥
त्याचीं कवचेंही फाडी । करांसह धनू तोडी । एकाएकीं मान खंडी । फोडी पोट ॥७२॥
ज्या त्यापुढें घेई उडी । न मारुं दे कोणा दडी । वीरां शोधूनी तो काडी । पाडी खालीं ॥७३॥
पाशें फरफरा ओडी । त्या दैत्याची बांधी मुडी । तोडी सर्वांची तो खोडी । झाडी शौर्य ॥७४॥
रक्तप्रवाह चालिले । शव ते वाहूं लागले । असें घोर युद्ध झालें । मेले दैत्य ॥७५॥
हुंडासुर ये धांवुनी । भूपा बाणें आच्छादूनी । टांकी करी घोर ध्वनी । झणी तेव्हां ॥७६॥
देव ऋषी चित्तीं भीती । तें जाणूनी उग्रमूर्ती । सरसावे तो नृपती । मतिमंद ॥७७॥
दैत्य दावी नाना माया । भूप त्या त्या नेयी लया । गर्जोनीयां बोले तया । मायावी तो ॥७८॥
अरे मानवाच्या पोरा । उभा राहें धरीं धीरा । न जाणसी माझा बरा । पराक्रम ॥७९॥
तुला दावीं यमपुरी । जीविताची आशा जरी । शरण ये मला दूरी । करीं शस्त्र ॥८०॥
बोले भूप सोमवंशी न घडली गोष्ट अशी । जरी शूर तूं अससी । मशीं भीड ॥८१॥
माझ्या बाळपणी माता । त्वां पीडिली त्याचा आतां । सूड घेतों न जीविता । तुझ्या ठेवीं ॥८२॥
असें बोलोनी तो शर । सोडी चूकवी असूर । लपे मायीक दुर्धर । वारंवर ॥८३॥
जेथे भासे तेथें नसे । दैत्य कृत्य करी असें । त्याचें कर्म पाहे तसें । हंसे भूप ॥८४॥
म्हणे मातले उलठ । रथ फीरवी मी पाठ । त्याची पुरवूनी कंठ । तोडीं आतां ॥८५॥
तसा रथ तो भोवंडी । भूप तेव्हां बाण सोडी । त्याचे दोनी बाहू तोडी । पाडी खालीं ॥८६॥
तरी तो ये अंगावर । सोडूनीयां दोन शर । पाय तोडूनी तो वीर दूर टाकी ॥८७॥
तरीही तो सर्पवत् । मुख पसरोंनी येत । तोडी नहुष त्वरित । कंठ त्याचा ॥८८॥
असा मारीतां असुर । पुष्पें वर्षती ते सुर । झाला जयजयकार । थोर हर्ष ॥८९॥
हर्षे देव स्वर्गीं जाती । अशोकसुंदरी ये ती । रंभेसह बोले चित्तीं । प्रीती ठेवीं ॥९०॥
म्हणे धन्य दिन आज । भूपा वरी तूची मज । अर्पिला हा देह तूज । लाज याची ॥९१॥
दैत्यें नानापरी मज । गांजीलें जें माजें गूज । दत्त समजवो तूज । मी न बोलें ॥९२॥
बोले नहुष जे गुरु । सांगेल ते तसें करुं । गुरुपाशीं ये मी येरु । म्हणे तया ॥९३॥
राज्य दैत्याचें लुटोनी । गुरुपाशीं दे आणोनी । सवें दोघीही येवोनी । वंदिताती ॥९४॥
बोले अशोकसुंदरी । मला भूपाच्या पदरीं । घाला निश्चय अंतरीं । धरीं हाची ॥९५॥
म्हणे वसिष्ठ नहुषा । मला आवडे ही स्नुषा । खास आहे ही निर्दोषा । योषा साध्वी ॥९६॥
मग नहुषें वरीली । रंभा तेव्हां स्वर्गीं गेली । मुनी म्हणे माता झाली । भली कष्टी ॥९७॥
जा नहुषा तिला भेट । राज्य करीं धर्में नीट । सेवीं धर्म निष्कपट धन्य होसी ॥९८॥
अरुंधती वसिष्ठातें । वंदोनी घे तो भार्येतें । भेटे जननी तातातें । सर्व सांगे ॥९९॥
तया आयू राज्य देयी । स्वयें भार्येसह जायी । वनीं तेथें दत्ता ध्यायी । घेयी मुक्ती ॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे नहुषविजया नवमलहरी समाप्ता ॥ओव्या ॥९००॥
(हें शंभर ओव्यांचे खेरीज कंस करुन त्यांत पुढें लिहिलें आहे तें मूळ प्रतींतील )
(क्षेपक) धर्मे वागें भक्त भूप । त्याला दत्त दावी रुप । त्याचें दुःखही अमूप दूर करी ॥१०१॥
तद्भक्तीचा हा महिमा । वेद नेणे ज्याची सीमा । काम पुरवूनी धामा । ने मानवा ॥१०२॥
या दोन जास्तीच्या ओव्यांना धर्मे याच्यावर बाजूस क्षेपक अशीं अक्षरें आहेत.