पंचमलहरी

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥

महावनीं समिधांसी । घ्याया राम गेला त्यासी । न जाणोनी आश्रमासी । शत्रू आले ॥१॥

सवें सैन्य तें घेवोनी । त्याच्या आश्रमा वेढूनी । रामा शोधिती घुसोनी । गृहामध्यें ॥२॥

होमस्थानीं ते पाहती । जमदग्नी तपोमूर्ती । त्याला जावूनी धरती । मतिहीन ॥३॥

दीन वाचे वदे मुनी । काय लाभ ह्या मारुनी । आशीर्वादा स्वीकारुनी । मागें चला ॥४॥

मला सोडा म्हणे वीरां । बोले रेणूका पदरा । पसरितें मुनीश्‍वरा । तारा बापा ॥५॥

बापा माझ्या प्राणधारा । सोडा जोडा यशा शूरां । हें योग्य हो दीनोद्धारां । वारा तापा ॥६॥

आम्हीं आश्रित जाणोन। दाते तुम्ही व्हा प्रसन्न । मला द्या सौभाग्यदान । मानपूर्व ॥७॥

मान पूर्वीं तोडा माजी । अथवा तुम्ही व्हा राजी । ऐसें बोले तीस पाजी । राजी ते न ॥८॥

ते न भीतां पापा वीर । तोडूनी मुनिचें शिर । पुरा चालिले सत्वर । क्रूर सारे ॥९॥

करी रेणुका विलाप । म्हणे माझें कैचें पाप । उदेलें हें जें दे ताप । माप न ज्या ॥१०॥

हाय हाय करुं काय । म्हणे नीती झाडी पाय । शिरा उरावरी घाय । माय दे ती ॥११॥

देती सुत आश्‍वासन । परी तिचें खिन्न मन । म्हणे देवा धांवा दीन । झालें मी हो ॥१२॥

राम तूं अंतरलासी । संधी लाधला शत्रूंसी । येरे प्राण देतें ऐसी । विलापी ती ॥१३॥

तेव्हां राम वनांतून । आला समिधा घेवून । सर्व अनर्थ ऐंकून । दीन झाला ॥१४॥

राम म्हणे मन्निमित्त । झाला तुझा ताता घात । ऐसा तुझा मी अहित । सुत नोहे ॥१५॥

आठवूनी त्याचे गुण । शोक करी तो दारुण । म्हणे आतां मला कोण । जाणता हो ॥१६॥

धडाधडां अश्रू वाहे । घडबडां लोळे स्नेहें । पितृशोकातें न साहे । मोहे राम ॥१७॥

मग डोळे पुसोनि तो । म्हणे शत्रूपुरा जातों । कार्तवीर्यजां मारितों । घेतों सूड ॥१८॥

हातीं परशू घेवोनी । जातां त्या भ्राते जननी । निवारीती तें न मनीं । कानीं घे तो ॥१९॥

माहिष्मतीसीं जावूनी । सर्व शत्रूंला मारुनी । क्षणें मागें तो फिरोनी । सदनीं ये ॥२०॥

म्हणे अर्जुंनाचे पोर । मारिले जे नृपवर । करीं त्यांचाही संहार । त्रिसप्‍तधा ॥२१॥

त्यांच्या रक्ताचा प्रवाह । त्याचे करीं पांच डोह । तर्पी तेथें पित्रासह । मुक्‍त व्हाया ॥२२॥

माता म्हणे पूर्वी कर । रामा आमुचा संस्कार । मग करीं तूं संहार । क्षत्रियांचा ॥२३॥

दत्तशिष्य अर्जुंन रे । तो मारीला हें न बरें । दत्त कोपे जरी बारे । तूं मरसी ॥२४॥

यासी उपाय सांगेन । आम्हां दोघां तूं घेवोन । जायी आतां रे येथोन । दक्षिणेसी ॥२५॥

जेथें होय व्योमध्वनी । तेथें श्रीदत्ता भेटुनी । होसी धन्य रामा मनीं । निर्धारीं हें ॥२६॥

मग राम कावडींत । एकीकडे मृत तात । मातेलाही बैसवीत । एकीकडे ॥२७॥

राम कावडी घेऊन । कान्यकुब्ज देशांतून । चाले दत्तातें चिंतून । दक्षिणेसी ॥२८॥

देखे गिरी नदी वन । माहोरासि ये चालून । तेथें आकाशवचन । कानीं पडे ॥२९॥

दत्ता आचार्य करुन । त्वन्माता सहगमन । करो करीं जलदान । विधीनें तूं ॥३०॥

ऐशा आकाशवाणीला । परिसोनी कावडीला । ठेवोनी तो आश्रमाला । गेला पाहुं ॥३१॥

समीपची दत्ताश्रम । दिसे जेथें नसे श्रम । नष्‍ट होती सर्व भ्रम । क्रम नको ॥३२॥

अहिंसेचा पूर्ण वास । केवीं राहे वैर त्रास । सर्वर्तूचा जेथें वास । सर्वकाळ ॥३३॥

राम आश्रमीं जावून । देखे श्रीदत्तचरण । दत्तें मायेचें मंडन । पसरिलें ॥३४॥

जीच्या नखाग्रावरुन । अप्सरांला ओवाळून । टाकीजे मुखावरुन । चंद्रालाही ॥३५॥

कोटी कंदर्प गाळून । वाटे ओतिलें लावण्य । तेजीं सूर्या कुर्वंडून । टांकावें कीं ॥३६॥

दंतहीरे चमकती । ओंठ बिंबाला लाजवीती । शुक नासिके भूलती । नेत्रां पद्में ॥३७॥

जीची कटि ती देखोन । सिंह मनीं होई खिन्न । गज देखोनी गमन । भांबवले ॥३८॥

कंठ शंखातें भूलवी । नाभी आवर्ता बरवी । रोमरोमी भासे रवी । छबी ऐसी ॥३९॥

ऐसी ललना येवून । कंठी मिठी ती घालून । प्रेमे चुंबन देवून । अंकीं बैसे ॥४०॥

परस्परें हावभाव । दाविताती अभिनव । जेथें नसे भिन्नभाव । ठाउकाची ॥४१॥

ऐसा मायेचा हा थाट । काय वर्णांवा अचाट । यांचा मानती जे वीट । धीट तेची ॥४२॥

ऐंसी होतां त्यांची क्रीडा । राम आला त्याची व्रीडा । न धरीतां हो नागडा । तीशीं दत्त ॥४३॥

राम साष्‍टांगें नमून । बोले जी सहगमन । माता करीते आपण । आचार्य व्हा ॥४४॥

दत्त म्हणे नेणे विधी । न सेवी हे मी उपाधी । अस्पृश्य अभाष्य आधीं । पाहें तूं हें ॥४५॥

राम झाला निरुत्तर । रेणुका ते दे उत्तर । यथार्थ हें वाक्यसार । फार गोड ॥४६॥

तीन गुणा वास जेथें । विधीनिषेध ये तेथें । जन्म मृत्यु दुःख तेथें । थारा करी ॥४७॥

तुम्ही तरी गुणातीत । नित्य उपाधीवर्जित । तीनी देहां साक्षीभूत । दोन्हीकडे ॥४८॥

शब्दस्पर्शादि विषय । होती इंद्रियाला ग्राह्य । तुम्ही तरीं अविषय । स्पर्शहीन ॥४९॥

जरी आपुल्या प्राप्‍तीला । शाब्द प्रमाण बोलिलां । तरी परीक्षत्वें भला । होवू तेंही ॥५०॥

श्रवणाचें जें मनन । त्याचेंही निदिध्यासन । वृत्तिव्याप्‍तीनें दे भान । अपरोक्ष ॥५१॥

तेव्हां अस्पृश्य अभाष्य । वाक्याचें हें ऐसें भाष्य । आधिशब्दें मी अमृष्य । लक्षी ऐसें ॥५२॥

अभिव्याप्‍ती आ अव्ययें । अधिशब्दें ईशता ये । सर्वांतर्यामीला नये । नियम्यता ॥५३॥

पाहें तूं हें या वचनें । तत्वंपदार्थैक्य होणें । नरा योग्य हें बोलणें । जाणें मी हो ॥५४॥

तेव्हां हंसोनी श्रीदत्त । रेणुकेच्या पुढें येत । स्तवी माते तूं साक्षात । आदिशक्‍ती ॥५५॥

तुझा पसारा हें जग । कैसी होसी भिन्न मग । असो हें तूं कार्य सांग । काय तूझें ॥५६॥

ती बोले मी सती जातें । पतीसवें दत्त तीतें । वदे कोणीं त्वत्पतीतें । मारियलें ॥५७॥

राम वदे क्षत्रियांनीं । मारिला हें परिसोनी । दत्त बोलिला कोपोनी । गर्जोनियां ॥५८॥

ब्रह्मघ्नहो हे क्षत्रिय । यांचा होवो कुळक्षय । राम वदे दत्तपाय । धरोनियां ॥५९॥

क्षत्रियांचें निर्दळण । करीं ऐसा केला पण । सिद्धी देति हे चरण । आण वाहें ॥६०॥

तुमचा जो शिष्य योगी । अपराध करी उगी । त्या म्यां मारिला हा अंगीं । नसो दोष ॥६१॥

दत्त वदे मदंशें तूं । त्याच्या प्रारब्धाचा हेतू । झालासी जा जय घे तूं । मारीं भूपा ॥६२॥

रामा होशील समर्थ । बाण सोडी सर्व तीर्थ । तुझ्या मातेच्या स्नानार्थ । आणीं वेगीं ॥६३॥

तेव्हां राम सोडी बाण । त्यांहीं भूमी विदारुन । सर्व तीर्थे तीं आणून । दिल्हीं रामा ॥६४॥

माता तेथें करी स्नान । मातृतीर्थ त्यापासून । झालें प्रसिद्ध दोषघ्न । अद्यापी जें ॥६५॥

वस्त्रालंकार भूषित । माता होवूनी बोलत । रामा हो तूं दत्ताश्रित । नीत धरीं ॥६६॥

करीं तुझें सत्य बोल । गोब्राह्मणां प्रतिपाळ । जातें पतीशीं ये मूळ । माहेराचें ॥६७॥

ऐसें बोले हास्यमुख । राम मनीं करी दुःख । दत्त म्हणे चित्तीं राख । रामा बोधा ॥६८॥

तेथें स्त्रियांसह देव । येती ऋषी तीचा भाव । पाहतांची चित्तीं वाव । नसे हर्षा ॥६९॥

भावें सूर्याला वंदून । तीणें वाणेही वांटून । केल्या प्रदक्षिणा तीन । त्या अग्नीला ॥७०॥

आज्ञा श्रीदत्ताची घे ती । स्त्रिया रतिभोगा जाती । तैशी पतीशीं ती सती । आगरिघे ॥७१॥

अश्‍वमेध पदोपदीं । जीला झाले जातां आधी । औट कोट रोमें साधी । स्वर्गीं वास ॥७२॥

एका एका रोमें तीस । कोटी कोटी वर्षें वास । ऋषीमंडळीं हो खास । पतीसह ॥७३॥

सतीस्पर्शें अग्नी शोभे । सहस्त्रार्कसम उभे । देव पाहती त्या शोभे । स्त्रियांसह ॥७४॥

रेणुका हे धन्य सती । धैर्य इच्या चित्तीं किती । स्त्रियां ऐशी होवो मती । म्हणती ते ॥७५॥

देवीं जयजयकार । केला आला गहिंवर । रामा त्याला दत्त धीर । दे बोधानें ॥७६॥

सर्व स्वस्थानासी जाती । दत्त क्रिया करविती । स्वयें आचार्यही होती । काय बोलूं ॥७७॥

क्रिया होतां वदे दत्त । रामा तुझे माता तात । कोठे गेले हें जाणत । अससी कीं ॥७८॥

राम म्हणे मेले गेले । स्वर्गीं दत्त त्याला बोले । नाहीं मेले नाहीं गेले । पहा हे तूं ॥७९॥

राम पाहे तों दीसती । दत्त बोलें जाणें चित्तीं । लीलाविहारी हे होती । गौरीहर ॥८०॥

सवेंची ते झाले गुप्‍त । रामा सांगतसे दत्त । करी क्षत्रियांचा घात । माझ्या बळें ॥८१॥

रामें एकवीस वेळ । निःक्षत्रिय भूमंडळ । केलें रक्‍तें पांच तळें । भरियेलीं ॥८२॥

त्या रक्‍तें पितृतर्पण । करोनि दत्ता शरण । येवोनी धरी चरण । तारा म्हणे ॥८३॥

किती सांगो असंख्यात । झाला क्षत्रियांचा घात । यापासोनी मला पूत । आतां करा ॥८४॥

दत्त म्हणे न हो ताप । न घे अहंकारलेप । बापा तुला नाहीं पाप । तरी ऐक ॥८५॥

करी यज्ञ विप्रां धन । देयी कश्यपा भूदान । तेणें चित्त पूत जाण । होय तूझें ॥८६॥

रामें आरंभिला यज्ञ । दत्त आचार्य सर्वज्ञ । ऋषी येती तेथें प्राज्ञ । देव आले ॥८७॥

तेथें सर्व देव धाले । विप्रां सर्व धन दिल्हें । रामें कश्यपाला दिलें । भूमिदान ॥८८॥

दत्त बोले त्वां जें केलें । त्याणें माझें मन धालें । तुझ्या ठाई जें ठेविलें । भलें तेज ॥८९॥

रामावतारीं ते घेयीं । पश्‍चिमाब्धितीरीं जायीं । पुढें मन्वंतरीं होयीं । ब्रह्मर्षी तूं ॥९०॥

रामें दिधलें तें धन । दत्त विप्रां दे वांटून । ऐसें चरित्र दावून । लपे तेथें ॥९१॥

पुढें दाशरथी राम । आकर्षूंनी घे ते धाम । तेव्हां ब्राह्मतेजें राम । युक्‍त झाला ॥९२॥

गेला सह्याद्रिशिखरीं । बाराकोस अब्धी दूरी । करी वसे त्याचे तीरीं । अद्यापीही ॥९३॥

राम ब्रह्मर्षी होणार । पुढें सायुज्य घेणार । ऐशा श्रीदत्ताचा वर । तारक हो ॥९४॥

सर्वतीर्थ मातृतीर्थ । असे जेथें पद्मतीर्थ । श्रीदत्ताचा वास तेथ । पाप नुरे ॥९५॥

पितृमुक्‍तीसाठीं धुंडी । चांघ्रीक तो पिंड सोडी । सर्वतीर्थी त्या रोकडी । मुक्‍ती झाली ॥९६॥

कन्या दोषें कुष्‍ठी झाला । सूर्य पद्मतीर्थी न्हाला । शुद्ध होवोनी लोकांला । शुद्ध करी ॥९७॥

ब्रह्मा विसरला वेद । त्याचा झाला त्याला खेद । येवोनी तो दत्तपाद । धरी भावें ॥९८॥

दत्ताज्ञेनें मातृतीर्थीं । स्नान करितां ये स्मृती । आठविल्या सर्व श्रुती । ब्रह्मदेवा ॥९९॥

ऐसीं तीर्थें ही ज्या स्थानीं । तेथें वसे दत्तमुनी । कृष्णधात्रीतळीं’ ध्यानीं । सदा मग्न ॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृताब्धौ रामोत्कर्षाख्या पंचमलहरी संपूर्णा ।ओव्या॥५००॥

Leave a Reply

fifteen + 20 =