सप्‍तमलहरी

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥

असी मदालसा नारी । प्रारब्धाचा भोग करी । पुनः झाले कालांतरीं । दोन सुत ॥१॥

त्यां सुबाहु शत्रुजित । ऐसीं नामें तात देत । मदालसाही हंसत । तीं ऐकूनी ॥२॥

त्यांला नित्य करी बोध । त्याही संसाराचा बाध । केला झाले ते विबुध । लोकीं जड ॥३॥

पाहोन ते तीन लेंक । राजा करी बहु दुःख । केले उपाय अनेक । सुधाराया ॥४॥

म्हणे पुत्र होती वेडे । ऐसें कर्म माझें कुडें । आतां पुढें वंश खंडे । रडे ऐसा ॥५॥

कुळीं ब्रह्मनिष्‍ठ लेंक । दैवयोगें होतां येक । सर्वां दे तो ब्रह्मलोक । हें तो नेणें ॥६॥

ओळखाया साधुपणा । स्वयें घ्यावा साधुबाणा । साधूच्या त्या गुप्‍त खुणा । भोंदू नेणें ॥७॥

उच्चीं पांच ग्रह येताम । प्रसवली पुनः सुता । म्हणे राजा नाम आतां । प्रिये तूं दे ॥८॥

माझ्या नामा तूं हंससी । तेव्हां साध्वी म्हणे त्यासी । तुम्ही ठेविल्या नामासी । बाधा पहा ॥९॥

क्रांति नाम गती राया । ती ह्या नसे म्हणोनियां । विक्रांत हें नाम वायां । झालें पहा ॥१०॥

मूळीं अमूर्त हा तेथ । सुबाहु हें नाम व्यर्थ । एकला तो शत्रुजित । होतो कसा ॥११॥

व्यवहारार्थ देह्याला । देणें तरीं तूं दे ह्याला । नाम अलर्क हें मला । आतां रुचे ॥१२॥

राजा ठेवी नाम तसें । एके दिनीं राजा पुसे । विक्रांता तूं वेड असें । कसें घेसी ॥१३॥

पढें विद्या राज्य करीं । नारी वरीं स्वयंवरीं । भोग भोगी यज्ञ करीं । तरीं धन्य ॥१४॥

विक्रांत तो बोलूं लागे । माता परा विद्या सांगे । निवृत्ति स्त्री वरीं अंगें । स्वात्मराज्यीं ॥१५॥

करायाचें तें मी केलें । मिळायाचें तें मिळालें । झालों तिघे बंधू भले । चौथा हो तो ॥१६॥

ऐसें वाक्यामृत त्याचें । भूपाळाला तें न रुचे । जेवी आचार साध्वीचे । कुलटेला ॥१७॥

कोपें बोले तो भार्येला । वंशनाश त्वां हा केला । उपदेश खोटा दिल्हा । त्याला मूढे ॥१८॥

खरा प्रवृत्तिमार्ग हा । देव पितृनरां दे हा । उपभोग तसा पहा । दुजा नोहे ॥१९॥

राज्य गजाश्‍व स्त्री धन । भोग शक्‍तीं देव दान । दे ज्या भगवंता त्याणें । तें भोगावें ॥२०॥

अन्यथा तो देवद्रोही । ही सामग्री ज्याला नाहीं । त्या दुर्भांग्यासाठीं पाहीं । निवृत्ती ती ॥२१॥

जरी निवृत्ती घे नर । त्यासी आमुचेंच द्वार । मग कां हें घरदार । सोडावें गे ॥२२॥

पुत्राविणें परलोक । न साधे हा श्रुतिलेख । ऐकें आतां चौथा लेंक । भ्रष्‍ट न हो ॥२३॥

हंसोनी ती बोले ऐका । बोधें आत्मलोक जिंका । काय कीजें रंका लेका । हे ही श्रुति ॥२४॥

न रुचे हा तुम्हां पंथा । तरी अलर्काला आतां । देतें वेदशास्त्रसंथा । कंथा न दें ॥२५॥

मग अलर्काला वेद । विद्या कला धनुर्वेद । सांगे शास्त्रा न्यायवाद । व्यवहार ॥२६॥

झाला अलर्क पंडित । स्वयंवरीं स्त्री वरित । तें पाहोनी पिता प्रीत । होता झाला ॥२७॥

राज्य देववुनी सुता । माता म्हणे शत्रू होतां । पेटी उघडीं ह्या हिता । तेव्हां पाहें ॥२८॥

ऐसें सांगोनी दे पेटी । राजा राणी वनीं जाती । तीणें बोधवूनी पती । उद्धरिला ॥२९॥

सायुज्यता घेती दोघे । करी पुत्र राज्य मागें । सहासष्‍ट हजारें घें । वर्षें भोग ॥३०॥

परिसंख्या मुख्य मानीं । रती मांस सुरापानी । झाला सक्त तो जाणोनी । सुबाहु ये ॥३१॥

तिघां माता पाजी बोध । आम्हा दुग्धसा तग्दध । ह्याला न लाधता छंद । ऐसें करी ॥३२॥

तरी आमुचा दायाद । आहे हाची याची याद । करुं पूर्वीं देवूं खेद । भेद नुरे ॥३३॥

ऐसा विचार करुनी । पुरा आला वनांतूनी । जडमूढता सोडूनी । बोले प्रौढ ॥३४॥

म्हणे अलर्का मी पूज्य । मला दे तूं आतां राज्य । येरु बोले सर्व त्याज्य । कां केलें त्वां ॥३५॥

आतां भीक देवूं काय । जरि होसी तूं क्षत्रिय । युद्धीं घेयी निजदाय । नायकें मी ॥३६॥

सुबाहू तें परिसोनी । काशीराजा कळवूनी । त्याचें साहाय्य घेवूनी । युद्धा आला ॥३७॥

लोक भेदानें फोडिले । किती दानें वळविले । किती सामें मेळविले । प्रधानादि ॥३८॥

योगसामर्थ्य अचाट । फोडविले किल्ले कोट । घाली कोशांची तो लूट । फूट होतां ॥३९॥

जे जे आपुले मानिले । ते ते सर्व उलटले । तें पाहुनी मन भ्यालें । अलर्काचें ॥४०॥

तेव्हां त्याचें धैर्य गळे । एकला तो वनीं पळे । मातृवाक्याला त्या वेळे । आठवी तो ॥४१॥

पाहे पेटी उघडून। त्यांत पत्रिका पाहून । वाची चित्तीं घाबरुन । अलर्क तो ॥४२॥

उलटती आपुलेची । तेव्हां संगती साधूची । करिं तेणें स्वहिताची । लब्धा होई ॥४३॥

ऐसा लेख तो पाहुनी । मनी निर्धार करुनी । दत्तापाशी तो येवोनी । बोले दीन ॥४४॥

जो सद्‌गुरो स्वामी मला । थोर दुःख झालें याला । दूर करा न या वेळा । दुजा त्राता ॥४५॥

हंसोनी श्रीदत्त बोले । दुःख तुला कोठें झालें । कोण तूं रे हें पाहिलें । बोलें प्राज्ञा ॥४६॥

असें वचन ऐकोनी । झाला विवेकी तत्क्षणीं । पाहें विचार करोनी । कोण मी हें ॥४७॥

म्हणे स्थूळ देह जड । ज्याला भूतांची सांगड । नाना विकारांची धाड । पडे येथें ॥४८॥

आत्मा सर्वगतपूर्ण । हा तो दिसे परिछिन्न । हा मी चिदात्मा याहून । वेगळाची ॥४९॥

बळें इंद्रियां चाळवी । झोपेमाजी जाडय दावी । तो मी प्राण होवूं केंवीं । मी ज्ञानात्मा ॥५०॥

क्षणें मन जायीं येयी । विभू मी हा राही ठायीं । त्याचा संशय न येयी । डोयीं माझ्या ॥५१॥

देहा व्यापी जागेपणीं । झोपेमध्यें जी लपोनी । जाते बुद्धी माझ्याहुनी । वेगळी ती ॥५२॥

जड जो हा अहंकार । त्रिगुणीं त्याहुनी पर । शुद्ध बुद्ध मी अमर । नर नोहे ॥५३॥

ऐसा माझा मी निर्धार । केला दुःखाचा विचार । करुं आतांची सादर । होवोनीयां ॥५४॥

नखापासोनि केशांत । ह्या देहाबाहेर आंत । शोधीतां न दुःखा यांत । दिसतसे ॥५५॥

प्राण भूक तान्हेवीणें । ऐसें दुःख कधीं नेणें । इंद्रियेंही भृत्यपणें । स्वार्था घेती ॥५६॥

रागद्वेषाचें तें मूळ । मन स्वभावें चंचळ । सुखदुःखाचा सांभाळ । हेंचि करी ॥५७॥

मन अन्नमय असे । विकारानें भ्रमतसे । परकी तें त्याचें कसें । दुःख मज ॥५८॥

गुरुजी म्यां चांचपलें । माझ्या रुपा ओळखिलें । हे हो दुःख मना झालें । बोलें साच ॥५९॥

हाच विचार दुर्धर । धुंडिती ज्या मुनीश्‍वर । तुम्ही दिल्हा हा सत्वर । सार प्रश्‍नें ॥६०॥

खातां मार्जारें उंदिरा । दुःख नोहे तेची कीरा । खातां हो हा दोष खरा । ममतेचा ॥६१॥

कोणी छीः थूः केल्या दुःख । हो आपणा रोग विख । वैर्‍या होतां हे घे सुख । ते अहंता ॥६२॥

ह्या दोहोंला कवटाळी । म्हणोनी घे मन भाळीं । सुखा दुःखा ह्यां ह्या वेळीं। जाळिले म्यां ॥६३॥

न घें अंगाच्या संबंधा । मग कैंचा राज्यधंदा । शत्रुमित्रत्वाचा भेदा । सांधा दिल्हा ॥६४॥

दत्त म्हणे धन्य तूं रे । क्षणें जाणियेलें सारें । आतां याचें स्थैर्य त्वां रे । बरें करीं ॥६५॥

करीं अर्धा सूक्ष्माहार । नीज रात्री दोनपार । मठीं एकांतीं विचार । कर हा रे ॥६६॥

तीनी भूमीच्या पूढती । रोकें पांच मनोवृत्ती । सत्कारें अभ्यासरीतीं । मती धरीं ॥६७॥

वशीकर वैराग्यें हो । संप्रज्ञात समाधि हो । सिद्धींला तूं वश्‍य न हो । मोहोनी रे ॥६८॥

अपमान सुधा मान । विषासमान रे मान । काळें मान खातां मा न । मान दे ती ॥६९॥

तिस्रेपारीं माधुकरी । तीन पांच सात घरीं । मागें खातां दूर करीं । बरी रुची ॥७०॥

हाचि तुला उपदेश । निर्विकल्प समाधीस । येणें जासी तूझा खास । वास ब्रह्मीं ॥७१॥

सोन्यावरी मल येतां । त्या अग्नीची आंच देतां । जैसी येयी प्राग्रूपता । तैसें येथें ॥७२॥

जीव ब्रह्मची असोन । अविद्यांशें हो मलिन । योगें विशुद्ध होवून । होतो प्राग्वत् ॥७३॥

पिंडीं ब्रह्मांडीं जे गूढ । तें मी मी तें हेची दृढ । होई तावत्करीं वाढ । हा अभ्यास ॥७४॥

ऐसें सांगोनी धाडीला । पुरा त्या तो स्वबंधूला । प्रेमें येवोनी बोलिला । घे तूं राज्य ॥७५॥

बंधू म्हणे तूं रे आर्य । गळलें कीं तुझें वीर्य । तूं क्षत्रिय धरीं शौर्य । कार्य साधीं ॥७६॥

येरु बोले त्वां तारिलें । दत्तें स्वात्मराज्य दिल्हें । आतां कांहीं न मी बोले । धालें मन ॥७७॥

मग सुबाहू आलिंगी । म्हणे झालों समभागी । मातेची ही कृपा जगीं । हो जी मान्य ॥७८॥

काशिराजा कार्य भलें । झालें मीही वनीं चालें । काशीराजा त्याला बोले । झाले काय ॥७९॥

बंधू तुला न दे भाग । म्हणोनी त्वां केला संग । आतां दोघेही निःसंग । कां होतां हो ॥८०॥

म्हणे सुबाहू हा स्वार्थ । सांडी त्या दाविला पंथा । हेंची कार्य झालें आतां । स्वस्थता ये ॥८१॥

काशीराजा म्हणे धन्य । बंधू उद्धरिला मान्य । झालों मी कीं बोले अन्य । संन्यस्त तूं ॥८२॥

स्वपर न साधूजना । दयेनें तारिती दीनां । सम विषय न त्यांना । जनांमाजीं ॥८३॥

आजी मजवरी कृपा । करीं बंधूपरी बापा । येरु म्हणे अनुतापा । न पावसी ॥८४॥

जरीं अलर्क विषयीं । अनुतापें दत्तपायीं । पडे राज्या लात देयी । घेयी मुक्‍ति ॥८५॥

भक्‍ति वैराग्यावांचोनी । प्रवोध न भरे कानी । हें तूं समजूनी मनीं । वनीं जायीं ॥८६॥

सांडीं राज्य पत्ती हत्ती । घेयीं साधनसंपत्ती । एकांतीं तूं निजचित्तीं । वृत्ती लक्षीं ॥८७॥

लक्षीं उठे जी जी वृत्ती । साक्षीपणें मुरवी ती । तो मी साक्षी ऐसी मती । अंतीं ठरे ॥८८॥

ठरें निरुपाधी बुद्धीं । दृश्यानुविद्ध समाधि । निर्विकल्प तो समाधी । दृढत्वें हो ॥८९॥

आंत तसेच बाहेर । समाधी निरहंकार । येणें आत्मसाक्षात्कार । शीघ्र लाभे ॥९०॥

ऐसें होतां मन जेथ । जासी समाधी ही तेथ । संदेह न धरीं येथ । सत्य मानीं ॥९१॥

ऐसें सुबाहू सांगोनी । पुसोनी त्यां चाले वनीं । काशीराजा तें ऐंकोनी । पुरा आला ॥९२॥

पुत्रा राज्य दे ये वनीं । तसा अभ्यास करोनी । तोही पावला निर्वांणीं । साधुसंगें ॥९३॥

पुत्रा राज्यीं बैसवूनी । अलर्कही आला वनीं । योगाभ्यासा आचरोनी । स्थिरावला ॥९४॥

तत्त्वज्ञानें मनस्थैर्य । वासनेला तो निर्वीर्य । करी राहे योगिवर्य । तुर्यपदीं ॥९५॥

तेव्हां स्मरे पूर्ववृत्ता । प्रौढ जैसा बाल्यावस्था । म्हणे कैसी ये मूर्खता । चित्ता तेव्हां ॥९६॥

विचार हा होतां नीट । आतां वाटे तीचा वीट । माया घालोनी हें कूट । लूटतसे ॥९७॥

पृथ्वींतील धन धान्य । नारी वस्त्र गो भूषण । एकालाही न हो पूर्ण । तृष्णायोगें ॥९८॥

तृष्णा मरतां ये तोष । जेथें तेथें होतो हर्ष । लपें गडयांसह रोष । हें म्यां देखे ॥९९॥

ऐसें बोलोनी शरीर । योगाग्नीनें जाळी वीर । दत्तरुपीं मिळे धीर । समरसें ॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे अलर्कगत्याख्या सप्‍तमलहरी समाप्‍ता ॥ओव्या॥७००॥

Leave a Reply

twenty − 19 =